(बाळक्रीडा अभंग)
3861.
(बाळक्रीडा अभंग)
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असता अंगसंगे ॥१॥
अंगसंगे तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
मागुती पडती चिंतेचिये डोही । जयाची हे नाही बुद्धी स्थिर ॥३॥
बुद्धी स्थिर राहो नेदी नारायण । आशाबद्ध जन लोभिकांची ॥४॥
लोभिका न साहे देवाचे करणे । तुका म्हणे तेणे दुःखी होती ॥५॥
अर्थ :
नेहमी आपल्या अंगसंगतीत राहणारा कृष्ण देव आहे, हे संसाराचा आणि ज्ञानाचा भार वाहणारा लोक ओळखत नाही. आपल्या अंगसंगतीत साक्षात देव आहे हे त्यांना कळत नव्हते आणि जरी कृष्णाने काही अद्भूत लीला केल्या तरी त्यावेळी कृष्ण् देव आहे असे जरी समजले किंवा वाटले तरी पण त्यांच्या मनामध्ये संदेह, संशय येत होता. ज्यांची बुध्दी स्थिर नाही ते चिंतेच्या डोहात पडतात. जे लोक आशाबध्द आहेत, लोभी आहेत त्यांची बुध्दी नारायण कधीही स्थिर राहू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की, लोभी मनुष्याला देवाचे कोणतेही करणे सहन होत नाही त्यामुळे त्यांना दु:ख होते.
