पाहाते पाहू गेलो पाह
480.
पाहाते पाहू गेलो पाहणे विसरलो ।
ब्रह्मानंदे धालो देवराया ॥१॥
माझे रुप आता काय म्या पाहावे ।
जाहलो अवर्षे विश्व मीची ॥२॥
दुजे नाही नाही वाहतो तुझी आण ।
चौदाही भुवन एकरुप ॥३॥
तुझे माझे द्वैत तेंही उरले नाही ।
मूळी मी हे काही नाठवेचि ॥४॥
एकांती एक वर्ते तोचि साक्षात्कार ।
जाहला ज्ञानेश्वर तेथे लीन ॥५॥
अर्थ :
ब्रह्म वस्तूला पाहू गेलो असता मी त्या ब्रह्माहून वेगळा न राहता ब्रह्मानंदातच निमग्न होऊन गेलो ज्याला पाहावयाचे तेच माझे रुप असल्यामुळे पाहावयाचे काहीच उरले नाही. सर्वच ब्रह्मांड माझे रुप असल्यामुळे मला दुसरे काही दिसेनासे झाले. मला चवदाही भुवने ब्रह्मरुपच दिसू लागली. हे पंढरीनाथा तुला शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या माझ्यामध्ये देवभक्तपणाही उरला नाही. या ठिकाणी मीपणा गेल्यामुळे एकच वस्तु सर्वत्र भरली आहे. असा मला साक्षात्कार झाला. मीपण तद्रूप होऊन गेलो त्यामुळेच दुसरी वस्तु असल्याची ओळख नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
