खुंटले वेदांत हरपले
51.
खुंटले वेदांत हरपले सिध्दांत । बोलणे धादांत तेंही नाही ॥१॥
ते रुप पहाता नंदाघरी पूर्ण । यशोदा जीवन कृष्णबाळ ॥२॥
साधिता साधन न पविजे खूण । तो बाळरुपे कृष्ण नंदाघरी ॥३॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा । गयनीच्या द्विपा तारु गेले ॥४॥
अर्थ:
वेदांतांत सिध्दांत असतात पण त्या पैकी एक ही ब्रह्मस्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही वेंदांची धाव तेथे खुंटते.चारी वाणी ही त्याचे वर्णन करु शकत नाहीत. जे स्वरुप वेद पाहु शकले नाही ते नंदा घरी कृष्ण होऊन अवर्तिण झाले व तेच स्वरुप यशोदेचे जीवन झाले. त्या नंदा घरी आलेल्या कृष्ण स्वरुपाला समजण्यासाठी साधना केली तरी ते कळत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गयनीनाथांचा ज्ञानरुपी दिपस्तंभामुळे माझा परमार्थचा प्रवास संपन्न झाला.
