प्रकाशे देखिले त्याह
323.
प्रकाशे देखिले त्याहुनि वेगळे ।
नाही ते धरिले सोहं मार्गे ॥
या मार्गापंथी तू तुझे नाही ।
बिंब हारपले ते तत्त्व पाही ॥
बीजाचा प्रकाश तुझा तू नेणंसी ।
हारपले मन हे दाही दिशी रया ॥
पुराणप्रसिद्ध निवृत्ति लाधले ।
गुरूमुखे लक्षी चोजवले रया ॥
अर्थ :
योगी लोक समाधीला बसले असता त्यांना काही प्रकाश दिसतो पण तो प्रकाश परमात्मतत्त्व नाही. जो त्यांनी भाव धरिला तेही परमतत्त्व नाही. अशा या सोहं मंत्राचा जप करण्याच्या मार्गात तू तुझ्या स्वतःच्या रुपाने नाहीस. बिंब म्हणजे ईश्वर तत्व हे ज्याठिकाणी लय पावते ते तत्त्व तू पहा बीजाच्या म्हणजे मूळस्वरुपाच्या ठिकाणी असलेला सहज प्रकाश म्हणजे ज्ञान आहे हे तुझे तुलाच माहीत नाही. कारण तो ज्ञानस्वरूप आहे त्या ठिकाणी द्वैत नाही दाहीदिशेला हिंडणारे मन त्या स्वरूपाच्या ठिकाणी लय पावते. याचेच नांव भगवत् दर्शन झाले. अशा तऱ्हेचा पुराणप्रसिद्ध, अनादिसिद्ध तत्त्वमसी महावाक्याचे लक्ष परमात्मा तो श्रीगुरू निवृत्तिरायाच्या उपदेशाने मला प्राप्त झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
