ब्रह्मचर्यी जया जाली
452.
ब्रह्मचर्यी जया जाली निर्वासना ।
तेथोनिच जाणा मोक्ष तया ॥१॥
निर्वासना मूळ असावी नेटकी ।
आश्रमी विवेकी वेद बोले ॥२॥
गृहस्थ-आश्रमी हेत नेमालिया ।
तेथुनीच तया मोक्ष पाहे ॥३॥
वानप्रस्थी विषयवासना निरसली ।
मुक्ति हे साधली तेथे तया ॥४॥
संन्यास घ्यावया मूळ विषय-त्याग ।
येर्हवी प्रसंग नाही खरा ॥५॥
बहेणि म्हणे वेद प्रमाण तो खरा ।
आश्रमी निर्धारा मोक्ष व्हावा ॥६॥
