(कोरड्या कविता उदकात
3533.
(कोरड्या कविता उदकातुन काढणे त्याबद्दल देवाची क्षमा याचना)
थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला । जनाचिया बोलासाठी चित्त क्षोभविले ॥१॥
भोगविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलो ॥धृपद॥
अवघे घालूनिया कोडे तहानभुकेचे साकडे । योगक्षेम पुढे तुज करणे लागेल ॥२॥
उदकी राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ॥३॥
अर्थ :
देवा मी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला मी तुझा अंत पाहिला आहे. लोक मला म्हणू लागले की याने अभंगरचना केलेल्या वह्याही पाण्यात बुडविल्या म्हणजे परमार्थही बुडविला आणि संसारही बुडविला त्यामुळे माझे चित्त क्षोभवले झाले व मी तुला बोलून त्रास दिला. देवा पाण्यातून वह्या काढून देण्यासाठी मी तुला प्रार्थना केली तेरा दिवस मी डोळे झाकून उपोषण केले मी खरेतर अधम आहे हीन जातीचा आहे तुला मी त्रास दिला आहे. देवा मी अभंगरचना केलेल्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या तुला त्या वह्या कोरडे काढून देण्याचे कोडे घातले एवढेच नाही तर माझ्या तहानभूकेचे देखील साकडे घातले. याच कारणामुळे तुला माझा योगक्षेमाचा भार चालवणे भाग पडले व माझे पुढचे सर्व योगक्षेमाचे भार तू चालवले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी पाण्यामध्ये बुडवलेल्या अभंगरचनेच्या वह्या तू जशाच्या तशा कोरड्या ठेवल्यास आणि जनवाद चुकविलास आणि तू तुझे ब्रीद खरे केलेस.
