निगम आगम वेदादिकसम ।
63.
निगम आगम वेदादिकसम । श्रुतीचा उपक्रम हारपला ॥१॥
ते रूप साजिरे नंदाचे गोजिरे । यशोदा श्रीधरे प्रेमभेटी ॥२॥
जेथे हे वाग् वाट शून्य तो निघोट । प्रत्यक्ष वैकुंठ ते गोपवेष ॥३॥
निवृत्ति तडाग निवांत सम्यक । सर्व रूपे एक आत्माराम ॥४॥
अर्थ:
जेथे वेद, शास्त्रे, श्रुतींचा ओघ आटला ते त्याचे व्यापक स्वरुप पाहु शकले नाहीत. त्याच्या आरंभाचे वर्णन करतांना त्यांचा निर्धार हरपला. ते कृष्ण रुप नंद व यशोदेस प्रेम भट देण्यासाठी आले आहे. ज्याचे वर्णन करायला सर्व प्रकारच्या वाणी थिट्या पडतात तो परमात्मा वैकुंठ सोडुन गोपवेश धारण करुन गोकुळात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो आत्माराम एकत्वाने सर्वान मध्ये आहे त्याच्याशी मी एकरुप झालो आहे.
