उंच नीच काही नेणे भग
20.
उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनिया ॥१॥
दासी-पुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ॥२॥
चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागे शेले विणी ॥३॥
सजन कसाया विकू लागे मांस । माळ्या सावत्यास खुरपू लागे ॥४॥
नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगे ढोरे ओढी ॥५॥
नामयाची जनी सवे वेचे शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ॥६॥
नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियांची भिंत अंगे ओढी ॥७॥
अर्जुनाचे रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥८॥
गौळीयांचे घरी अंगे गायी वळी । व्दारापाळ बळी व्दारी जाला ॥९॥
येंकोबाचे ऋण फेडी ऋषीकेशी । आंबऋषीचे सोशी गर्भवास ॥१०॥
मीराबाई साठी घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥११॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥१२॥
पुंडलिका साठी अझुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१३॥
