वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › २. अयोध्याकाण्ड - अध्याय १८ › ७. श्रीरामाने वनवास स्वीकारला

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088212 · अभंग क्र. ७

7.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय सातवा ॥
सीता-लक्ष्मण वनगमननिर्धर

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा दृढ निश्चय ओळखून कौसल्या त्यांचे स्वस्तयन करते :

झाली कौसल्या सप्रसन्न । श्रीरामासी वनाभिगमन ।
करावया करि पुण्याहवाचन । स्वस्त्ययन अवधारा ॥१॥

निश्चितं तं तथा रामं विज्ञाय गमनोत्सुकम् ।
प्रास्थानिकं स्वस्त्ययनं कर्तृमेवोपचक्रमे ॥१॥
सा विनिय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि ।
चकार माता रामस्यं मंगलानि मनस्विनी ॥२॥
गधैश्चापि समालभ्य राममायतलोचना ।
ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्य करणी शुभाम् ॥३॥
चकार रक्षां कौसल्या मंत्रैरभिजजाप च ।
देवानभ्यर्च्य विधिवत्पणम्य च शुभव्रता ॥४॥

वनी व्हायया वनवासी । अति उल्हास श्रीरामासी ।
कौसल्या जाणोनि निश्चयेसी । धाडी वनासी स्वस्तयनें ॥२॥
करोनि करचरणक्षाळण । कौसल्या करी शुद्धाचमन ।
करविलें देवतार्चन । रघुनंदननिजविजया ॥३॥
सुमनचंदनीं अति ओजा । पूजा केली अधोक्षजा ।
लोटांगणी गरुडध्वजा । वनी राम माझा तुं संरक्षी ॥४॥
नाना जळे सेविता पाहे । भोग उपजोंचि न लाहें ।
त्या औषधी आणोनि लवलाहें । बांधिल्या बाहे श्रीरामा ॥५॥
ज्या औषधी देखिल्याप्रती । राक्षस जीव घेवोनि पळती ।
त्याही आणोनि निश्चिती । बांधिल्या हाती श्रीरामा ॥६॥
वनवासी नित्य निर्विघ्न । विजयी व्हावया रघुनंदन ।
सर्वी सर्वांचे प्रार्थन । करी आपण कौसल्या ॥७॥

ब्रह्मदेवादिकांची रामरक्षणाविषयी प्रार्थना :

जगद्‌गुरु जो का ब्रह्मा । तेणे रक्षावें श्रीरामा ।
सदाशिवासहित उमा । माझ्या श्रीरामा संरक्षू ॥८॥
विष्णु जो क त्रैलोक्यनाथ । तेणे रक्षाव माझा रघुनाथ ।
विचरता वनाआंत । साद्य संतत अहर्निशी ॥९॥
साह्य होऊत ऋषिगण । साह्य होऊत सिद्ध चारण ।
साह्य होऊत मरुदेवगण । रघुनंदनवनवासीं ॥१०॥
पूषा भगार्यमा धाता । मित्र चंद्र यम आदित्य ।
वरुण सुविधी विधाता । वनी रघुनाथा रक्षावे ॥११॥

एकादश रुद्रादि देवतास प्रार्थना :

अकरा रुद्र चौदा विद्या । श्रीरामा साह्य होऊत सदा ।
मंत्र मूर्ति मंत्रानुवादा । राम सर्वदा रक्षवा ॥१३॥
वेदांमाजी अथर्वण । त्याचे मंत्र अति दारुण ।
श्रीरामा साह्य होऊत संपूर्ण । वनी निर्विघ्न करावया ॥१४॥
सप्त ऋषी आणि ब्रह्मऋषी । रामा रक्षोत देवऋषी ।
नारदा लागते पायांसी । माझ्या रामासी तू रक्षी ॥१५॥
शनि भौम महाक्रूर । राहु केतु गुरु शुक्र ।
श्रीरामासी नव्हावे वक्र । अहोरात्र रक्षावे ॥१६॥
नक्षत्रे आणि नक्षत्रपती । ध्रुवें रक्षावा श्रीरघुपती ।
सप्तऋषींसीं अरुंधती । श्रीराममूर्ती तुम्ही रक्षा ॥१७॥
विजांसि येते काकुळती । तुम्ही न पदावें श्रीरामप्रती ।
नानाविधा दिव्यदीप्ती । तुम्ही रघुपती रक्षावा ॥१८॥
बृह जंबुक सिंह व्याघ्र । आश्वलें तरस गौर तगर ।
सर्प शार्दूळ आणि वानर । तिही रामचंद्र रक्षावा ॥१९॥
मातलें म्हैसे उन्मत्त गज । मृग वराह आणि दिग्गज ।
वनदेवता नाचती भोज । तिही रघुराज रक्षावा ॥२०॥
महापक्षी अति दुर्धर । अग्निमुख नखे क्रूर ।
श्येन गीधा उलूक घार । तिही रामचंद्र रक्षावा ॥२१॥
जळींचे क्रूर जळचर । मत्स्य मगर महामकर ।
माझा रक्षावा रामचंद्र । निरंतर वनवासी ॥२२॥
यश राक्षस पिशाचक । जे का शिवाचे सेवक ।
तिही माझा रघुकुळटिळक । आवश्यक रक्षावा ॥२३॥
मार्गी चालता रघुकुळटिळक । कंटक होवोनि निष्कंटक ।
दंश मशक गांधिले वृश्चिक । ते विख निर्विख को रामा ॥२४॥
गमन शयन अशना । पृथ्वी साह्य होऊन रघुनंदना ।
त्यांना प्राशना मार्जना । श्रीरामा साह्य जाणा आपू ॥२५॥
तमनिरासीं प्रकाशघन । जठराग्निपदीपन ।
वनी शीत निवारण । अग्नि संपूर्ण साह्य श्रीरामा ॥२६॥
करिता वनवास् प्रयाण । श्रीरामा साह्य संपूर्ण आकाशा ।
हृदयी चिंतेचा पै वळसा । अल्पही ऐसा रिघो नेंदीं ॥२८॥
दिशा आणि विदिशा । साह्य होऊत श्रीराम परेशा ।
हृदयी दावोनि चिद्विलासा । चिंतेचा घसा निवटावा ॥२९॥
ऋतु मास संवत्सर । लवनिमेषादि तिथिवार ।
होरा मुहूर अहोरात्र । श्रीरामचंद्र रक्षावा ॥३०॥
यांहीवेगळे अरण्यवासीं । जे जे असती सामर्थेंसी ।
ते ते साह्य होऊत रामासी । तुमची दासी मी झाले ॥३१॥
इंद्र निघतां वृत्रवधासी । गुरूने मंगळें केली त्यासी ।
ती ती मंगळे तुजपाशी अहर्निशी तिष्ठोत ॥३२॥
गरुड जाता अमृतासी । विनतेनें मंगळें केली त्यासी ।
ती मंगळे तुजपाशी । अहर्निशी तिष्ठोत ॥३३॥
हरें मर्दावया त्रिपुरासी । उमेने मंगळें केली त्यासी ।
ती ती मंगळे तुजपाशी । अहर्निशी तिष्ठोत ॥३४॥
हरीनें मर्दितां मुरासी । रमेनें मंगळें केली त्यासी ।
ती ती मंगळे तुजपाशी अहर्निशी तिष्ठोत ॥३५॥
जळचर भूचर खेचर । उग्र रुद्र महाक्रूर ।
तेणेंसी साह्य करी श्रीशंकर । दासी किंकर मी त्यांची ॥३६॥
वनी रक्षो तुज वामन । जनी रक्षो जनर्दन ।
निरंजनी मधुसूदन । तुज संपूर्ण संरक्षोत ॥३७॥
जळीं रक्षो तुज नारायण । स्थळीं रक्षो संकर्षण ।
रणी रक्षो सिंहवदन । वितारण अभ्क्तांसी ॥३८॥
शयनी रक्षो शेषशायी । शिव रक्षो स्मशानाचे ठायी ।
सुषुप्तीमाझारी विदेही । चित्सुख पाही तुज रक्षो ॥३९॥
वनी वसतां रघुनाथ । वीर्य धैर्य नव्हे च्युत ।
तो तुज राखो अच्युत । वनाआंत विचारतां ॥४०॥
तुज रक्षो आगमनिगम । तुज रक्षो स्थावर जंगम ।
तुझे संकट दुर्गम । पुरुषोत्तम निवारो ॥४१॥
जनवनां जो जीवन । निरंजना जो निजजीवन ।
ते तुज रक्षो जनार्दन । लोटांगण त्यासी माझे ॥४२॥

मातेचे करुणाकोमल हृदय :

म्या प्रार्थिलें देव देवतां । म्या प्रार्थिलें भूतां समस्ता ।
म्या प्रार्थिलें आदिअच्युता । वनी रघुनाथा रक्षावया ॥४३॥
राम जगाचा निजजिव्हाळा । त्याहीवरी मातेचा कळवळा ।
अश्रु पूर्ण भरले डोळा । वेळोवेळा आलिंगी ॥४४॥
धणी न पुरे आलिंगीतां । धणी न पुरे मुख पाहता ।
धणी न पुरे गुज बोलता । निजमाता कृपाळु ॥४५॥
धणी न पुरे मुख मर्दितां । धणी न पुरे चुंबिता ।
धणी न पुरें हृदयी धरिता । ऐसी निजमाता कृपाळु ॥४६॥
धणी न पुरे वदनी गाता । धणी न पुरे नयनी पाहता ।
धणी न पुरे कृदयीं ध्याता । निजमाता कृपाळु ॥४७॥

श्रीरामांचा प्रणिपात :

श्रीरामे येवोनि आपण । त्रिवार करोनि प्रदक्षिणा ।
वंदोनि मातेचे चरण । वनप्रयाण करियेलें ॥४८॥
देखोनि जननीचें वदन । पुढती नमन पुढती गमन ।
पुढती चाले लोटांगण । प्रेम पूर्ण मातेचे ॥४९॥

कौसल्येचा कळवळा :

देखोनि मातेचा कळवळा । श्रीराम कृपेचा कोवळा ।
आनंदाश्रु आले डोळा । बाष्पे गळा रोधिला ॥५०॥
ते देखोनि उठाउठी । कौसल्यें राम धरिला पोटी ।
ललाट मर्दोनि ललाटीं । घातली मिठी दृढ चरणी ॥५१॥
वनाहूनि रघुनाथा । अयोध्येसी तू येसील विजपता ।
कैं मी डोळा देखेन मागुतां । श्रीमुखता श्रीरामा ॥५२॥
मागुतेनि श्रीमुख देखेन । तै होय डोळ्यां पारण ।
म्हणोनि आलिंगी जीवे प्राण । वियोगमन न सहावे ॥५३॥
माउलीचें प्रेम पूर्ण । तेणे अश्रु लोटले संपूर्ण ।
जाले श्रीरामचरणक्षालण । प्रक्षाळण निजदुःखा ॥५४॥

आकाशवाणीची गर्जना :

तंव गर्जली आकाशवाणी । श्रीरामा निजविजयो वनी ।
दुःख नको करू जननी । राम त्रिभुवनी महाराज ॥५५॥
श्रीराम दंद्य ब्रह्मादि देवा । श्रीराम वंद्य दैत्यदानवां ।
श्रीराम वंद्य सर्व मानवा । श्रीराम स्वयमेव परब्रह्म ॥५६॥
श्रीराम स्वये परात्पर । श्रीराम स्वये स्वतंत्र ।
श्रीराम स्वये चिन्मात्र । श्रीरामचंद्र परब्रह्म ॥५७॥
श्रीराम गुणी गुणातीत । श्रीराम जीवशीवातीत ।
श्रीराम स्वये सदोदित । श्रीराम निश्चित परब्रह्म ॥५८॥
श्रीरामा नाही सुखदुःख । जे मानिती ते केवळ मूर्ख ।
ऐकता कौसल्ये जाले सुख । हृदयी हरिख कोंदाटला ॥५९॥

त्यामुळे कौसल्येच्या जीवाला समाधान :

ऐसी आकाशवाणी ऐकता । परम सुख मायपुता ।
मावळमी द्वंद्वदुःखता । उल्हासता वना धाडी ॥६०॥
मावळले संकल्प विकल्प । मावळले द्वंद्वदुःख ।
श्रीराम वना जाता देख । परम हरिख कौसल्ये ॥६१॥
एकजनार्दना शरण । कौसल्या करोनि नीराजन ।
श्रीरामाचे वनप्रयाण । आल्हादे आपण करविले ॥६२॥
जे स्वस्त्ययन रघुनंदना । तेंचि स्वस्त्ययन लक्ष्मणा ।
कौसल्येनें करोनि जाणा । दोघे वना धाडिले ॥६३॥
लागोनि मातेच्या चरणा । तीसी करोनि प्रदक्षिणा ।
वेगे निघावया वना । निजभावना राम आला ॥६४॥
राज्याभिषेका श्रीराममूर्ती । गजरें येईल रघुपती ।
ओंवाळावया सीता सती । घेवोनि आरति तिष्ठत ॥६५॥
तंव देखिला रामचंद्र । नाही छत्र ना चामर ।
नाही द्विजांचा जयजयकार । नायके गजर वाद्यांचा ॥६६॥
चरणा लागोनियां सीता । आदरे पुसे श्रीरघुनाथा ।
राज्याभिषेका न देखू माथा । विलंबता का जाली ॥६७॥
अभिषेक नाही तत्वता । राज्यावीण उल्हासता ।
देखतसे मी रघुनाथा । हे मज कथा सांगावी ॥६८॥
राहिले राज्याभिषिंचन । अति दूर वनाभिगमन ।
तरी रघुनाथा नव्हेचि दुर्मन । उल्हास पूर्ण पितृवाक्यें ॥६९॥
एकाकी राम वना जाता । तेणे सुखावे कैकेयी माता ।
भाके उत्तीर्णता दशरथा । तोचि रघुनाथा उल्हास ॥७०॥
श्रीराम म्हणे ऐक सीते । कैकेयीसी श्रीदशरथें ।
दोनी वरद दिधले होते । शुक्रविजयार्थें युद्धसंधीं ॥७१॥
शुक्रे रायाचा भंगिला रथ । कैकेयीयें चक्रीं सूदला हात ।
तेणे विजयी जाला दशरथ । तै वरदार्थ वदला रावो ॥७२॥
तेची कैकेयीयें वर दोन । आजि मागितले आपण ।
एक मजला वनाभिगमन । शीघ्र प्रयाण आजीच ॥७३॥
राज्यांतील अणुप्रमाण । कांही न घ्यावें आपण ।
हे रायाची आज्ञाप्रमाण । शीघ्रप्रयाण आजीच ॥७४॥
दुसरे वरदे रायापासीं । राज्याभिषेक भरतासी ।
तेही मर्यादा नवपंचवर्षी । मग आम्हांसी रामराज्य ॥७५॥
ऐसी जानकीये जाली कथा । मज वनवासी निघणें आता ।
गुरुपुष्य या सुमुहूर्ता । तुज तत्वता पुसो आलो ॥७६॥

श्रीरामांचा सीतेला उपदेश :

तू कौसल्येपासीं । द्वेष म करावा कैकेयीसी ।
हे गुह्य सांगतो तुजपासी । तिचेन आम्हांसी अति कीर्ति ॥७७॥
कैकेयीचें वरदान । ते मज जाले सुप्रसन्न ।
समुद्री तरतील पाषाण । हे महिमान तिचेनि ॥७८॥
इनें वना न दवडिलें । प्रतापभांडार मज दिधले ।
त्रिभुवनी रामराज्य जाले । इचेनि बोले वनवासी ॥७९॥
जाणोनिया ऐसा स्वार्था । मज उल्हास वना जाता ।
हे त्वा जाणोनि तत्वता । कैकेयी सर्वथा द्वेशूं नको ॥८०॥
जैसी लक्षुमीनारायण । तैसे सासूसासऱ्यां भावून ।
सेवा करावी आपण । सावधान सभ्दावे ॥८१॥
सौमित्राची सखी जननी । कौसल्येहूनि अधिक मानी ।
सुखी करावी सेवा करूनी । अनुदिनी निजभवनें ॥८२॥
माझी आज्ञा प्रमाण जैसी । भरताची आज्ञा मानी तैसी ।
विकल्प् न धरावा मानसी । वरा देवरासी भेद न मानी ॥८३॥
माझी आज्ञा आहे ऐसी । तुवा न जावे माहेरासी ।
वेगळें न रहावे निजमंदिरासीं । कौसल्येपासीं नित्य वस्ती ॥८४॥
जंव होय माझे पुनरागमन । तंववरी करावे माझे ध्यान ।
मुखीं माझे नामस्मरण । विस्मरण येवो नेंदी ॥८५॥
माझे ध्यान अहर्निशी । उपमा नाही त्या सुखासी ।
माझेनि नामस्मरणॆं सुखी होसी । वियोगासी विसरोनी ॥८६॥

जानकीची दुःख, तिची विनंती :

ऐकोनि श्रीरामाचे वचन । हृदयी लागला तो वाग्बाण ।
अश्रुपूर्ण झाले नयन । अधोवदन जानकी ॥८७॥
पतिवियोगाचे दुःख । तेणे कोरडे जाले मिख ।
हारपलें सकळ सुख । परम दुःख ओढवले ॥८८॥
दुःखे जामी कासाविसी । मग लागली पतिपायासी ।
काय बोलिली श्रीरामासी । ते सावकाशी अवधारा ॥८९॥
राज्यीं असता श्रीरामासी । सेवा वांटिली सेवकांसी ।
ते मी एकली वनवासी । सर्वस्वेसी सेवीन ॥९०॥
सर्व सेवेचा निजस्वार्थ । मज लाभेल वनाआंत ।
सर्वज्ञ श्रीरघुनाथ । माझा मनोरथ पुरवावा ॥९१॥
मग बोलिला रघुनंदन । नेणसी वनवासाचें चिन्ह ।
वनवासी दुःख दारुण । सावधान अवधारी ॥९२॥
राज्यांतील अणुप्रमाण । घेवो नये वो आपण ।
त्यागोनियां वास्त्राभरण । पादत्राणें त्यागावीं ॥९३॥
वल्कलांचे वस्त्राभरण । कृष्णाजीन प्रावरण ।
तू तंव सुकुमार पूर्ण । दुःख दारुण वनवासी ॥९४॥
दंडकारण्य दुर्धर वन । तेथे वसावें आपण ।
पायी चालता कंटक पूर्ण । दुःख दारुण वनवासी ॥९५॥
सिंह शार्दूळ व्याघ्र वृक । तरस तगर मृग जंबुक ।
रीस वानर सर्प वृश्चिक । परम दुःख वनवासी ॥९६॥
पतंग भृंग दंष्ट्री क्रूर । मकर सुसरी मत्स्य मगर ।
कंक बक पक्षी घोर । दुःख दुर्धर वनवासी ॥९७॥
वनी वनफळांचा आहार । तृणपर्णाचा सेजार ।
शीत उष्ण निरंतर । दुःख दुर्धर वनवासी ॥९८॥
तू तंव रायाची राजबाळा । अतिशयेंसीं वेव्हाळा ।
नवीं द्वंद्वदुःखउमाळा । तू अबळा केंवि साहसी ॥९९॥

बाधेच्या भीतीचा सीतेकडून उपहास :

ऐकोनि द्वंद्वबाधावचन । सीता झाली हास्यवदन ।
जवळी असता रघुनंदन । द्वंद्वबंधन बाधीना ॥१००॥
करिता तुझे नामस्मरण । द्वंद्वदुःखाचें निर्दळण ।
तो तू जवळी असता जाण । द्वंद्वबंधन मज कैचें ॥१॥
वृक व्याघ्र पंचानन । त्यांचा आत्मा रघुनंदन ।
तो तू जवळी असता जाण । द्वंद्वबंधन मज कैचे ॥२॥
जवळी असता रघुकुळटिळक । कंटक होती निष्कटंक ।
विष ते होय पीयूख । परम सुख वनवासी ॥३॥

पतिसहवासाचे महत्व, स्वतःला वनवासात नेण्याची सीतेची विनंती :

तुजसांगातें वनवास । तो मज वैकुंठ कैलास ।
तुजवेगळा संसार ओस । दुःख असोस मज तेव्हा ॥४॥
माझा स्वामी तू रघुनाथ । ऐक माझे मनोगत ।
तुजवेगळें जीवित । दुःखाभिभूत संसारू ॥५॥
पति प्रियेचें निजजीवन । पति प्रियेचें निजनिधान ।
पति प्रियेचें निजभूषण । तेणेंवीण ते अति दीन सुंदरा ॥६॥
पति प्रियेचें निजमूर्तीं । पति प्रियेचें निजात्मगती ।
पति प्रियेचें मुक्ती । होय उपहती त्यावीण ॥७॥
पति प्रियेचें निजशोभन । पति प्रियेचें निजमंडन ।
पति प्रियेचें सौजन्य । तेणेंवीण ते अति दीन ॥८॥
पति प्रियेचें निजवैभव । पति प्रियेचें सुख स्वमेव ।
पति प्रियेचें नित्यगौरव । तेणेंवीण पहा हो अति दीन ॥९॥
तू तव माझा प्राणनाथ । तुजवेगळा मज प्राणांत ।
माझा परमात्मा रघुनाथ । हृदयस्थ अवधारी ॥११०॥
जेव्हांचि तुझे वनप्रयाण । तुजसवें येती माझे प्राण ।
मागे मज राहिवतां जाण । अचुक मरण मज राम ॥११॥
कृपाळू तू हृषीकेशी । ऐसी बिरुदें तू स्वयं वाहसी ।
तरी मज न्यावे वनासी निजसेवेसी दासत्वा ॥१२॥
म्हणोनि धरिले दोन्ही चरण । गहिवरे गळताती नयन ।
जाले पतिपाद प्रक्षाळण । श्रीराम पूर्ण तुष्टला ॥१३॥
कोणासही न पुसता । तुज म्या सवे वना नेतां ।
म्हणतील स्त्रीजित कामलोलुपता । वना सीता राम नेतो ॥१४॥
जेणे चुके लोकनिंद्यता । जेणे स्वार्थ साधे परमार्था ।
ऐसिया सांगेन निजस्वार्था । ते तुवा शीघ्रता करावे ॥१५॥
लौकिकें मानिजे सर्वांसी । स्वार्थ पाविजे परमार्थासीं ।
ऐसिया सांगेन निजगुह्यासी । त्या कार्यासी तू साधी ॥१६॥

सीतेला राम वसुष्ठाची आज्ञा घेण्यास सांगतात :

भूत भविष्य वर्तमान । वसिष्ठाचे आहे ज्ञान ।
त्यासी रिघावे तुवा शरण । वनाभिगमन करावया ॥१७॥
रिघालिया सद्‌गुरूसी शरण विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
गुरुवचन उल्लंघी ऐसा कोण । हरिहर पूर्ण वंदिती ॥१८॥
आज्ञा पुसलिया वसिष्ठासी । ना न म्हणवे दशरथासी ।
मजही नुल्लंघवे आज्ञेसी । गुरुवाक्य जगद्वंद्व ॥१९॥
जयाचिया जाण वचनासाठी । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
येवढा गुरू आमुचे गांठी । हे गुह्य गोष्टी त्यासी पुसें ॥१२०॥

वसिष्ठांना विनंती केल्यावरून त्यांची अनुज्ञा मिळते :

ऐकोनि श्रीरामाचे वचन । सीता हरिखली संपूर्ण ।
धरिले वसिष्ठाचे चरण । वनाभिगमनआज्ञार्थ ॥२१॥
मज न्यावया वनवासासी आज्ञा द्यावी श्रीरामासी ।
तू तंव हृदयस्थ जाणसी । सर्वज्ञ होसी गुरुवर्या ॥२२॥
वसिष्ठ म्हणे श्रीरघुनाथा । वना अवश्य न्यावी सीता ।
इचेनि पावसी पुरुषार्थ । यश सर्वथा इचेनि ॥२३॥
सुरनर वानितील पवाडे । येवढी कीर्ति इचेनि जोडे ।
इयेसी घालोनिया पुढे । वना रोकडें निघावें ॥२४॥
कौसल्या म्हणे वनवासासी । श्रीरामा सीता न्यावी सरसी ।
येथे ठेवितां आम्हांपासी । देखता इसी नित्य दुःख ॥२५॥
स्त्रीपुरुषां वेगळेपण । हे तंव मरणापरिस मरण ।
हेंचि स्त्रियेसी दुःख दारुण । पृथक् शयन पुरुषेंसी ॥२६॥
अयोध्येचे जनंची वार्ता । जे श्रीरामे वनासी न्यावी सीता ।
वचन मानले श्रीरघुनाथ । वना निजकांता नेऊ इच्छी ॥२७॥
बाप श्रीरामाची करणी । सद्‌गुरुआज्ञा लाहोनी ।
लौकिक स्वये संपादोनी । वना निजपत्‍नी नेऊ पाहे ॥२८॥
श्रीराम म्हणे सीतेसी । त्यजोनि वस्त्रांभूषणांसी ।
वल्कमांबरें परिधानेंसीं । वेगी वनासी निघावे ॥२९॥
वस्त्राभरणे त्यागितां । उल्हास सीतेच्या निजचित्ता ।
धनधान्यादि वस्तुजाता आणोनि रघुनाथापुढें ठेवी ॥१३०॥

लक्ष्मणाची विनंती :

लक्ष्मण म्हणे रघुनाथा । तुम्ही सवे घेतली सीता ।
मीही वना येईन आता । निजस्वार्था सेवावया ॥३१॥
श्रीराम म्हणे सौमित्रा । तू मज निजाचा सोयरा ।
मागे धरावया राज्यधारा । जवळी तिसरा दिसेना ॥३२॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । लक्ष्मणे माडिलें निर्वाण ।
तुजवेगळा सांडिन प्राण । तुझी आण श्रीरामा ॥३३॥
वाहोनिया निर्वाण आड । दृढ धरिले श्रीरामचरण ।
सोडवितां न सोडी जाण । कळवळोनि बोलत ॥३४॥

स्त्रियांना प्रमदा का म्हणतात :

तुम्ही दोघें वनवासी । आश्रमी सांडोनि सीतेसी ।
तू जाशील वनफळासी । मागे इसी कोण रक्षी ॥३५॥
स्त्रियेसी मुळींहूनि रक्षण । माता संरक्षी बाळपण ।
कुमारपणीं पिता रक्षण । लग्न लाविलिया रक्षण सासूसासरे ॥३६॥
सासूसासरा भावे दीर । नणंदा जावादिकादि अपार ।
मुख्य रक्षण भर्तार । तेणे निरंतर रक्षावी ॥३७॥
अरक्षणता स्त्रियेसी । अनर्थ आला त्या घरासी ।
लांछन लावील त्या कुळासी । प्रमदा तिसी निजनाम ॥३८॥
प्रमासीं पाडी पतिपुत्रांसी । प्रमादी पाडी कुळगोत्रासी ।
यालागी प्रमदा नम तिसी । वेदशास्त्रांसी संमत ॥३९॥

लक्ष्मणाचा बरोबर येण्याचा हट्ट :

तुम्ही दोघें वनवासी । मी असलिया तुम्हांपासीं ।
आणीन फळमूळपुष्पांसी । अहर्निशी रक्षण ॥१४०॥
तुझे वाहीन धनुष्यबाण । काष्ठें आणीन जीवन ।
तुम्हांसी करावया शयन । शेज करीन तृणपर्णी ॥४१॥
तुझिया रंकाचाही रंक । मोलेंवीण मी सेवक ।
वनवासींचा पाइक । विश्वासुक आंगवणा ॥४२॥
वनी एकली सांडितां सीता । अनर्थ होईल रघुनाथा ।
हा विचार पुसावा समर्था । श्रीरघुनाथा वसिष्ठासी ॥४३॥
लक्ष्मणाची निजयुक्ती । सत्य मानिली समस्तीं ।
एकली सीता वनाप्रती । ठेवितां निश्चिती अनर्थ ॥४४॥

वसिष्ठांची अनुमती :

ऐकोनि लक्ष्मणाचे वचन । वसिष्ठ आज्ञा दे सर्वज्ञा सर्वज्ञ ।
तेणे खुणाविला रघुनंदन । वना लक्ष्मण स्वये न्यावा ॥४५॥
ऐकोनि श्रीगुरुसंज्ञा । श्रीराम म्हणे लक्ष्मणा ।
जरी तुज येणे आहे वना । तरी धनधान्या वांटावें ॥४६॥
परिसतां श्रीरामाचे वचन । हर्षे निर्भर लक्ष्मण ।
एकजनार्दना शरण । वनप्रयाण अवधारा ॥१४७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अयोध्याकांडे एकाकारटीकायां
जानकीलक्ष्मणवनाभिगमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ ओंव्या १४७ ॥ श्लोक ४ ॥ एवं १५१ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग