वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६८. भक्तीचे माहात्म्य

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088192 · अभंग क्र. ६८

68.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अडुसष्टावा ॥
सीतेचे दिव्य

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ततो वैश्रवणे राजा यमश्च पितृभिः सह ।
सहस्त्राक्षश्च देवेशो वरुणश्च जलेश्वरः ॥१॥
त्रिशूलपाणिर्विश्वेशो महादेवो वृषध्वजः ।
कर्ता सर्वस्य लोकस्य ब्रह्मा च भगवान्प्रभुः ॥२॥
स च राजा दशरथो विमानेनांतरिक्षगः ।
अभ्याजगाम तं देशं देवराजसमद्युतिः ॥३॥
एते सर्वे समागम्य विमानैः सूर्यसंनिभैः ।
अभ्यभाषंत काकुत्स्थं मधुरं वाक्यगौरवात ॥४॥

कुबेर, यम, वरुणादि देवांसह दशरथांचे त्या ठिकाणी आगमन :

वैश्रवण जो कुबेर । धनवंताचा राजा सधर ।
भगवंताचा भांडारघर । तेथे सत्वर पातला ॥१॥
अर्यमा पितरसमवेत । यम पातला प्रेतनाथ ।
सहस्राक्ष देवनाथ । मरुद्‌गणेंसहित पातला ॥२॥
अपांपती अति वोजा । वरुण आला अमृतराजा ।
विनवावया रघुराजा । सीताकाजा पै आले ॥३॥
त्रिशूळपाणी वृषभध्वज । गोक्षीरधाम धवळ सहज ।
पिनाकयुक्त गणसमाज । साठीं सहस्रांसमवेत ॥४॥
त्रिनेत्र पंचवक्त्र । दशभुजा अति परिकर ।
अर्धांगी गिरिजा सुंदर । अति मनोहर तेथे आला ॥५॥
जो स्रजिता सकळांसी । पितामह म्हणती ज्यासी ।
तो सत्यलोकनिवासी । जानकीकाजासी ब्रह्मा आला ॥६॥
रावण पार्षद वैकुंठींचा । श्रीरामे वध केला त्याचा ।
अधिकार पावोनि निजाचा । गेला जेथींचा पै तेथे ॥७॥

रावणाने वैकुंठात असलेल्या दशरथाला राम प्रताप निवेदन केला :

तंव तेथे दशरथ । वैकुठीं देखिला नांदत ।
तेणे रावण आनंदभरित । ख्याति वानित रामाची ॥८॥
सीताव्याजेंकरोनी । सागरी शिळा तारोनी ।
रामे वधिला दशाननी । अभिनव करणी पै केली ॥९॥
लंके अभिषेकिला बिभीषण । सोडविले सीतानिधान ।
अतुलकीर्ती रघुनंदन । दाता समान अरिमित्रा ॥११॥
रावणमुखें श्रीरामकथा । ऐकोनि आनंद दशरथा ।
पहावया श्रीरघुनाथा । सत्वर तो तेथे आला ॥१२॥
शंकरादि देवांसमवेत । श्रीरामजनक दशरथ ।
ब्रह्मा इंद्र आले तेथ । जानकीचरित्र पहावया ॥१३॥
सूर्यप्रभा समसमान । विमाने विमानी पै देदिप्यमान ।
अंतरिक्ष व्यापिले गगन । श्रीराम आपण जेथे असे ॥१४॥
ककुत्स्थकुळीं उत्पत्ती । म्हणोनि काकुत्स्थ रघुपती ।
नामनिर्देश निश्चिती । वेदश्रुतिपुराणें ॥१५॥

सीतेसाठी ब्रह्मदेवाची श्रीरामांना विनंती :

ब्रह्मा जो का लोकपती । मस्तकांजली विनयवृत्ती ।
सकळ देवेंसी विनंती । सीताउद्देशें करीतसे ॥१६॥
अति अक्षोभ्य सागर । शिळांनीं बुजोनि सत्वर ।
पराक्रमें वानरभार । क्षणे परपार पावविला ॥१७॥
करोनिया महारण । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
रणी निवटिला रावण । सकुळप्रधानसमवेत ॥१८॥
बिभीषण लंकापती । जियेलागीं केला रघुपती ।
ते भेटलिया सीता सती । उपेक्षावृत्ती का केली ॥१९॥
राम भक्तजनवत्सल । ऐसा ब्रीदाचा कल्लोळ ।
तुझे अर्धांग जनकबाळ । उपेक्षाशीळ केंवी रामा ॥२०॥
क्षमा करी रघुनाथा । कृपाहस्त ठेंवी माथा ।
वेगी उठवावी सीता । विचार अन्यथा न करावा ॥२१॥

श्रीरामांनी देवांच्या विनंतीलाही प्रतिवचन न दिल्यामुळें वानरमंडळी खवळली :

ऐसे ऐकोनिया वचन । उगाचि पाहत रघुनंदन ।
कांही नेदी प्रतिवचन । तेणे वानरगण खवळले ॥२२॥
आधींच मर्कटें आळुकी । वरी संधि साधिली नेटकी ।
कोल्लाळ मांडिला सकळिकीं । का हो जानकी उपेक्षिली ॥२३॥
सुग्रीव राजा वानरनाथ । अंगद आणि जांबवंत ।
नळनीळादि बहुत । वानर समस्त बोलती ॥२४॥
जिचेनि धर्मे श्रीरामा । स्वामी जोडला आम्हा ।
श्रीरामभक्ति प्लंवगमा । अगाध महिमा त्रैलोक्यी ॥२५॥
ते मुख्य सीता सती । जवळी असल्या रघुपती ।
उपेक्षिली निमेषगती । देवीं विनंती पै करिता ॥२६॥
तेणे वानरा भय संभवे । केंवी करावे रामसेवे ।
जीव गेलियाहीं जीवे । धीर नव्हे भजनासी ॥२७॥
उपेक्षिले निजवधूसी । तो सेव्य केंवी वानरांसी ।
श्रीरामसेवा करु कैसी । वानरांसी भय भारी ॥२८॥

अशा निर्वाणसमयीं बिभीषणाची रामांना प्रार्थना :

थोर मांडिलें निर्वाण । हडबडिले वानरगण ।
ते देखोनि बिभीषण । करोनि नमन विनवित ॥२९॥
उपेक्षितां जानकीसी । भय सुटलें सकळांसी ।
राम कृपाळु विश्वासी । हे पुराणांसी मंडण ॥३०॥
उभारोनियां निजहस्त । गर्जताती शास्त्रार्थ ।
राम कृपाळु निश्चित । वेदसंमत हे बोली ॥३१॥
ती ब्रीदें अंगीकारीं । जानकीतें कृपा करी ।
तंव सौ‍मित्र ते संधीमाझारीं । विनंती करी मधुरवाणी ॥३२॥

लक्ष्मणाची प्रार्थना :

विनविताहे शरणागत । तो मानावा वचनार्थ ।
तू कृपाळु रघुनाथ । मनोगत रक्षावें ॥३३॥
ऐसे विनविता समस्त । श्रीराम उगाचि तटस्थ ।
मग विनवी कपिनाथ । काय निवांत पाहसी ॥३४॥
आकांत होतसे सकळांसी । आणि तू निवांत मानसी ।
निष्ठुर ऐसा कैसा होसी । जानकीसी प्राणांत ॥३५॥
ऊठ चाल पाहसी काये । सीता मूर्च्छित पडली आहे ।
झणें तिचा प्राण जाये । करावे काय मग तेव्हा ॥३६॥
ऐकोनि त्याचा वचनार्थ । हनुमान उल्लासें असे बोलत ।
स्त्रीपुरुषांचा जो एकांत । त्याचा इत्यर्थ तुम्ही केंवी जाणा ॥३७॥
ऐसे बोलोनिया जाण । उठता झाला वायुनंदन ।
ज्याचे ऐकता वचन । श्रीरघुनंदन संतुष्ट ॥३८॥
जो भक्तिसुखाचा सागरू । भजनधर्मासी सद्‌गुरु ।
निश्चयाचा महामेरु । धैर्य निर्धारु त्याचेनी ॥३९॥
अबलांचे तरी जीवन । साधकांसी साधन ।
सिद्धासी समाधान । अमृता जीवन वचन ज्याचे ॥४०॥

सीतेची बाजू घेऊन मारुतीचे श्रीरामांना सांगणे :

प्रेमाचे उभाडे देखा । देखोनो जानकीच्या दुःखा ।
जवळी येवोनि रगुकुळटिळका । सकळ लोका देखता ॥४१॥
प्रीतिप्रेमाचे आवेशी । तिक्ष्ण उत्तरें श्रीरामासी ।
बोलता जाला कुशळतेसी । जानकीपक्षासी घेवोनी ॥४२॥
स्वामिसेवकांचे वचन । प्रीतिरोषयुक्त पूर्ण ।
प्रेमकलहाचें लक्षण । वदावया वदन मज कैचे ॥४३॥
दोहींच्या अंतरी प्रवेशवे । तै दोहींचें हरिद्र जाणवे ।
हे असंभाव्य केवी संभवे । अंतर वदवे स्वामिसेवकांचे ॥४४॥
परि सत्कुळाचें कुळवंत । पंचायतनींचे आदिदैवत ।
त्या सद्‍गुरुचे मनोगत । विचरे निश्चित मनामाजी ॥४५॥
त्याची कृपा उपायदाने । असंभाव्य ही ये भावने ।
अचिंत्य आकळे चित्तचिंतनें । निर्विकल्प मनें कल्पवे ॥४६॥
अलक्ष्य लक्षेंवीण दिसे । अमृर्तीची मुर्ति भासे ।
अवाच्याही शब्दासारिसें । सावकाशे बोलवे ॥४७॥
शंखासुर श्रीअनंते । निवटिला स्वसामर्थ्ये ।
कलेवर पिळूनि तेथे । निजहस्ते काढिले ॥४८॥
सवेंचि प्रीतिपुरःसर । प्रसन्न होवोनि वेगवत्तर ।
हाती घेऊनि कलेवर । ध्वनि विचित्र वाजवी ॥४९॥
तोचि मजलागी पूर्ण । अवतरला एकाजनार्दन ।
निवटोनि ममभिमान । कलेवर जाण अंगीकारिले ॥५०॥
मन बुद्धी चित्ताभिमान । स्वयेंचि होवोनि आपण ।
गिरेमाजी प्रवेशोन । निजगुणवर्णन करीतसे ॥५१॥
जेंवी शंखाचा उत्तम ध्वनी । संबंध नाही पांचजन्यीं ।
निगालिया कर्कश ध्वनी । लाज मनी नाही शंका ॥५२॥
तेंवी ग्रंथ सुरसविरसता । एकाजनार्दनाचे माथा ।
जैसे जैसे आवडे चित्ता । तैसी कथा वदतसे ॥५३॥
य़ालागीं श्रोते जन । न ठेवावें भूषण दूषण ।
वक्ता एकाजनारदन । कथाकीर्तन करीतसे ॥५४॥
असो आता परिहार । परिहार तोचि अहंकार ।
वक्ता एक एकांगवीर । वाग्व्यापार चाळित ॥५५॥
पुढे श्रीराममारुती । बोलते जाले कवणे स्थिती ।
श्रोती अवधान द्यावे चित्ती । दोघांची स्थिती अनुपम ॥५६॥

जानकीविषयी श्रीरामांची उदासस्थिती पाहून
मारुतीचे परखड विचार त्याने रामांना ऐकविले :

उदास देखोनि रघूत्तम । खवळला तो प्लवंगम ।
बोलावया उपक्रम । स्वये सुवर्म चाळित ॥५७॥
इंद्र शंकर ब्रह्मादिक । नर वानर सकळिक ।
मस्तकांजाळि देख । करिती आवश्यक प्रार्थना ॥५८॥
अव्हेरुन विनंतीसी । उपेक्षितां जानकीसी ।
बोल लागेल स्वधर्मासी । कठिणता अंगासी येईल ॥५९॥
सर्वांतर्यामी श्रीराम । अरि मित्र सदा सम ।
तेणे सांडिला स्वधर्म । परम अधर्म मांडिला ॥६०॥
सती पतिव्रता जानकी । निष्पाप एक तिही लोकी ।
श्रीरामे ते उपेक्षिली की । जघन्य लौकिकी वाढेल ॥६१॥
जीलागीं होवोनियां वेडे । सैरा वनोवन हिंडे ।
स्वये वेंटाळून झाडे । वाडेकोडें सीताभावें ॥६२॥
जीलागीं वनांत । सैरा धांवे रघुनाथ ।
पाषाणातें आलिंगित । आता होत उदास ॥६३॥
जियेचेनि वियोगबळें । चंद्रकिराणीं श्रीराम पोळे ।
सुमनमाळा अंगी सळे । जैसे रुपलें सूचिकाग्र ॥६४॥
चंदनाचें उद्वर्तन । अग्निस्फुलिंगवत् जाण ।
वियोंगें पूर्ण व्यापिले मन । अवस्था दारुण जीलागीं ॥६५॥
सखा बंधु लक्ष्मण । त्यासी मारुं धांवे आपण ।
सीतामय झाले मन । वियोगें पूर्ण व्यापिला ॥६६॥
दुर्जन अपवाद देख । जगी बोलती अनेक ।
ऐसे जघन्य अलौकिक । माथा निःशंक वाजेल ॥६७॥
आणीकही अपूर्व श्रीरामा । विनविता या प्लवंगमा ।
त्यांसी उत्तर न दैसी रामा । तेणे आम्हा भय भारी ॥६८॥
श्रीराम कृपेचा सागर । ऐसा ब्रीदाचा गजर ।
त्यावरी आला तमाचा पूर । कृपा समग्र वाहवली ॥६९॥
तरी हे आजि कळलें देखा । राम प्राकृत आम्हांसारिखा ।
राम आतुडला विकल्पादिकां । ऐसे लोका मानेल ॥७०॥
निरसावया संसार । सेवावा श्रीरघुवीर ।
तो राहिला पै विचार । ऐसे समग्र मानिती ॥७१॥
सर्वस्व त्यागून वहिले । पोटी पाले बांधिले ।
रामसेवे जीवित्व वेंचिलें । ते फळा आले रोकडेंची ॥७२॥
सीताप्राप्तीलागीं येथ । बहुत कष्टला रघुनाथ ।
सैन्यासी आहार पुरवित । भांतें घालित मोजमोजूं ॥७३॥
आपण मेळवावें फळ । सेवूनि भजावे अविकळ ।
अथवा सेवूनि असावे जळ । राम केवळ साधावया ॥७४॥
एके बापुडीं वारियावरी । राहोनिया निर्धारी ।
राम पाहती चराचरी । भेटी तरी पै नेदी ॥७५॥

श्रीराम निष्टुर आहेत असे चराचर मानील म्हणून तसे न करिता
जानकीची उपेक्षा करु नये म्हणून रामांना मारुतीने लोटांगण घातले :

श्रीराम ऐसा निष्ठुर । म्हणोनिया चराचर ।
भयातीत पै समग्र । केंवी रघुवीर् सेवावा ॥७६॥
यालागी सकळ जना । भय संचलें रघुनंदना ।
जेणे उपेक्षिली निजांगना । तो अबळा जना केंवी सेव्य ॥७७॥
ऐसे न करावे स्वामिनाथा । म्हणोनि चरणी ठेविला माथा ।
आश्वासावी जनकदुहिता । निर्वाण आता न पहावे ॥७८॥
ऐकोनि त्याच्या वचनार्था । आश्चर्य जाले रघुनाथा ।
निस्पृहें वरी तत्वता । नचले सत्ता कोणाची ॥७९॥
जे उदास देहावरी । स्वामित्वाची आज्ञा करी ।
उत्तर नेदी सुरासुरी । तो कपिकेसरी विनवित ॥८०॥

स्त्रिया या कधीही विश्वासार्ह मानू नयेत असे श्रीराम मारुतीला सांगतात :

झणें कोपसी हनुमंता । म्हणोनि नमन होय करिता ।
आठवावे पूर्ववृत्तांता । कोप तत्वता साडूनी ॥८१॥
तुवा सांगितली होती जैसी । आम्ही देखत नाही तैसी ।
विश्वासों नये गा स्त्रियांसी । जरी मार्दवेंसी बोलत ॥८२॥
जो स्त्रियांचा विश्वास धरी । सद्यः अनर्थ त्याचे शिरी ।
वाजोनियां क्षणाभीतरी । करी बोहरी व्रताची ॥८३॥
भगिनी अथवा दुहिता । एकांती न भेटावी सर्वथा ।
विपायें पै भेटी होता । तेथेंही सर्वथा विकल्प वाढे ॥८४॥
जवळीं असता पतीसी । रिगोनि त्याच्या मानसी ।
केव्हांचि विचरे आणिकासी । हे कोणासी लक्षेना ॥८५॥
मार्गी जाता पै स्वभावे । व्यंकटकटाक्षासवे ।
क्षणे पुरुषातें लोळवावें । कामभावें क्षोभवोनी ॥८६॥

यांदृष्ट्वाचित्तवैकल्पं स्पष्ट्वा सत्यांशसक्षयः ।
संभोगे मरणं याति सा स्त्री प्रत्यक्षराक्षसी ॥५॥

स्त्रीकटाक्षाचे दुष्परिणामः

दृष्टि पडता अवचिती । सुरासुर मोह पावती ।
ते भेटलिया एकांती । कवणा विरक्ती उपजेल ॥८७॥
उभयवर्गामाझारीं । कामक्षोभ एका तर्‍ही ।
येरयेरांची वृत्ती हरी । निंद्यसंचारीं प्रवृत्ते ॥८८॥
स्वभावे जरी दृष्टि पडे । तरी विरक्तीही क्षोभा चढे ।
कामफांसा स्वयेचि पडे । पडे सांकडें अनर्थी ॥८९॥
हे प्रत्यक्ष घडले चंद्रचूडा । भिल्लणी आली दृष्टीपुढां ।
महादेव झाला वेडा । केला उगाडा विरक्तीचा ॥९०॥
पराशरे नावे भीतरी । देखोनि निषादकुमारी ।
दिवसा करोनि अंधारी । तपसामग्री वेंचिली ॥९१॥
आणीक ऐसे सांगो किती । नागवळे तपस्थिती ।
स्त्री भेटल्या एकांती । नव्हे विरक्ती पै कोणा ॥९२॥

कामभावनेने रावणाने सीतेला नेली
असल्याने तिला मी पवित्र कशी मानू ? श्रीराम :

ही तंव केवळ कामभावें । नेली होती दशग्रीवें ।
ती निःसंग केंवी मानावे । रुपभावें मनोरम ॥९३॥
अति सुकुमार सुंदर । तरुणांगी लावण्यकर ।
कळा विन्यास परिकर । मनोहर पै रुप ॥९४॥
आणीकही ऐक कपिनाथा । पूर्वी तुवांचि सांगितली कथा ।
अस्थिमात्र जनकदुहिता । असे तत्वता पै उरली ॥९५॥
रुधिर शोषिलें पै समस्त । मांस आटले जेथीचें तेथ ।
नामे वांचलेंसे जीवित । हर्षयुक्त सांगसी तू ॥९६॥
ते न दिसे येथे कांही । अति विकसित दिसे पाही ।
रचिली असे ठायीच्याठायीं । अपूर्व कायी मी सांगों ॥९७॥
म्हणोनिया संदेहासी । कारण हनुमंता परियेसी ।
तंव कोप तुझे मानसी । अति आवेशी पै आला ॥९८॥
तुज माझे लोटांगण । करुन कोपाचें उपशमन ।
सावध ऐके माझे वचन । म्हणोनि विनवण करितसे ॥९९॥

“जनापवाद लागू नये म्हणून सीतेने दिव्य
करुन आपले पावित्र्य निरपवाद सिद्ध करावे.” श्रीराम :

जनापवाद कठिण भारी । दुर्नाम वाजेल माझे शिरी ।
म्हणतील राम अविचारी । घातली घरी कामलोभें ॥१००॥
ते चुकवावया हनुमंता । उपेक्षिली जनकदुहिता ।
तुम्ही सर्वज्ञ तत्वता । निजचित्ता विवंचा ॥१॥
मुख्य सीता अग्निमुखीं । ऐसे जाणोनि रघुकुळटिळकीं ।
ते भेटावया जानकी । युक्ती निकी मांडिली ॥२॥
केंवी अपवाद चुकविजे । कोण योगें लोक समजे ।
हे विचारोनि कपिसमाजें । मग सांगिजे मजलागी ॥३॥
अत्यंत कृपा सकळांसी । जे अंगीकारावे जानकीसी ।
तरी दिव्य सीतेपासी । सकळ समतेसी पै मागा ॥४॥
सकळ लोकांदेखतां । दिव्य उतरलिया सीता ।
तरी मी अंगीकारीन तत्वता । विचार अन्यथा असेना ॥५॥

श्रीरामांच्या कठोर परंतु निश्चियी वाणीने सर्वांना अतीव दुःख :

ऐकोनिया ते वचन । आंदोळिले त्रिभुवन ।
कठिण गिरा रघुनंदन । वाग्वज्रबाण मोकलिले ॥६॥
ऐकता चळकांप चित्ता । भय सुटलें समस्ता ।
उपाय खुंटला सर्वथा । जनकदुहिता वांचेना ॥७॥
ऐसे मानोनि सकळिकी । आशा सांडिली निःशेखीं ।
होवोनियां अधोमुखी । दुःखपंकीं निमग्न ॥८॥
कठिण ऐसे वाग्वज्र । ऐकोनिया हनुमान वीर ।
बोलों आदरिलें उत्तर । श्रीरघुवीर लक्षोनी ॥९॥

धीरवीर मारुतीने श्रीरामांना सीतेचे महिमान विशद केले :

ऐके स्वामी रघुनाथा । झणी उपेक्षिसी सीता ।
पतिव्रतेचा विकल्प धरिता । निजव्रता बोल लागे ॥११०॥
सीतेचेनि तेजानलें सहरावण पै वहिले । कटक अवघेंचि अहाळलें ।
प्रेतरुप आले युद्धासी ॥११॥
ससैन्य लंकानाथा । आपण वधिले तत्वता ।
ऐसे न मानावे रघुनाथा । वाल्गोनि वृथा कार्य नाही ॥१२॥
सीतेने मारिले नसतां । तुज न मरते रघुनाथा ।
मारीलेचि मारोनि तत्वता । जय सर्वथा तुम्हा दिधला ॥१३॥
रावणवधाचिये ख्याती । त्रैलोक्यी पावन कीर्ती ।
जिजेनि प्रतापे त्रिजगती । तुमचे तुम्हांप्रती लक्षेना ॥१४॥
जिचेनि तुझी शौर्यशक्ती । जिचेनि तुझी शौर्यकीर्ती ।
ते समूळ जानकी चिच्छक्ती । जाण निश्चिती श्रीरामा ॥१५॥
जिचेनि तुज नामरुप । जिचेनि प्रौढ प्रताप ।
जिचेनि रणी साटोप धैर्य अमूप जिचेनी ॥१६॥
ते तुझी निजशक्ति सीता । तुवा उपेक्षिली निजकांता ।
तेथे इतरांची कोण कथा । दीननाथा भजनमार्गी ॥१७॥
पूर्विल्याहूनि अनारिसी । तुवा देखिली सुंदरवेषीं ।
अनोळख भक्ति चिन्हासीं । काय स्वामीसीं म्हणावें ॥१८॥
सूर्याचे सामर्थ्य गगनी । स्वये नेणे दिनमणी ।
ते जाणतसे कमळिणी । सुखविकासिनी पै झाली ॥१९॥
चुंबकाची चाळकशक्ती । स्वतां नेणे निजस्थिती ।
जडें लोहे सुखेंचि जाणती । ते चळण पावती दर्शने ॥१२०॥
चंद्रकिरणींची अमृतधार । स्वतां नेणे हिमकर ।
सेवून जाणती चकोर । दर्शने अपार नांदत ॥२१॥
तैसी देखता श्रीराममूर्ती । जरी उल्लास न बाणे चित्ती ।
ते वज्राहूनि कठिण जाती । श्रीराममूर्ती अनोळख ॥२२॥
स्वस्वरुपीं आराम । त्याते बोलिजे श्रीराम ।
ते अंतरीचे निजप्रेम । सुखें परम ओतलें ॥२३॥
अद्वैतीं सुखसंबध । इंद्रियांवीण अगाध ।
विषयावीण परमानंद । ते स्वरुप शुद्ध तुझे स्वामी ॥२४॥
त्या निजरुपातें देखता । जरी उल्लास न बाणे चित्ता ।
इंदियें नव्हे पुष्टता । तरी ते वृथा पाषाणवत ॥२५॥
तुझिया दर्शनाचे सुख । श्रीरामा तुज अनोळख ।
भक्त जाणती सात्विक । जे नैष्ठिक व्रतधारी ॥२६॥
तुज देखता रघुनाथा । अष्टौभाव सात्विकता ।
गुढी उभविली स्वानंदता । बाहेरी तत्वता ते आली ॥२७॥
तेणे पुष्ट झाली सीता । ते देखातांचि रघुनाथा ।
विकल्प गमला तुझ्या चित्ता । अंतरव्रता नेणोनी ॥२८॥
वेदपुराणसंमत । अंतर्यामी रघुनाथ ।
ते कांही न दिसे येथ । अंतरव्रत का न कळे ॥२९॥
तरी भाग्य आपुलेंचि हीन । जे अंतर नेणे रघुनंदन ।
सकळांला मी जो सर्वज्ञ । वेद वचन काय झाले ॥१३०॥
आता असोत या कथा । वर्म बोलता रघुनाथा ।
प्रब्ळ शीण वाटेल चित्ता । आम्हा सीता काय होय ॥३१॥
जेणे सुख स्वामीसी । तेंचि करणे आम्हांसी ।
सीतेची भीड ते कायसी । दिव्य जानकीसी पै मागूं ॥३२॥

केवळ रामांच्या संतोषासाठी मारुतीने
सीतेजवळ येऊन तिला दिव्य करण्यास सांगितले :

दिव्य उतरल्या सीता सती । जरी अंगीकारीना रघुपती ।
तरी देहपात करणे समस्तीं । आणीक युक्ती असेना ॥३३॥
म्हणोनिया क्रोधावेषीं । आला जानकियेपासी ।
ऊठ हो काय पडळीसी । दिव्य रामासी पै देई ॥३४॥

दिव्य करण्यास सीता तत्काळ तयार :

ऐकता हनुमानाचें वचन । जानकी झाली आनंदघन ।
मज वोळला रघुनंदन । दिव्य आपण मागितले ॥३५॥
दिव्य न घेता पै येथ । मज अंगीकारीना रघुनाथ ।
लौकिकी होते विपरीत । जे विषयलुब्ध श्रीराम ॥३६॥
अहंरावणाच्या घरी । श्रीरामशक्ति सीता सुंदरी ।
राखिली होती षण्मासवरी । ते ये काळी घरी घातली ॥३७॥
ऐसा जनापवाद होता । तो चुकविला हनुमंता ।
श्रीरामाची निर्विषयता । प्रकट तत्वता तुझेनि आजी ॥३८॥
जानकीची निष्पापता । तुझेनि झाली वायुसुता ।
दिव्य मागतां रघुनाथा । देईन तत्वता सर्वांगें ॥३९॥
दिव्य मागता रघुनंदन । जेणै अंगें देईन जाण ।
तैंचि होईन पावन । निंद्य जाण पै येर ॥१४०॥
या कारणे सर्वांगेसी । दिव्य देईन श्रीरामासी ।
ऐसे बोलता वेगेंसी । हनुमंत चरणांसी लागली ॥४१॥
तुझेनि धर्मे हनुमंता । आजि माझ उजळला माथा ।
विलंब न करी सर्वथा । होई योजिता सामग्री ॥४२॥

सीतेची आज्ञा ऐकून मारुतीने तिला वंदन
करुन प्रचंड असे अग्निकुंड प्रज्वलित केले :

ऐकोनिया ते वचन । आले हनुमंतासी स्फुरण ।
करोनि सर्वांगें निंबलोण । वंदिले चरण जानकीचे ॥४३॥
दिव्य मागतां रघुनाथ । जानकीचे हर्षित चित्त ।
तेणे सुखमय हनुमंत । सामग्री योजित दिव्याची ॥४४॥
श्रीरामआज्ञा तत्वता । सर्वांगें दिव्य देवों पाहे सीता ।
तो संपादावया हनुमंता । विचार चित्ता आठवला ॥४५॥
विश्वाकारविषम कुंड । हनुमंते पेटविले प्रचंड ।
देखोनि खळबळिलें ब्रह्मांड । अकांड तांडव मांडिलें ॥४६॥
ज्वाळा लागती अंतराळीं । आकाश व्यापिले ज्वाळीं ।
जवळी येवोनि जनकबाळी । कुंड न्याहाळी अति प्रीती ॥४७॥

सीतेला ते अग्निकुंड संपूर्ण अंतर्बाह्य राममयच भासले :

तंव अपूर्व तेथे जाले । सबाह्य कुंड रामे व्यापिले ।
ते देखोनि जनकबाळे । आश्चर्य वर्तले निजचित्तीं ॥४८॥
अभिनव लीला रघुपती । दिव्य घेता मजप्रती ।
कुंडामाजीं निजस्थिती । अंतर वृत्ती पाहू आला ॥४९॥
येथे कायसा विचार आन । शुद्धभावार्थाचें प्रमाण ।
करोनिया अग्नीमाजी स्नान । श्रीरामचरण सेवावे ॥१५०॥
ऐसा निश्चिय करोनि चित्ती । रामांगना महास्ती ।
स्वये प्रतिज्ञा झाली बोलती । सावध श्रोती परिसावे ॥५१॥

मानसि वचसि काय जागरे स्वप्रमार्गे ।
नहि वसति मनो मे राघवादन्यंपुसि ।
सपदि दह ममांगं पाककृत् पावकेदं ।
सुकृतदुरितभाजां त्वं हि नः कर्मसाक्षी ॥६॥

अग्निकुंडासमोर उभी राहून सीतेचे प्रतिज्ञेचे सहजोद्‌गार :

राहोनि कुंडासमीप । श्रीरामभजनप्रताप ।
बोलती झाली आपोआप । सुखरुप श्रीराम ॥५२॥
निजभजनमहिमान । निजस्थितीचें वर्णन ।
स्वये बोलो नये आपण । परी न बोलता जाण सरेना ॥५३॥
पुसतां श्रीरघुनंदन । वंचूंही नये आपण ।
दिव्यसमयीं उच्चारण । केल्याविण सरेना ॥५४॥
म्हणोनिया निजस्थिती । बोलती झाली सीतासती ।
अत्यंत नम्र अति प्रीती । अग्नीसी विनंती करीतसे ॥५५॥
स्वामि परियेसीं तेजोराशी । तू साक्षी सर्वकर्मांसी ।
अंतर सकळ जाण्सी । जठरनिवासी जठराग्नी ॥५६॥
अत्यंत चपळ शीघ्रगती । जेथे जेथे जाय मनोवृत्ती ।
तेथे तेथे रघुपती । चाळक स्थिती सांगाते ॥५७॥
कल्पनेंचेनि योगें । मन जेथे जाय वेगे ।
राम सरसा पुढे मागे । परतोनि निघे तेथेंची ॥५८॥

“रामांवांचून अन्य विषय माझ्या मनात क्षणभर
जरी आला असेल तर हे अग्ने ! मला तू दहन कर.” :

राम सांडोनिया मना । विषय जरी ये ध्याना ।
तरी देह हुताशना । करी दहन क्षणमात्रे ॥५९॥
व्यापार जे का वाचिक । स्वर वर्ण उच्चारादिक ।
श्रीराम त्यांचाही चाळक । नुच्चारे देख रामेंवीण ॥१६०॥
वाचेंसी वदविता राम । नित्य कथेसी मेघश्याम ।
रामेंवीण नाही उपशम । वाग्विश्राम श्रीराम ॥६१॥
वाचा भलतें अति वावडे । परी रामेंवीण नवचे पुढे ।
श्रीरामेवीण उघडें । निजनिवाडे वचन नाही ॥६२॥
तेथे सैराट देता हांका । हांकेमाजी राम नेटका ।
अनारिसें होता देखा । देवमुखा करी भस्म ॥६३॥
हे काया जेथे आतळे । तेथेंचि श्रीराम मिळे ।
श्रीरामाहूनि वेगळें । नाही उरले सर्वथा ॥६४॥
दिसाताहे हा दिसे देहो । ऐसा बहुतांसी संदेहो ।
ते देही श्रीरामरावो । प्रकट पाहो दिसतसे ॥६५॥
रम अवघे श्वासोच्छ्वास । राम पळ निमेषोन्मेष ।
श्रीरामी पै सावकाश । निजवास् रामपणें ॥६६॥
रामेंवीण शरीर । क्षणही जाये आन मोहरा ।
ती देह वैश्वानर । क्षणमात्रें भस्म करी ॥६७॥
शरीर वाचा मानस । त्रिविध प्राण सावकाश ।
तुजपुढे केला हुताश । श्रीराघवेश पावावया ॥६८॥
कायिक वाचिक मानसिक । त्रिविध व्यवहार संसारिक ।
यांचें प्रमाण केले देख । ऐक आणीक सांगेन ॥६९॥
जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । त्यांची ते स्थिती संपूर्ण ।
याचा साक्षी तो रघुनंदन् । ऐके लक्षण पै तेंही ॥१७०॥
जागृती जे जे भासत । त्याचा प्रकाशक रघुनाथ ।
दृश्य द्रष्टा दर्शन तेथ । सहजचि होत श्रीराम ॥७१॥
मावळोनियां जागृती । कल्पना वसे स्वप्नस्थिती ।
त्याते भासविता रघुपती । जाण निश्चिती जठरेशा ॥७२॥
निरसोनिया जागृती । उदैजतां स्वप्नस्थिती ।
मध्येंचि जे का सुषुप्ती । जियेतें म्हणती गाढ मूढ ॥७३॥
परी मूढता नाही ऐसी । केवळ सुखमय सर्वांसी ।
जागृतीच्याज्या श्रमरासी । त्या सुषुप्तीसी निरसिती ॥७४॥
नलगतां पै सुषुप्ती । केवळ जे स्वप्नजागृती ।
ज्ञाते त्याते दुखणे म्हणती । सुखसंवित्ती तेथे नाही ॥७५॥
म्हणोनि सुषुप्ति सुखमय देख । श्रीराम त्याचेंही सोलींव सुख ।
श्रीरामाहूनि आणिक । नाही निःशेख पै उरले ॥७६॥

श्रीराम, देवब्राह्मण यांना वंदन व प्रदक्षिणा करुन सीतेने अग्नीत प्रवेश केला :

श्रीरामासी प्रदक्षिण । करोनि नमिले देवब्राह्मण ।
करावया अग्नीमाजी स्त्रान । रघुनंदन विश्वमूर्ति ॥७७॥
ऐसे परम प्रमाण सीता । बोलतांचि पै तत्वता ।
सकळा झाली आश्चर्यता । परमावस्था हुताशीं ॥७८॥
सीता बोलता प्रमाणासी । न साहवे जठराग्नींसीं ।
साक्षी सांगावे सकळांसी । भेदोनि देहासी बाहेर आला ॥७९॥
मंत्रबळें आहुती । जेंवी प्रवेश कुंडाप्रती ।
तेंवी निजसामर्थ्ये सीता सती । उडी घालिती पै जाली ॥१८०॥
सीता स्मरोनि रघुनाथ । उडी घातली अग्नीआंत ।
आकांतले सुर समस्त । केला निजघात जानकिये ॥८१॥

त्यामुळे एकच आकांत :

तेथे बुजालीं वानरे । भ्याली सकळ निशाचरें ।
सुरवरादि खेचरें । झालीं समग्रें भयभीत ॥८२॥
कृपाळु श्रीरघुनंदन । सकळा निश्चिय होता पूर्ण ।
येव्हढें केले निर्वाण । जीवावरी पूर्ण उठावला ॥८३॥

तेथे अग्नीच शांत झाला व सीता अग्नीप्रमाणे अति तेजस्वी भासली :

तंव आश्चर्य झाले तेथ । धगधगीत ज्वाळा समस्त ।
इंगळ जे लखलखित । लोपोनि शोभत जानकी ॥८४॥
तेथे तम धूमाचे घोळ । आणि रजरक्त कल्लोळ ।
ते लोपोनि सकळ । जनकबाळ देदीप्य ॥८५॥
तेथे दहनदीप्तिरुखा । मूळ ते जानकी देखा ।
अग्नीचिया निजशिखा । त्याचि शाखा तया वृक्षा ॥८६॥
सीता निजतेज कल्लोळें । पावकपाप निःशेष पळे ।
रावणबंदी जे घडले । होते चैलें पै धुतां ॥८७॥

निर्दोष सीतेचा मोठा जयजयकार :

सीता पतिव्रता निर्दोष । अग्नि जाला पै चोख ।
जयजयकारें करिती घोष । गर्जती अशेष हरिनामें ॥८८॥
ते देखोनि श्रीराघवा । आकळिले अति कणवा ।
अवघेपणेंचि अघवा । आला खेंवा स्वानंदे ॥८९॥

श्रीराम-सीता यांचे मिलन :

ऐसी प्रकृति पुरुषा भेटी । खेंवा पडोनि पडली मिठी ।
हरपली उठाउठी । जिराली पोटी येरयेरा ॥१९०॥
तेथे योग वियोग कांही । स्मरणास्मरण ते नांहीं ।
बुझावण झाले दोही । लवलहीं दोन्हीपणा ॥९१॥
श्रीरामरुपीं तत्वता । मिळोनि गेली जनकदुहिता ।
न निवडे पै सर्वथा । युक्ति विवरितां बहुविध ॥९२॥
तेथे अशोकाचा शोक । वियोगभावनेचें दुःख ।
हरवोनि जंव म्हणे सुख । तंव म्हणते निःशेख हारपले ॥९३॥
ऐसा जीवशक्तिसंयोग । अभ्यासेंवीण महायोग ।
निःशेष कल्पनेवीण भोग । अति अव्यंग भोगिती ॥९४॥
एकपणाचेनि आळें । सर्वथा नुरेचि वेगळें ।
श्रीरामरुपें सगळें । समावलें एकाएकी ॥९५॥
एकाएकी जनार्दनी । सहजीं सहजचि मिळणी ।
प्रकृतिसहित जनक नंदिनी । रामचरणी सरती झाली ॥१९६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सीतादिव्यनिरुपणं नाम अष्टषष्टितमोऽध्यायः ॥६८॥
ओंव्या ॥१९६॥ श्लोक ॥६॥ एवं ॥२०२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग