वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

ठकपरी धरिला मनोवेगे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074301 · अभंग क्र. ६२१

621.
ठकपरी धरिला मनोवेगे बांधला ।
तो ठेंगणाचि जाहला अनिवाड वो माय ॥१॥
समाधी ध्यान निजध्यासी आरुढळे ।
तव अवघेचि पारूषले अभावा वो माय ॥२॥
हा असो जैसा तैसा हृदयमंदिरी ऐसा ।
परपुरूषी अपैसा अनुसरले वो माय ॥३॥
बरवा देखोनि न्याहाळी दिव्य कांती झळाळी ।
परब्रह्नी दिवाळी चहूंदिशांची वो माय ॥४॥
त्याने निवाला मनु भेंटला आपला जगजीवनु ।
तो आनंदगहनु उचंबळे वो माय ॥५॥
हा निरालंब वोळला भक्तिभावे मिळाला ।
रखुमादेवि दादुला विठ्ठलु राणा वो माय ॥६॥

अर्थ :
हा परमात्मा मोठा ठक आहे. कारण तो सहज रितीने मन, बुद्धि, इंद्रिये या कोणासच सांपडत नाही. असा जरी तो असला तरी मी त्याला शुद्ध मनाने बांधून टाकला आहे. हो तो जरी अपरंपार असला तरी तो कोंडून धरला तर मनांतही राहाण्यासारखा लहान होतो. परमात्मस्वरूप प्राप्तीच्या ध्यासाने, समाधी ध्यानाचे मार्गास लागलो. तो त्या सर्व साधनांचा अभाव होऊन गेला. परमात्म्याला शब्दाने असा तसा सांगता येत नसल्यामुळे आता अनुभवाने असे म्हणण्याचे पाळी येते की हा परमपुरूष हृदयांत ज्या रूपाने गुरूकृपेने प्रगट झाला आहे. त्यालाच मी सर्व भावाने अनुसरले. त्या श्रीकृष्णाची सुंदर प्रकाशित असलेली दिव्य कांति, ती चारी दिशांना आनंदाची दिवाळीच म्हणून समजावी. तो जगजीवन परमात्मा मला भेटून गहन, आनंद, मनांत उचबळून आल्यामुळे मन शांत झाले. हा मला प्राप्त झाला म्हणाल तर तो केवळ भक्तिभावानेच प्राप्त झाला असा दादला म्हणजे विश्वाधिपति कोण म्हणून विचाराल तर हा रखुमादेवीचा पती जो श्रीविठ्ठल राजा तोच होय. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग