जाणावे ते सार । नाही
2027.
जाणावे ते सार । नाही तरी दगा फार ॥१॥
डोळे झांकिलिया रवि । नाही ऐसा होय जेवी ॥धृपद॥
बहु थोडया आड । निवारिता लाभे जाड ॥२॥
तुका म्हणे खरे । नेले हातीचे अंधारे ॥३॥
अर्थ
अर्थ :
-आयुष्याचे खरे उद्दिष्ट कशात आहे आणि ते साधण्याचे मुख्य सार कशात आहे हे जाणून घ्यावे नाहीतर दगा झालाच म्हणून समजा. म्हणजेच देवाला प्राप्त करून घ्यायचे मार्ग अनेक आहेत परंतु सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग हा नामस्मरण आहे, परंतु हे न जाणता जे कर्मकांडात अडकतात त्यांची वाताहत झालीच म्हणून जाणा. ज्याप्रमाणे सूर्य असताना देखील डोळे झाकून जेवले असता जी गत होते तशी होते, म्हणजेच अन्न तोंडाऐवजी नाकात जाण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक मनुष्याच्या मार्गात थोडेबहुत अडथळे येतात परंतु एकदा का ते पार केले की गाढ असा म्हणजेच कधीही फिका न पडणारा लाभ पदरात पडलाच म्हणून समजा. तुकाराम महाराज म्हणतात परंतु माणसाने अज्ञानातच राहणे पसंत केले तर त्याच्या स्वतःच्या हातात असलेले त्याचे स्वतःचे हीत अंधाराने म्हणजेच अज्ञानाने हिरावून नेलेच म्हणुन समजा
