(गौळणींची अवस्था)
3784.
(गौळणींची अवस्था)
आत हरी बाहेर हरी । हरीने घरी कोंडिले ॥१॥
हरीने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥धृपद॥
हरीने जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥
तुका म्हणे वेगळा नव्हे । हरी हा भोवे भोवताला ॥३॥
अर्थ :
आत हरी आहे बाहेर हरी आहे हरीने तर मला नीजस्वरुपाच्या घरातच कोंडून टाकले आहे. हरीने माझ्या कामवासनेवर दगड घालून धन आणि पती यांच्यापासून मला वेगळे केले आहे. हरीने माझा जीवभावच नाहीसा केला व सर्वांच्या संबंधातून मला तोडून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, हरी आणि मी वेगळा नाही परंतू हरी हा माझ्या भोवतालीच माझ्याजवळच आहे.
