आपुलेनि भारे श्रीरंग
774.
आपुलेनि भारे श्रीरंग डोलत गेले ।
तव अवचिते पाचारिले पाठिमोरे ॥१॥
चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले ।
अवघे पारूषले दीन देहे ॥२॥
बापरखुमादेविवरू दिनानाथ भेटला ।
विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३॥
अर्थ :
मी आपल्या स्वरूप सौंदर्याच्या संपत्तीने श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्ती करता मोठ्या आनंदाने डोलत चालले असता त्याने अवचित मला पाठीमागे बोलाविले. आणि माझे अंतःकरण त्याने चोरले. त्यामुळे हा दैन्यस्थितित असणारा देहच परका झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल दिनानाथ ते भेटले. त्या योगाने माझा देहच विठ्ठलरूप झाला असे माऊली सांगतात.
