वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › १. समुद्रकिनारी श्रीरामांचा विचार

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088191 · अभंग क्र. १

1.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पहिला ॥
वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

उदार गंभीर सुंद्रकांड । ते संपवूनि अतिशये गोड ।
पुढा उठावले युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥१॥

रामायणाचे महत्व त्यातील परमार्थ :

वाखाणावया युद्धकांड । माझे केंवी सरतें तोंड ।
तरी जनार्दनकृपा अखंड । जे कांडे कांड अर्थवी ॥२॥
रामायणींचा सखोल अर्थ । वक्ता जनार्दन समर्थ ।
सबाह्य परिपूर्ण रघुनाथ । ग्रंथ परमार्थ श्रीराम ॥३॥
रामायणींचें निजसार । क्षरीं कोंदलें अक्षर ।
पदापदार्थ चिदमिन्मात्र । परम पवित्र रामकथा ॥४॥
कथेजाजील कथार्थ । सबाह्य कोंदला रघुनाथ ।
हाचि ग्रंथींचा परमार्थ । निजात्मस्वार्थ साधका ॥५॥

एकनाथांचे आत्मनिवेदन – श्रीरामांच्या अनुमतीनेच मी लिहितो :

विषम जरी रामचरित्र । तरी ते कथा चिन्मात्र ।
जनार्दनकृपा अति उदार । कथा सुखसार स्वानंदे ॥६॥
माझे जे वदतें वदन । स्वये जाला रघुनंदन ।
वचनावचनीं निर्वचन । कथा पावन श्रीरामे ॥७॥
श्रीरामकथेचा गुह्यार्थ । यथार्थ वदवी रघुनाथ ।
माझे हाती लेखणी द‍ऊत । कथा लिहिवीत श्रीराम ॥८॥
माझे दृष्टीचें देखणेपण । श्रीराम होवोनि आपण ।
दावई कथानिरुपण । जागृतिस्वप्नसुषुप्तीं ॥९॥

सर्व अवस्थांमध्ये श्रीरामांचाच ध्यास :

जागृती स्वये कर्म करिता । तंव कर्मी प्रकटे श्रीरामकथा ।
स्वप्नीं प्रकटे निजगुजवार्ता । होय सांगता श्रीराम ॥१०॥
सुषुप्तीं करिता सुखें शयन । तेथे नाही जन्ममरण ।
नाही कर्मधर्माचरण । सुषुप्ति पूर्ण श्रीराम ॥११॥
करु बैसता भोजन । ग्रासोग्रासी रामायण ।
जेवणीं गोड श्रीरामभजन । दावी आपण श्रीराम ॥१२॥
चवी चाखता रसाआंत । रसस्वाद श्रीरघुनाथ ।
करोनि भोजनाचा अंत । रामायणार्थ राम दावी ॥१३॥
चाखूं जाता रसस्वादन । रस रसना रघुनंदन ।
श्रीरामे स्वानंदभोजन । रामायण अति गोड ॥१४॥
चाखता रामायणगोडी । रस रसना रसत्व सांडी ।
दृष्टि दृश्याते ओसंडी । जोडितां जोडी रामकथा ॥१५॥
करु जाता सुखें शयन । विसरों नेदी रामायण ।
शेज बाज अंथरुण । होय आपण श्रीराम ॥१६॥
रामायण लिहावयाअर्थी । जागृती स्वप्नीं आणि सुषुप्तीं ।
विसंबेना रघुपती । अहोरातीं रामकथा ॥१७॥

अहोरात्र त्यांच्याकडूनच मला प्रेरणा होत आहे :

रामायण लिहावयासाठीं । रामे पुरविली माझी पाठी ।
मीपण हरोनि हटाहटी । कथा मराठी स्वये दावी ॥१८॥
श्रीरामाची रामकथा । ते चहू मुक्तींते हाणी लाता ।
निर्भर्त्सून चहू पुरुषार्था । कथार्थता परब्रह्म ॥१९॥
एवढा साधकाचा स्वार्थ । सधावया श्रीरघुनाथ ।
रामायण स्वये लिहिवीत । शुद्ध परमार्थ रामकथा ॥२०॥

हरिकथा निरुपणाचे फळ :

असो हरिकथानिरुपण । नित्य करिता नामस्मरण ।
स्वये ब्रह्म ये ओरसोन । जेंवी का धेनु वत्सासीं ॥२१॥
रामनाम्स्मरणासाठीं । परब्रह्मींच पडे मिठी ।
ते नाम सांडून करटी । करिती अटाटी कुशमृत्तिकां ॥२२॥
न कर्मणा न प्रजया श्रुती । कर्मे नव्हे पदप्राप्ती ।
कर्मे ते देहधर्मास्थिती । परब्रह्मप्राप्ती रामनामे ॥२३॥
ऐसी रामनामाची ख्याती । तो श्रीराम लंकेप्रती ।
घेवोनि आला वानरपंक्ती । लंकापती दंडावया ॥२४॥

ससैन्ये सागरे तीर्णे रामे दशरथात्मजे ।
अमात्यौ रावणः श्रीमानब्रवीच्छुकसारणौ ॥१॥
वानरी तनुमास्थाय परिसंख्यातुमर्हथः ।
बलं यात्राविधानं च योधानां च विनिर्णयः ॥२॥
व्यवसायं च रामस्य वीर्यं प्रहरणानि च ।
लक्ष्मणस्य च सौ‍मित्रेस्तत्वतो ज्ञातुमर्हथः ॥३॥

युद्धकांडाचा विषयप्रवेश :

समुद्री सेतु बांधोन । वानरसेना घेऊन ।
लंके आला रघुनंदन । भेरी निशाण लाऊनी ॥२५॥

श्रीरामांचे लंकेत आगमन, त्याचा रावणावर
झालेला परिणाम शुकसारण या हेरांना पाठवितो :

आला देखोनि रघुनंदन । रावण जाला अति उद्विग्न ।
पाचारोनि शुकसारण । दुःख दारुण आलोची ॥२६॥
माझे प्रधान उन्मत्त पूर्ण । नाही स्वहिताची आठवण ।
करिता वारुणीमाध्वीमद्यपान । तेथे पाठवी कोण हेर चार ॥२७॥
असो माझ्या प्रधानांची कथा । माझी मजचि पडली चिंता ।
लंके आल्या श्रीरघुनाथा । काय म्या आता करावे ॥२८॥
तुम्ही जावोनि हेरवृत्तीं । श्रीरामसैन्य आहे किती ।
झुंझार आणि वीरवृत्ती । संख्या मजप्रती सांगावी ॥२९॥
श्रीरामाचा उत्साह पूर्ण । शास्त्रास्त्रें दुर्धर बाण ।
सखा सौ‍मित्र लक्ष्मण । त्याची आंगवण मज सांगा ॥३०॥
श्रीरामाचे बळ दळ । वानरांचे शौर्य शीळ ।
लक्ष्मणाचा रणकल्लोळ । करोनि विवळ मज सांगा ॥३१॥

इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
कपिरुपधरौ वीरौ प्रविष्टौ वानरं बलम् ॥४॥
तौगत्वा मायया च्छन्नौ राक्षसेंद्रस्य मंत्रिणौ ।
सारणश्च शुकश्चैव संख्यातुं नाधिजग्मतुः ॥५॥

वानरांची साद्यंत माहिती आणण्याचा त्यांना हुकूम :

जाता राक्षसवेषस्थिती । कपि तुमचा घात करिती ।
घेवोनि वानरवेषबुंथी । सैन्यसंपत्ती गणावी ॥३२॥
ऐकोनि रावणाचे वचन । शुक आणि सारण ।
वानरवेष धरोनि जाण । आले आपण कपिसैन्यीं ॥३३॥
सैन्य पाहता निवाडे । वानर दाटले चहुकडे ।
रिती पृथ्वी दृष्टी न पडे । मागे पुढे कोंदले ॥३४॥
वानर दाटले भुतळीं । वानर दाटले नभःस्थळी ।
वानर दाटले जळी-स्थळी । लंकामूळीं कलकलती ॥३५॥
तेथे करिता शंखस्फुरण । वानरसंख्या न करवे जाण ।
थोटावले शुकसारण । वानरगण न गणवती ॥३६॥
एक आदळले लंकेसी । असंख्य वानर आकाशी ।
कपि कोंदले पृथ्वीसीं । सिंधूपासीं अगणित ॥३७॥
मागून वानरांच्या परवडी । सवेग धांवतीं तांतडी ।
नळ नीळ अंगद वीकोडी । अति कडाडीं पै आले ॥३८॥
श्रीरामापाठीसीं वानर । अर्बुदें पद्मनिकर ।
त्यांमागें सुग्रीवाचा भार । अति अपार असंख्य ॥३९॥
त्याहिवेगळे पै जुत्पती । वेगळे वेगळे भार नेणो किती ।
संख्या करिता शंखस्फूर्ती । सैन्यसंपत्ती न गणवे ॥४०॥
शोधिता वानर पाळतिनें । तंव लोळखिले बिभिषणे ।
त्यांची लक्षून लक्षणे । धरलें तेणे साटोपे ॥४१॥

तौ ददर्श महामायौ प्रतिच्छन्नौ बिभिषणः ।
ग्राहयित्वा महातेजा वानरैर्वानरोपमौ ॥६॥
आचचक्षे स रामाय तावुभौ शुकसारणौ ।
तौ दृष्ट्वा व्यथितौ रामं निराशौ जीवितं प्रति ॥७॥
सुप्रसन्नोऽब्रवीद्रामः सर्वभुतहिते रतः ।
वधार्हौ वा प्रमुंचामि दृष्ट्वा सैन्य; समंततः ॥८॥
वक्तव्यं राक्षसं गत्वा यथोक्तं वचनं मम ।
श्वोभूते नगरी लंका सप्राकारां सतोरणाम् ॥९॥
रक्षसां च बलं पश्य शरैर्विध्वंसितं मया ॥१०॥

बिभीषण त्या हेरांना ओळखतो व श्रीरामांकडे त्यांना नेतो,
श्रीराम त्यांना शिक्षा न करिता सोडून देतात :

दोही हेरांचें लक्षण । लक्षूं जाणे बिभीषण ।
त्याही लक्षणांचे लक्षण । अति विंदाण अवधारा ॥४२॥
उड्डाण विराण उलटें किरण । करु नेणती शुक सारण ।
अवघे म्हणती कपटी पूर्ण । धरी धांवोन बिभीषण ॥४३॥
आणिके त्यासी धरु जाता । दोघे पळती लघुलाघवता ।
बिभीषण जाणे राक्षसा समस्ता । हो‍य धरिता धांवोनी ॥४४॥
वानरी बाधोनि वानरवेशी । शीघ्र आणिले रामापासी ।
राम कृपाळु सर्व भूतांसी । काय त्यांसी बोलता ॥४५॥
रावण चोर तुम्ही त्याचे हेर । वधा योग्य बोले शास्त्र ।
तरी मी न मारी साचार । वानरभार पहा माझा ॥४६॥
आणिकापासून हे पळती । म्हणोनि दिधले हनुम्याहाती ।
राक्षस मावांची व्युत्पत्ती । पुच्छप्रती चालेना ॥४७॥
दोघे धरोनि पुच्छावतीं । स्तोमें स्तोमे ऋक्षजुत्पती ।
दाखविली सैन्यसंपत्ती । रावणाप्रती सांगावया ॥४८॥
तुम्ही दोघे मारलिया जाण । कोण आमुचे दादुलेपण ।
रावणापासी माझे वचन । स्वये गर्जोन सांगावे ॥४९॥
प्रातःकाळी कडकडाट । करीन राक्षसा सपाट ।
बाणी भेदून त्रिकूट । दशकंठ छेदीन ॥५०॥
माझे बाण सुटल्या देखा । झाडिती तोरणे पताका ।
बाणी विध्वंसूनि लंका । दशमुखा छेदीन ॥५१॥
अपराधी निरपराधी । श्रीराम पाहे समानबुद्धी ।
दोघे सोडविले त्रिशुद्धी । कृपानिधि कृपाळुवे ॥५२॥
सांगोनि पराक्रम पुरुषार्थ । दोघा करविलें निर्मुक्त ।
स्वये चळचळा कांपत । लंकेआंत ते आले ॥५३॥

इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
आगम्य नगरी लंकामब्रूतां राक्षसाधिपत् ॥११॥
बिभीषणगृहीतौ तौ वधार्थ राक्षसेश्वरः ।
दृष्ट्वा धर्मात्मना मुक्तौ रामेणमिततेजसा ॥१२॥
एकस्थानगता यत्र चत्वारः पुरुषर्षभाः ।
रामो दाशरथिःश्रीमान्लक्ष्मणश्च बिभीषणः ॥१३॥
सुग्रीवश्च महातेजा महेंद्रसमविक्रमः ।
एते शक्ताः पुरी लंकां सप्राकारां सतोरणाम् ॥१४॥
उत्पाट्य संक्रामयितुं सर्वे तिष्ठंतु वानरः।
यादृशी श्रीहि रामस्य वीर्यं प्रहरणानि च ॥१५॥
हनिष्यति पुरी लंकामेकस्तिष्ठंतु ते त्रयः ॥१६॥

हेरांची शोचनीय अवस्था :

चोर अपराधी वधयुक्त । ते श्रीरामे केले निर्मुक्त ।
धाके चळचिळां कांपत । आले धांवत लंकेसी ॥५४॥
रावण देखतांहि दृष्टी । धांके धाप न सामये पोटी ।
बोबडी वळलीसे होटीं । सांगता गोष्टी चळकांप ॥५५॥
स्वस्थ होवोनि निवाडे । गोष्टी सांगती रावणापुढें ।
वानरसैन्य असंख्या गाढे । संख्या न घडे निश्चित ॥५६॥
आम्ही जाता दोघे जण । बिभीषणें धरिले ओळखोन ।
नेतां रामापासी बाधोन । अचूक मरण आम्ही मानूं ॥५७॥
माराणें म्हणे बिभीषण । मारा म्हणती वानरगण ।
राम धर्मात्मा आपण । दिधले सोडून प्रतापदृष्टीं ॥५८॥
हे मारिल्या दोघे जण । आम्ही काय जिंतिला रावण ।
त्यांसी दाखवा वानरसैन्य । पाळती गणा सर्वही ॥५९॥

त्यांना मिळालेला रामांचा आदेश ते रावणाला सांगतात :

देवोनि हनुमंताचे हाती । आम्हा दाखविली सैन्यसंपत्ती ।
असंख्य वानरांचिया जाती । संख्या सर्वार्थी न करवे ॥६०॥
एक एक मर्कट । वधू पाहे दशकंठ ।
लंका मानिती फोलकट । बळं उद्‌भट वानरा ॥६१॥
सप्राकार सतोरण । विध्वंसावया लंकाभुवन ।
चौघांपासीं प्रताप पूर्ण । कोण कोण ते ऐका ॥६२॥
श्रीराम आणि लक्ष्मण । घरचा भेदी बिभीषण ।
सुग्रीव राजा विजयी पूर्ण । म्हणती क्षणे रावन निर्दाळूं ॥६३॥
लंका उपडोनियां संमूळीं । निक्षेपावया समुद्रजळी ।
हेचि चौघे आतुर्बळी । करावया होळी राक्षसा ॥६४॥
असो या तिघांच्या ख्याती । एकाला एक रघुपती ।
रावण वधून बाणावर्ती । लंका भस्मांती नेऊ पाहे ॥६५॥
आडवे आलिया प्रधान । इंद्रजित मकराक्ष कुंभकर्ण ।
अतिकायादिपुत्रदळण । लंकाभुवन भस्मांत ॥६६॥
राक्षसांची जाती व्यक्ती । रणी करील समाप्ती ।
एवढा प्रतापी श्रीरघुपती । एकला त्रिजगती दमूं शके ॥६७॥
प्रताप पुरुषार्थ गर्जोन । स्वये बोलिला रघुनंदन ।
प्रभाते रणकंदण । करीन रावणवधार्थ ॥६८॥
ऐकोनी सारणाचें वचन । रावण जाला अति उद्विग्न ।
ते देखोनि त्याचे चिन्ह । सांगे सारण हितवाक्य ॥६९॥
युद्ध करिता दशशिर । रणी नाटोपती वानर ।
निर्दाळोनि निशाचर । लंकापुर विभांडिती ॥७०॥
वानरांपुढे नुरें दळ । वानरांसी न चले बळ ।
वानरांशी युद्धकल्लोळ । सर्वथा सकळ करु नये ॥७१॥

प्रहृष्टयोधध्वजिनी वनौकसां ।
महात्मनां संप्रति युद्धमिच्छताम् ।
अलं विरोधेन शमो विधीयतां ।
प्रदीयतां दाशरथेर्हि मैथिली ॥१७॥

श्रीराम आणि लक्ष्मण । शस्त्रास्त्रीं अति प्रवीण ।
त्यांसीं सर्वथा न करवे रण । सुटल्या बाण प्राणांत ॥७२॥
हेचि चौघे रणकंदनार्थ । करावया हर्षेयुक्त ।
शस्त्रास्त्रीं अति उदित । राक्षसांत श्रीराम ॥७३॥
तैसेच वानर समस्त । युद्धी थांबवोनि श्रीरघुनाथ ।
निर्दाळावया लंकानाथ । आज्ञा पुसत आल्हादे ॥७४॥
विजयध्वजी वानरसेना । सुग्रीवे पाळिली जाणा ।
निर्दाळावया रावणा । आंगवण पावती ॥७५॥
सुग्रीव राजा उठाउठी । उडी घालोनि त्रिकूटी ।
मारील राक्षसांच्या कोटी । आवघ्यांशेवटीं रावण ॥७६॥
असो ह्या म्हावीरांची मात । एकला एक हनुमंत ।
करु पाहे तो लंकाघात । त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा ॥७७॥

त्यांच्याकडून सूचना :

त्यासी न करावे रण । त्रिसत्य सत्य रावणा जाण ।
सीता देऊनि रिघतां शरण । कृतकल्याण पावसी ॥७८॥
सीता अर्पावी श्रीरघुनाथा । यालागी चरणी ठेवतों माथा ।
नको नको युद्धकथा । प्राणांतव्यथा पावसी ॥७९॥
सीता देउनि आवश्यक । सखा केलिया रघुकुळटिळक ।
सार्थक इहलोक परलोक । परम सुख पावसी ॥८०॥
हित पथ्य सत्य पूर्ण । ऐकोनि सारणाचें वचन ।
रावण वदे दुरभिमान । दुष्टदुर्जन दुरुक्ती ॥८१॥

तद्वचः पथ्यमक्लिष्टं सारणेनाभिभाषितम् ।
निशम्य रावणो राजा प्रत्यभाषत सारणम् ॥१८॥
यदि मामभियुंजारन्देवगंधर्वदानवाः ।
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकभयादपि ॥१९॥
त्वं तु सौ‍म्य पैरित्रस्तस्तो दृष्ट्वा हरिवाहिनीम् ।
प्रतिपदानं सीताया अतत्स्वं साधु मन्यसे ॥२०॥

त्यावर रावणाची प्रतिक्रिया :

देव दानव गंधर्वयुक्त । सुरेंद्र आलिया पाया पडत ।
तरी सीता न करी मी निर्मुक्त । जाण निश्चित सारणा ॥८२॥
शिव आलिया त्रिशूळयुक्त । ब्रह्मा आलिया शाप देत ।
ऐसाही मांडल्या प्राणांत । सीता निर्मुक्त मी न करी ॥८३॥
तू तंव भेड हीन दीन । देखोनि वानरांचे सैन्य ।
भय घेतलें दारुण । कंपायमान बोलसी ॥८४॥

हेरांचा धिक्कार :

भेणे भयें म्हणसी आता । सीता अर्पावी रघुनाथा ।
हे तंव तुझी सभय कथा । मी सर्वथा नायके ॥८५॥
आता कळलें मज तत्वता । श्रीराम न करी तुमच्या घाता ।
दोघे सोडिले जीवे जीता । यालागी सीता तू दे म्हणसई ॥८६॥
अनुसरलासी श्रीरामाकडे । त्याचे भय सांगसी गाढे ।
जे जे बोलसी ते कुडे । दोनी भ्याडें नपुसक ॥८७॥
जो ज्याचे राखी जीवित । तो त्याचा होय अति आप्त ।
यालागी तू म्हणसी येथ । सीता निर्मुक्त करावी ॥८८॥
आता तुम्ही दोघे जण । श्रीरामाचे आप्त पूर्ण ।
मजसंमुख माझे अवगुण । अति कठिण अनुवादतीं ॥८९॥

राजदंडपरामृष्टास्तिष्ठंते नापराधिनः ।
हन्यामहं त्विमौ पापौ शत्रुपक्षप्रशंसकौ ॥२१॥
तेनैव मुक्तौ सुप्रीतावुभौ तौ शुकसारणौ ।
रावणं जयशब्देन प्रतिपूज्याभिनिःसृतौ ॥२२॥

यापुढे राजदोष सांगणारांना शासनः

राजदोष जे अनुवादती । ते अपराधी शास्त्रनीतीं ।
दंड पावला माझे हाती । पापमूर्तीं तुम्ही दोघे ॥९०॥
वीर्य शौर्य बळ संपूर्ण । वैरियाचे अत्यंत वानां गुण ।
माझे अनुवादां अवगुण । वध्य संपूर्ण तुम्ही दोघे ॥९१॥
सत्यासत्यविवेक पूर्ण । न करितांचि रावण ।
वधावया शुक सारण । शस्त्र सज्जून उठिला ॥९२॥
रावणा वधिती वानरगण । ऐसे अनुवादां दोघे जण ।
तुमचा घेईन मी प्राण । पक्षपाती पूर्ण रामाचे ॥९३॥
हेर चार अवध्य पूर्ण । श्रीरामाने दिधले सोडून ।
त्यांचे मी केंवी करी हनन । लज्जायमान रावण ॥९४॥
ऐसियापरी रावण । दवडोनि शुक सरण ।
कोपे म्हणे काळे वदन । मुख परतोन न दावावें ॥९५॥
जयशब्दें रावणस्तुती । करुनि शुक सारण पुढतीं ।
रावण पडला चिंतावर्ती सबळ रघुपती देखोनी ॥९६॥

रावण शार्दूलास पाठवितो :

गेलिया शुक सारण । चिंतावर्ती पडे रावण ।
शार्दूल चार विचक्षण । धाडी कपिसैन्य गणावया ॥९७॥
चारांमाजीं प्रबळबळ । लघुलाघवी अति कुशल ।
यालागी नांवे शार्दूळ । वानरदळ गणूं आला ॥९८॥
शार्दूळ जंव स्वये पाहत । तंव वानरसैन्य असंख्यात ।
गणावया वाचा चित्त । जेथींचा तेथ पांगुळला ॥९९॥

बिभीषणेन तत्रस्था निगृहीतो यद्दच्छया ।
शार्दूलो ग्राहितस्त्वेकः पापोयमिति राक्षसाः ॥२३॥
वानरैर्दितास्ते तु विक्रांतैर्लघुविक्रमैः ।
पुनर्लंकामनुप्राप्तो विमुक्तो रामशासनात् ॥२४॥

शार्दूळ येतांच देखोन । बिभीषणें धरिला ओळखोन ।
नेला दृढपाशीं बांधोन । रघुनंदनसभेसीं ॥१००॥

त्याला ओळखून रामापुढे आणल्यावर त्यालाही रामांनी सोडून दिले :

वानर हाणिती दृढ मुष्टी । लाता देती कटी पृष्ठीं ।
श्रीराम कृपाळू जगजेठी । कृपादृष्टीं सोडिला ॥१॥
धरुनि आणिला अति संकटीं । चार हेर मारिल्यासाठीं ।
काय ते वाढीव होय मोठी । बुद्धि करंटी अल्पक ॥२॥
श्रीरामे शार्दूळ पाचारुन । दाखवून वानरसैन्य ।
त्यासी देवोनि सन्मान । दिधला सोडून साक्षेपे ॥३॥
श्रीरामे सोडितांचि देख । घेवोनि वानरांचा धाक ।
शार्दूळ लंकेसंमुख । गेला दशमुख ठाकोनि ॥४॥
सर्वांगी रुधिरोक्षित । शार्दूळ देखोनिया येत ।
दचकला लंकानाथ । बळोद्धत वानर ॥५॥
शार्दूळाचा अति पुरुषार्थ । त्यासी वानरी घातली लात ।
रडत पडत अति कुंथत । आला थकत सभेसीं ॥६॥
श्रीरामकटकीं चारपण । न चले बिभीषणाभेण ।
तो धरिता दृढ बांधोन । रघुनंदन सोडवित ॥७॥
एका जनार्दना शरण । रावणे पाहता वानरसैन्य ।
श्रीराम करील छत्रभंजन । अनुसंधान बाणे एके ॥८॥
ऐसे गोड निरुपण । श्रोती व्हावे सावधान ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥९॥
रम्य रामायणी कथा । अति रमणीय वाल्मीक वक्ता ।
अनागत भाष्य वदला कथा । साधुसंता सुखकारी ॥११०॥
कथा सकामासी गोड । निष्कामाचे पुरवी कोड ।
सदाशिवासी सुखसुरवाड । गोडाही गोड रामकथा ॥११॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
चारप्रेरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
ओव्या ॥१११॥ श्लोक ॥२४॥ एवं ॥१३५॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग