माझिये बुद्धीचा खुंट
2789.
माझिये बुद्धीचा खुंटला उपाय । करिसील काय पाहणे ते ॥१॥
सूत्रधारी तू हे सकळ चाळिता । कासया अनंता भार वाहो ॥धृपद॥
वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊ देहबुद्धीवरी नयो ॥२॥
तुका म्हणे दुःखी करिती तरंग । चिंतू पांडुरंग आवरूनि ॥३॥
अर्थ :
देवा माझ्या बुध्दीचा आता उपाय खुंटला आहे तू काय करशील ते आता मी पाहाणार आहे. हे अनंता तू सर्व जगाचे सूत्र चालवणारा सूत्रधारी आहेस मग मी कशाला व्यर्थ भार वाहात राहू? देवा मी आतापर्यंत जे काही संकल्प केले ते सिध्दीपर्यंत तर गेलेच नाही त्यामुळे मी आता देहबुध्दीवर येऊ नये हेच चांगले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला या संसारातील अनेक विकारांचे तरंग फार दु:खी करीत आहेत ते आता आवरुन पाडूरंगाचे चिंतन करु.
