सुकाळ हा दिवसरजनी ।
2195.
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवीच ॥१॥
करुनि सेवू नानापरी । राहे उरी गोडीने ॥धृपद॥
सरे ऐसा नाही झरा । पंक्ती करा समवेत ॥२॥
तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥
अर्थ :
नामसंकिर्तनामुळे मला दिवस काय आणि रात्र काय हे समजत नाही कारण मी नित्य नवा दररोज तृप्तीचा अनुभव घेत आहे. नामाचे विविध प्रकार आहेत त्यापैकी कोणताही एक प्रकार आम्ही आवडीने सेवन करू आणि पुन्हा ती गोडी चाखण्याची इच्छा शिल्लक राहतेच. हरिभक्तांच्या पंक्तीत बसून कितीही नामाचे सेवन केले तरी तो प्रेम सुखाचा झरा संपत नाही सरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या कान्हाबाई माऊलीचा हा नाम सुखाचा पान्हा फारच सुख देणार आहे.
