वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

पाहाता सप्त पाताळे ए

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074373 · अभंग क्र. ६२२

622.
पाहाता सप्त पाताळे एकविसांवेगळे ।
ते निरंजन आगळे खुतले डोळा गे माय ॥१॥
पावा वाहे तलालोरी नादु उमटे अंबरी ।
तया सुखसागरी बुडाले वो माय ॥२॥
सुखसंवाद लागला जीवनी जीवनु भेटला ।
भेटी देऊनि गुंतला मनोमंदिरी वो माय ॥३॥
आता न सोडी न राहे आणिकु न पाहे ।
तव हाचि लवलाहे मिळाला वो माय ॥४॥
आवडी रिघाले घर आपुले ।
सहजी सामावले स्वरुपी वो माय ॥५॥
वैराग्यभक्ती ज्ञानाची माऊली ।
ते रखुमादेविवर विठ्ठली भेटली वो माय ॥६॥

अर्थ :
ह्या श्रीकृष्णाचे स्वरूप पाहू गेले तर हे सप्त पाताळ (अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताळ) किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व स्थूल देह आणि स्थूल सूक्ष्म यांचा संघात या एकवीस तत्त्वाहि पलीककडे म्हणजे ह्या एकत्व समुदायाच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णाचे स्वरूप निराळे असून ते माझ्या डोळ्यांत खुतले म्हणजे गच्च भरून गेले हो. त्याचे स्वरूप काय सांगावे. ? खांद्यावर तलालोरी म्हणजे तालात वाजणारा पावा असून त्या पाव्याचा नांद आकाशांत दुमदुमून भरला आहे. अशा श्रीकृष्ण सुखाच्या समुद्रात मी बुडून गेले. त्याचे बरोबर मला आनंदाचा संवाद प्राप्त झाला. तो संवाद माझ्या जीवाचे जीवनच होऊन बसला आहे. त्यानी मला भेट देऊन माझ्या मनांत गुंतून बसला आहे. आता ज्याला सोडून मन मुळीच राहणार नाही व ज्याचे वांचून दुसरे पाहणार नाही. तोंच माझ्या स्वरूपांशी ऐक्य होऊन गेला आहे. आवडीने मी त्याच्या घरांत गेले. तो सहजच माझ्या स्वरूपात येऊन साठवला. अशी भगवत्प्राप्ती होण्याचे मुख्य साधन काय म्हणून विचाराल तर वैराग्ययुक्त भक्ति हे ते साधन आहे. ज्ञानरूप माऊली असा जे रखुमादेवी चे पती श्रीविठ्ठल, त्यांची भेट मला झाली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग