संतांचा पढीयावो कैशा
3178.
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥
हेचि थोर चिंता लागली मनासी । निजता निद्रेसी न लगे डोळा ॥धृपद॥
जेविता जेवणी न लगे गोड धड । वाटते काबाड विषयसुख ॥२॥
ऐसिया संकटी पाव कृपानिधी । लावी संतपदी प्रेमभावे ॥३॥
तुका म्हणे आम्ही नेणो काही हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥
अर्थ :
देवा संतांच्याविषयी माझ्या मनामधे प्रेम कसे वाढेल आणि हरीच्या नामाचे स्मरण माझ्या मनामध्ये कसे राहील ? देवा याची चिंता माझ्या मनाला फार लागलेली आहे मी झोपण्यासाठी जरी गेलो आणि जरी अंथरुणावर झोपण्यासाठी खाली पडलो तरी माझ्या डोळयाला डोळा लागत नाही. देवा मी जेवण करण्यासाठी जरी बसलो तरी चांगले अन्न देखील मला गोड वाटत नाही विषयसुख तर अगदी काबाडकष्टाप्रमाणेच मला वाटत आहेत. त्यामुळे हे कृपानिधी अशा संकटाच्याप्रसंगी तू मला प्रसन्न हो आणि संतांच्या चरणाच्या ठिकाणी अगदी प्रेमभावाने मला लाव. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा आम्हाला आमचे हित कशात आहे हेच काही कळत आणि तुझ्यावाचून तर आम्ही अगदी अनाथच आहोत.
