स्वप्नीचे सुख मी पहा
162.
स्वप्नीचे सुख मी पहावया गेले ।
तव स्वप्नी स्वप्न ठेले येरा विस्मो गे माये ॥
काय सांगो निदसुरी कवळले संसारी ।
करिता येरझारी येणेचि छंदे ॥
सुषुप्तीचे सुखजागृती जाणती ।
तरी परतोनी मागुती कासया येती ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु राणे रावो ।
ऐसा जाणोनी तयाचा भावो ठाकियेला ॥
अर्थ :
स्वप्नाचे सुख मी पाहावयास गेले तेंव्हा ते मलाच कळले. व इतरांना ते न समजल्यामुळे विस्मय वाटला. त्या स्वप्न संसारात मी गाढ निजले व जन्ममृत्युच्या येरझाऱ्यात अडकले. सुषुप्ती अवस्थेत त्या परमात्म सुखाचे भोगणे होताना ते जागृत अवस्थेत भौतिकात मिळणार नाही मग तिकडे परत कोण जाईल? माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हेच त्या नित्यसुखाचे उदार राजे आहेत अशा भावाने त्यांना मी जाणुन घेतले असे माऊली सांगतात.
