एकांती लोकांती करू ग
2570.
एकांती लोकांती करू गदारोळ । लेश तो ही मळ नाही येथे ॥१॥
घ्यावे द्यावे आह्मी आपुलिया सत्ता । न देखो पुसता दुजा कोणी ॥धृपद॥
भांडाराची किल्ली माझे हाती आहे । पाहिजे तो पाहे वान येथे ॥२॥
तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे । ठेविले मोकळे देवे येथे ॥३॥
अर्थ :
आम्ही एकातात असो किंवा लोकांतात असो हरिनामाचा गजर आम्ही करू त्याविषयी आमच्या मनात कोणत्याही प्रकारची लाज किंवा किंतू येत नाही. आम्ही परमार्थाची देवाण-घेवाण आमच्या सत्तेने करत आहोत त्याबद्दल आम्हाला कोणीही काहीच विचारत नाही परमार्थाच्या भांडाराची किल्लीच माझ्या हातात आहे ज्याला जो माल पाहिजे आहे तो येथे उपलब्ध आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच बळावर त्यांनी आम्हाला या भांडारखाण्यात मोकळे सोडले आहे आणि या भांडारखाण्यातला माल ही मी लागेल तेवढा ज्याला हवा आहे त्याला देत असतो.
