हिरा शोभला कोंदणी ।
3977.
हिरा शोभला कोंदणी । जडित माणिकांची खाणी ॥१॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥धृपद॥
कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
अर्थ :
हिरा जसा सोन्यामध्ये सुशोभीत होऊन दिसावा किंवा रत्नजडित खाण जशी असावी, अगदी तसाच नारायण दिसत आहे आणि त्याचे मुख म्हणजे सुखाचे भूषणच आहे. कोटयावधी पौर्णिमेच्या पूर्ण असलेल्या चंद्राच्या तेजाप्रमाणे हरीची लीला म्हणजे तेज दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हरीचे रुप दृष्टीने पाहिले की दृष्टी तृप्त होते ती पुन्हा परत माघारीच येत नाही.
