अनंताच्या ऐको कीर्ती
2708.
अनंताच्या ऐको कीर्ती । ज्याच्या चित्ती हरीनाम ॥१॥
उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनिया ॥धृपद॥
हळुहळु तेचि वाही । चालो काही अधिकारे ॥२॥
खुंटूनिया गेले नावा । नाही हेवा खोळंबला ॥३॥
न लगे मोल द्यावा रुका । भावे एका कारणे ॥४॥
भीमातिरी थडवा केला । उठा चला लवलाहे ॥५॥
तुका म्हणे पाहतो वाट । उभा नीट पाउली ॥६॥
अर्थ :
मी अनंताची व ज्याच्या चित्तात हरीनाम आहे अशा भक्तांची किर्ती ऐकली आहे. ते भक्त भवबंध तोडून संसारसिंधू उल्लंधून गेले आहेत. आम्हीही आमच्या अधिकारप्रमाणे हळूहळू त्या मार्गानेच चालत राहू. ज्या नावेव्दारे हरीभक्त संसारसिंधू तरुन गेले आहेत ती नांव त्यांनी खुंटाला बांधून ठेवली आहे त्यामुळे आमचे ठेवेचा खोळंबा झाला नाही. त्या नावेत बसण्याकरता भक्तांना एक रुका देखील मोल मोजावे लागत नाही किंवा दयावे लागत नाही केवळ एकनिष्ठ भक्तीभाव भक्ताच्या ठिकाणी पाहिजे. त्या भवसिंधूतुन उतार हेण्यासाठी चंद्रभागेच्या तीरावर उतार केला आहे त्यामुळे लवकर उठा आणि चला. तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी आपली दोन्ही पावले विठेवर नीट ठेवून उभा आहे आणि भक्तांची वाट पाहातो आहे.
