अष्टांग सांधने साधित
148.
अष्टांग सांधने साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥१॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥२॥
अठरा साहिजणे बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वये कर ॥३॥
निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथे सोय दाखविली ॥४॥
अर्थ:
अपानाचा निरोध करुन योगी जन अष्टांग साधना करुन शिणतात तरी त्यांना अप्राप्य असलेला हा कृष्ण बनुन हा परमात्मा गोपाळांबरोबर अनेक खेळ सहज खेळत आहे. ज्याचे वर्णन सहा शास्त्रे व अठरा पुराणे परावाणीने करतात तो गोपिंकांना हात जोडुन लोणी मागतो. निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी मार्ग दाखवल्या प्रमाणे माझे ध्येय ते श्रीकृष्ण रुपच झाले आहे. व त्याच्याशी मी एकरुप होतो.
