आत्मराम देखे सहस्रदळ
416.
आत्मराम देखे सहस्रदळावरी ।
उन्मनी हे पाही आरुते तेही ॥१॥
चक्षूचे अंतरी चक्षू देखे पूर्ण ।
हेचि की रे खूण तुझे ठायी ॥२॥
मी ब्रह्म सोहं ज्ञानपद ते साजिरे ।
ते ठायी निर्धार तुझा तूचि ॥३॥
बापरखुमादेविवरा तुझा तू आपण ।
सर्व हे चैतन्य तुझे ठायी ॥४॥
अर्थ :
आत्मस्वरुपाला सहस्रदळकमळावर पाहणे यादृष्टीने उन्मनी अवस्था ही निकृष्टच आहे. ज्ञानरुप जो आत्मा तोच सर्वांचा प्रकाशक आहे. हीच एक खूण तू आपल्या ठिकाणी पाहा. मी ब्रह्म आहे. असे प्रतिपादन करणारे. जे 'सोहं' पद ते नाचत तुझ्या ठिकाणी येईल. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य तू म्हणजे माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल स्वतःच आहे. हे तु विचार करुन पाहिल्यास कळून येईल.
