॥ श्रीएकनाथमहाराजकृत
12.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अयोध्याकाण्ड
॥ अध्याय बारावा ॥
भरताचे वनप्रयाण व गुहकाशी संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कैकेयी भरताला उपदेश करते :
जालिया जननिवृत्ती । पुन्हा प्राप्ती मध्यरात्री ।
कैकेयी येवोनि भरतप्रती । बोले उपपत्ती ते ऐका ॥१॥
उत्थापयित्वा कैकेयी पुत्रं वचनब्रवीत ।
उत्तिष्ठ पुत्र भद्रं ते राजपुत्र निबोध मे ॥१॥
त्वद्विधा नैव शोचंति सतां सदसि संमताः ।
गृहाणेदं स्वकं राज्यं सफलं कुरु में श्रमं ॥२॥
मनो नंदय मित्राणां मम चाभीष्तदर्शन ।
त्वकृते हि मया सर्वमिदमेवंविधं कृतं ॥३॥
तत्पुत्र शीघ्रं विधिना विधिज्ञैः
वसिष्ठमुख्यैः सहितो द्विजेंदैः ।
संकाल्य राजानमदीनसत्व
मात्मानमुर्व्यामभिषेचयस्व ॥४॥
उठवोनिया पुत्रासी । कैकेयी बुद्धि सांगे त्यासी ।
राम गेला वनवासासी । तू का करिसी शोक त्याचा ॥२॥
रांडवे बायलेव्हे परी । रडतां न लाजसी सभेमाझारीं ।
ऊठ वेगी धीर धेरीं । अयोध्येचे करी निजराज्य ॥३॥
मुख्य ज्येष्ठाचें निजराज्य । ते म्या संकटॆं साधिले तुज ।
शेखी न मानिसी तू मज । नाचसी भोजें वना जावया ॥४॥
आयुष्य सरल्या निमाला पती । पितृआज्ञेने वनवास रघुपती ।
तो दोष ठेविसी मजप्रती । निजस्वार्थ नेणसी ॥५॥
सापत्नभावाचा वेदकालीन इतिहास :
मुळी लागोनि संसारी । सापत्न ते तव मुख्य वैरी ।
ते तुज सांगेन निर्धारी । वेदशास्त्रसंमत ॥६॥
दिती अदिति दोघी सवती । एक पित्याची संतती ।
देवा देत्या वैरप्राप्ती । निजघाती येरयेरा ॥७॥
येचि अर्थी वेदोक्ती । बृहदारण्यप्रथमश्रुती ।
देव दैत्य वैरी होती । श्रुतिसंमती अवधारा ॥८॥
सापत्नांमाजि अति प्रीती । कांहीच नाही वेदशास्त्रार्थी ।
गरुडसर्पां वैरप्राप्ती । ते काय नव्हेती निजबंधु ॥९॥
माझे ऐकून राजा हो, शत्रुघ्नाने युवराज व्हावे :
ऐक माझी निजयुक्ती । तुवा न जावे वनाप्रती ।
आणोनि वसिष्ठादि ऋषिपंक्ती । घेई राज्यप्राप्ती अभिषेकें ॥१०॥
भरता तू तंव सभाग्य पूर्ण । अभाग्य वनवासा गेला लक्ष्मण ।
तो जरी येथे असता जाण । करिता कंदन राज्यलोभें ॥११॥
मी सांगतें हित देखोन । तू होई राजा संपूर्ण ।
युवराजा करी शत्रुघ्न । माझे वचन प्रतिपाळीं ॥१२॥
त्यामुळे भरताचा संताप व उद्वेग, त्याने आईची निर्भत्सना करुन तिला घराबाहेर घालविले :
ऐकोनि मातेंचे वचन । भरत कोपला संपूर्ण ।
कोपामाजी आले रुदन । अतिउद्विग्न अनुतापी ॥१३॥
घायावरी हाणिजे लाता । तैसा पाड जाला भरता ।
म्हणे तू तंव नव्हेसी माझी माता । पापरूपता संपूर्ण ॥१४॥
निजपती निमाल्याचे तुज । अणुमात्र दुःख ना लाज ।
राज्याभोगाचें सुखभोज । अति निर्लज्ज नाचसी ॥१५॥
तुझ्या ऐकोनि वचनार्था । म्या द्वेषावें श्रीरघुनाथा ।
स्वजना देवोनि दुःखवार्ता । नरकपाता स्वये जावे ॥१६॥
निजमातेचें हितोपदेशवाक्य । रौरवा जावे आवश्यक ।
पूर्वजां न्यावे नरका देख । द्यावे दुःख जनासी ॥१७॥
निजपतीची घातकिणी । श्रीरामद्वेषाची संवदणी ।
सुहृदांसी दुःखकारिणी । जाय पापिणी अति निंद्य ॥१८॥
जळो तुझे काळे मुख । श्रीरामासी दिधले दुःख ।
तुझे मजला नाही सिख । जगा असुन तुझेनि ॥१९॥
वधूं नये निजमाता । यालागी चुकलों तुझ्या घाता ।
तुझेनि मज दुःखावस्था । श्रीरामदशरथा विघडिलें ॥२०॥
तुज पाहता सन्मुख । मज वाटे परम दःख ।
नको दाखवू काळे मुख । निंद्य निःशेष अति नष्टे ॥२१॥
भरत कोपोनिया भारी । निर्भत्सूनी नानापरी ।
कैकेयी घातली बाहेरी । तिचेनि करी अतिदुःखी ॥२२॥
जिचेनि अंतरलाराघव । ते माता नव्हे महालाव ।
जगी इचें निद्य नांव । दुःख ओतींव कैकेयी ॥२३॥
श्रीरामभरतादि चारी बंधूंचे पिंडैक्य :
श्रीराम भरतांचा पिंड एक । एका पिंडाचे दोघे देख ।
येरायेरांचें मानिती दुःख । परम सुख येरयेरा ॥२४॥
येरयेरांचा जीवप्राण । येरयेरांचे जीवन ।
येरयेरा समाधान । सुखसंपन्न रामभरत ॥२५॥
भ्रतासी श्रीरामाचे सुख । श्रीरामी भरताचा हरिख ।
एकमेका दोघे एक । कैकेयी मूर्ख ते नेणे ॥२६॥
आठवितां श्रीरघुनाथ । परम सुखे सुखावे भरत ।
नाही राज्यलोभाचा स्वर्थ । परमामृत श्रीरामी ॥२७॥
श्रीरामाच्या पायांपरतें । परम सुख नाही भरतातें ।
यालागी त्यजोनि निजराज्यते । श्रीरामाते भेतों निघे ॥२८॥
देवदैत्यां वैर वितंड । त्यांचा नव्हे एक पिंड ।
राज्यलोभें दुःख उदंड । वैर अखंड येरयेरा ॥२९॥
भिन्नभिन्न पिंडोत्पती । गरुडसर्पां वैरप्राप्ती ।
तैसे नाही श्रीरामभरती । चवघेही होती एकपिंड ॥३०॥
सौमित्र भरत आणि शत्रुघ्न । चवथा जाण रघुनंदन ।
चारी मूर्ती श्रीराम पूर्ण । व्योह संपूर्ण या नाव ॥३१॥
चवघेही बंधु भिन्नभिन्न व्यक्ती । चारी मिळोनि श्रीराममूर्ती ।
व्यूह्तचतुष्ट्य याते म्हणती । आगमार्थीं वेदोक्त ॥३२॥
ऐसिया एकात्मता अति प्रीती । भेटो पाहे श्रीराममूर्ती ।
उदया येतांचि गभस्ती । निजगमनार्थी उद्यत ॥३३॥
भरताचा श्रीरामांची भेट घेण्याचा निर्धार , वसिष्ठ भरताच्या मानाची कसोटी पाहातात :
पाचारोनिया प्रधाना । म्हणे सिद्ध वेगी करा सेना ।
भेटावया रघुनंदना । जाणे वना निश्चित ॥३४॥
वसिष्ठ येवोनि आपण । पहावया भरताचे मन ।
म्हणे पुत्रधर्माचें लक्षण । निजवचन बोलत ॥३५॥
तुम्ही तरी चवघेही पितृभक्त । आज्ञा नेमून गेला दशरथ ।
राज्या अभिषेकावा भरत । श्रीरघुनाथ वनवासी ॥३६॥
तुझे मातेचे वरदान । तिचेंही मागणें हेचि जाण ।
भरतासी राज्यभिषिंचन । रघुनंदन वनवासी ॥३७॥
श्रीराम पितृवचन्विश्वासी । वेगी गेला वनवासासी ।
तूंही पाळीं पितृवाक्यासी । अभिषेकासी अंगीकारी ॥३८॥
श्रीरामा अभिषेकावया निर्धारी । पूर्वी केली होती सामग्री ।
ते सिद्ध आहे माझ्या घरी । तू अंगीकारीं अभिषेक ॥३९॥
पितृवचन उल्लंघिता । अवश्या पाविजे नरकपाता ।
आग्रह न करवा भरता । तुज मी आता अभिषेकी ॥४०॥
वसिष्ठांची सूचना ऐकून भ्रताला मूर्छा, त्याचा विलाप, मातेची निंदा :
ऐकोनि वसिष्ठांचें वचन । भरत पडिला मूर्छापन्न ।
दीर्घ मांडिलें रुदन । आक्रंदे पूर्ण बोलत ॥४१॥
कैकेयी हरिखे जालि रांड । जळो तिचे काळे तोंड ।
वनवासाचें पाखांड । तिणेंचि वितंड वाढविलें ॥४२॥
कैकेयी केवळ परम नष्ट । भाके गोंविला पति वरिष्ट ।
तिचे मागणें पाप स्पष्ट । तो राज्यपट मी नेघे ॥४३॥
राज्याभिषेकाला भरताचा नकार, त्यामुळे वसिष्ठांना आनंद :
वसिष्ठा तुज करीतों नमन । किती पाहसी माझे मन ।
वाचोनियां रघुनंदन । अभिषिंचन मी नेघे ॥४४॥
श्रीरामासी सांडोनिया वनी । जरी मी बैसलो अभिषिंचनी ।
तरी मी जालो मद्यपानी । मातृगमनी अति नष्ट ॥४५॥
तुझे शिवोनियां चरण । पूर्वी वाहिली श्रीरामाची आण ।
तेंचि माझे अति प्रमाण । पुढती आपण न पुसावे ॥४६॥
म्हणोनि चरणी ठेविला माथा । येथोनि मागुती गुरुनाथा ।
राज्याभिषेकाची कथा । मजही आता न पुसावी ॥४७॥
ऐकोनि भरताचे वचन । वसिष्ठ जाला सुखसंपन्न ।
हृदयी धरिला आलिंगून । म्हणे अति सज्ञान तू होसी ॥४८॥
वसिष्ठांसह सर्वांचे रामदर्शनासाठी प्रयाण :
तुझ्या सवे घेवोनी माता । भेटी येईन मी रघुनाथा ।
भरतें चरणी ठेविला माथा । सभाग्यता आजी माझी ॥४९॥
सदगुरू जाला सुप्रसन्न । भरते त्राहाटिले निशाण ।
सेना सन्नद्ध करा संपूर्ण । शीघ्र गमन वनवासा ॥५०॥
वसिष्ठांची सूचना ऐकून भरताला मूर्छा, त्याचा विलाप, मातेची निंदा :
ऐकोनि वसिष्ठांचें वचन । भरत पडिला मूर्छापन्न ।
दीर्घ मांडिलें रुदन । आक्रंदे पूर्ण बोलत ॥४१॥
कैकेयी हरिखे जालि रांड । जळो तिचे काळे तोंड ।
वनवासाचें पाखांड । तिणेंचि वितंड वाढविलें ॥४२॥
कैकेयी केवळ परम नष्ट । भाके गोंविला पति वरिष्ट ।
तिचे मागणें पाप स्पष्ट । तो राज्यपट मी नेघे ॥४३॥
राज्याभिषेकाला भरताचा नकार, त्यामुळे वसिष्ठांना आनंद :
वसिष्ठा तुज करीतों नमन । किती पाहसी माझे मन ।
वाचोनियां रघुनंदन । अभिषिंचन मी नेघे ॥४४॥
श्रीरामासी सांडोनिया वनी । जरी मी बैसलो अभिषिंचनी ।
तरी मी जालो मद्यपानी । मातृगमनी अति नष्ट ॥४५॥
तुझे शिवोनियां चरण । पूर्वी वाहिली श्रीरामाची आण ।
तेंचि माझे अति प्रमाण । पुढतीं आपण न पुसावे ॥४६॥
म्हणोनि चरणी ठेविला माथा । येथोनि मागुती गुरुनाथा ।
राज्याभिषेकाची कथा । मजही आता न पुसावी ॥४७॥
ऐकोनि भरताचे वचन । वसिष्ठ जाला सुखसंपन्न ।
हृदयी धरिला आलिंगून । म्हणे अति सज्ञान तू होसी ॥४८॥
वसिष्ठांसह सर्वांचे रामदर्शनासाठी प्रयाण :
तुझ्या सवे घेवोनी माता । भेटी येईन मी रघुनाथा ।
भरते चरणी ठेविला माथा । सभाग्यता आजी माझी ॥४९॥
सदगुरू जाला सुप्रसन्न । भरतें त्राहाटिले निशाण ।
सेना सन्नद्ध करा संपूर्ण । शीघ्र गमन वनवासा ॥५०॥
हरिखें नाचत भरत । आजी देखेन श्रीरघुनाथ ।
माझे पुरतील मनोरथ । कृतकायार्थ मी होईन ॥५१॥
श्रीराम भेटवया तक्ताळीं । भरत निघालासे सदळी ।
नगरी हर्षे पिटिली टाळी । वना सकळीं निघावया ॥५२॥
होईल श्रीरामदर्शन । उद्यमी चालती संपूर्ण ।
उभय लाभी ठेवोनि मन । निघाले जन अयोध्येचे ॥५३॥
पौराश्च निर्य्युः सर्वे समवायेन नैगमाः ।
रामदर्शनसंदृष्टाः सर्वाः प्रकृतयस्तदा ॥५॥
श्रीरामप्रेमी नागरीकांची दर्श्नत्सुकतेमुळे तारांबळ, धावपळ :
वाणियें सिद्ध केले पसारे । सोवनी सोनार जोशी वेव्हारे ।
दुसी दिंडें घेतली थोरे । गौळीं खिल्लारें थापटिलीं ॥५४॥
चालिल्या पक्कान्नपरवडी । दुधा दह्यांच्या कावडी ।
तेलियें घेतल्या तेलाच्या जोडी । कापडघोडी चाट्यांचीं ॥५५॥
तांबोळी बांधिली आटकीं । ब्राम्हणीं बांधिली धोटकी ।
मायबापां न पुसतां एकी । चोरोनि मार्गी लागली एक ॥५६॥
पुत्रालागीं धावें माता । स्त्री-पुत्रालागी निघे पिता ।
पुतण्यालागीं धावें चुलता । श्रीरघुनाथा पहावया ॥५७॥
भाडाईत भारवाहक । । वोडे शिंपी नटनाटक ।
म्णिकर रजक नापिक । जळतारक निघाले ॥५८॥
सुतार शस्त्रकार रज्जुकार । मार्गीं विकरा होय अपार ।
घेवोनि चालिले पायतणांचे भार । मोची चांभार चालिले ॥५९॥
सकुटुंब निघाले समस्त । भाडें न मिळे देता अर्थ ।
एक म्हण्ती निघा त्व्रित । दुरी भरत अंतरला ॥६०॥
घरी राखण न राहे कोणी । निघती येरयेरांवरी रुसोनी ।
श्रीराम पहवया नयनी । उल्हास मनी सर्वांच्या ॥६१॥
खरावरी वळघोनी । हर्षे निघाल्या कुलालपत्नी ।
श्रीराम देखावया नयनी । अपमान मनी सुखे साहिती ॥६२॥
अवघियांही पुढे । भडेकरीं नेले गाडे ।
राजस ठ्ण्कती बापडे । त्याचाशीं भाडें जोडावया ॥६३॥
निघाले द्विजांचे संभार । संन्यासी चालिले अपार ।
नागवे चालिले दिगंबर । श्रीरामचंद्र पहावया ॥६४॥
ततः श्वेतैर्हयैर्यक्तमास्थाय स्यंदनोत्तमम् ।
प्रययौ भरतः श्रीरामान् रामदर्शनकांक्ष्यया ॥६॥
शतं सहस्त्राण्यश्वानां समारुढनि राघवं ॥
षष्टी रथसहस्त्राणि धन्विनो विविधायुधाः ॥७॥
अग्रतः प्रययुस्तस्य सर्वे मंत्रिपुरोहिताः ।
अधिरुह्य हयैयुक्तान्रथान्सूर्यरथोपमान ॥८॥
नवनागसहस्राणि कल्पितानि यथाविधि ।
अन्वयुर्भरतं यांतं राजपुत्रं यशस्विनं ॥९॥
भरताच्या सैन्याचे वर्णन :
श्वेतवारुयुक्त रथ । त्यावरी हर्षे बैसे भरत ।
शत्रुघ्नेंही प्रेरिला रथ । श्रीरघुनाथ भेटावया ॥६५॥
पालखीमाजी कौसल्या वाहूनी । आणि सुमित्रा दुसरी जननी ।
निघाल्या येरही राजपत्नी । श्रीरामदर्शनीं उद्यत ॥६६॥
कैकेयी माता न ये निःशेष । तीस झाले परम दुःख ।
ना रामराव ना भरत देख । काळे मुख केंवी दावूं ॥६७॥
वसिष्ठादि ऋषि समस्त । महंत प्रधानादि सुमंत ।
यांसी देवोनि उत्तम रथ । त्याम्समवेत निघाले ॥६८॥
षष्टिहायन भद्रजातीं । दहा सहस्र मत्त हस्ती ।
घंटा घागर्या पताका बहुती । दोही भागीशोभती भरताच्या ॥६९॥
अतिरथी महारथी । साठी सहस्र भद्रजाती ।
भरतापाठीसीं धांवती । रथ धडधडती सायुधीं ॥७०॥
रथांचिया गति विगती । एकापरीस एक दाविती ।
त्यांमाजि ध्नुष्याची वित्पती । शस्त्रगती साटोपा ॥७१॥
शतसहस्र सुजाती वारु । निघाला वीरांचा संभारू ।
नाना अलंकारी मनोहरू । करिती दुर्धरू सिंहनाद ॥७२॥
वारुवां बाधली मोहाळी । अंगटोप रागावळी ।
पाखरा झळकती तेजाळी । वीर महाबळी आरुढले ॥७३॥
वारू तीन पायांवरी नाचती । हो हो माम मा जी जी करिती ।
दवोनियां अंतराळी गती । वारू थापटिती महावीर ॥७४॥
कांतिया त्रिशूळ तोमर । भिंडीमाळ चेंडू चक्र ।
गदा मुद्गल लहुदी थोर थोर । आले मोगर पायांचे ॥७५॥
खेटक भालेजी अपार । पिलंगती पायाचें मोगर ।
गर्जत आले परशुधर । मल्ल दुर्धर तळपती ॥७६॥
सेळी सावळी शक्तियुक्त । अलगाईत बाणाईत ।
कोइतेकार अद्भुत । कटारहस्त लघुवेगी ॥७७॥
आडाऊ वोडणें थडकती । तळवे त्यांमाजी तळपती ।
हैकार थैकार पै देती । वीर गर्जती पायांचे ॥७८॥
चतुरंगसेनासंभार । राघवसेना अति दुर्धर ।
भरत चालिला सत्वर । लागला गजर वाद्यांचा ॥७९॥
कुऱ्हाडे कात्या कोइते हस्तीं । भारापुढें वने छेदिती ।
मातीकामें नेणो किती । भूमि सज्जिती चालावया ॥८०॥
भरतसैन्य पाहू गैरसमजाने गुहक गंगाकिनारी युद्ध करण्यास सज्ज :
भार चालिला अति दुर्धर । ठाकले भागीरथीतीर ।
देखोनि भरताचा भार । गुहक थोर क्षोभला ॥८१॥
कैसा राज्यलोभ अति दुर्धर । सख्या बंधूस पाडिलें वैर ।
भरतें सज्जोनिया भार । श्रीरामचंद्रा मारू जातो ॥८२॥
माझा स्वामी श्रीरघुनाथ । तयाचा हा करू पाहे घात ।
मी रणी विभांडीन भरत । सेना समस्त छेदीन ॥८३॥
अनु दशरथिं रामं पित्रा राज्याद्विवासितं ।
सामात्यो राज्य्लोभेन हंतुं भरत उद्यतः ॥१०॥
अद्य मे शरसंधातो मत्कार्मुकविनिःसृतः ।
निष्पतिष्यति गात्रेषु नरेषु गजयोधिषु ॥११॥
निविष्टा यत्र सेना सा सवाजिरथकुंजरा ।
तां च भूमिं करिष्यामि शरैः शोणितकर्दमां ॥१२॥
मम दाशरथी रामो भर्ता बंधु सुहृदगुरुः ।
अहं तस्य हितार्थाय करिष्यामि सुदुष्करं ॥१३॥
श्रीराम माझी माता पिता । श्रीराम माझा सुहृद भ्राता ।
श्रीराम "सदगुरू" निजात्मता । श्रीराम तत्वता आत्मा माझा ॥८४॥
त्याचा करावया घात । सैन्येंसी जातो भरत ।
त्याचा करीन मी निःपात । श्रीरामभक्त तै सत्य ॥८५॥
श्रीरामाचा मी मेटकरी । ठेविला आहे गंगातीरी ।
भरत येवोनि कैसेपरी । परतीरीं उतरेल ॥८६॥
निषादांसी सांगे गुहक । जरी भरत येईल सकटक ।
दृढ राखावे गंगातटाक । गंगोदक शिवों नेदी ॥८७॥
हे जरी आले युद्धासी । तरी मी ख्याती लावीन त्यांसी ।
धडमुंडांकित पृथ्वीसी । क्षणार्धैसीं मी करीन ॥८८॥
मारीन रथ वाजी कुंजर । रणी मारीन नरवीर ।
वाहतील अशुद्धाचे पूर । तैसे क्षात्र करीन ॥८९॥
श्रीरामाच्या निजकार्यार्था । निःशेष वेंचीन जीविता ।
येथोनिया पुढे भरता । त्या सर्वथा जाऊ नेदीं ॥९०॥
निधडॆ निषाद निःशंक । मेळवोनियां निजकटक ।
सन्नद्ध स्वये गुहक । सेनासन्मुख पै आला ॥९१॥
भरताचे व गुहकांचे ऐक्य :
भरतासी सांगती सैनिक । युद्धासी आलासे गुहक ।
धरोनिया गंगेचें तटाक । गंगोदक शिवो नेदी ॥९२॥
एक म्हणती राजा निमाला निःशंक । म्हणोनि आम्हांसी पारखा जाला गुहक ।
ताहना फुटताती लोक । गंगोदक स्पर्शौ नेदी ॥९३॥
गुहक बापुडे ते किती । त्यासी क्षणार्धै लावीन ख्याती ।
आज्ञा द्यावी आम्हांप्रती । कोपे दळपती पूसत ॥९४॥
विचारे बोलिला भरत । गुहक रामचा अति आप्त ।
त्याचा न घेता वृत्तांत । युद्धकदनार्थ करू नये ॥९५॥
भरत पुसे गुहकासी । तू का युद्ध करू पाहसी ।
येरू म्हणे तू अति बळेंसी । मारू का जाशी श्रीरामा ॥९६॥
माझा स्वामी वनवासी । सगळ बळे मारू पाहसी ।
हेंच वैर आम्हा तुम्हांसी । अति युद्धासी कारण ॥९७॥
तो म्हणे "सदगुरूचा" द्वेष करी । तोचि आमुचा मुख्य वैरी ।
त्यासी निवटीन शस्त्रधारीं । प्रतिज्ञा खरी हे माझी ॥९८॥
ऐकोनि गुहकाचा वचनार्थ । रथावरोनि पडिला भरत ।
दुःखे गडबडा लोळत । अवस्था प्राणांत ओढवली ॥९९॥
भरत म्हणे गुहकासी । वेगी मज वधी पापियसी ।
कैकेयीये जोडिल्या पापराशी । केलों जगासी अति निंद्य ॥१००॥
कैकेयी राज्यलोभाची थोरी । तेणे मी केलों रामाचा वैरी ।
तिचेनि मी निंद्य चराचरी । दुःखसागरी निमग्न ॥१॥
जो श्रीरामासी स्वये द्वेषी । त्यासी उतरती तिन्ही मसी ।
ते कैकेयी आर्जवाची मसी । माझ्या मुखासी लागली ॥२॥
तेणे मी झालो काळमुखा । मुख दाखवू न शकें लोका ।
कैकयीये दिधले परम दुःखा । ते कोणासी गुहका मी सांगू ॥३॥
गुहका तुझे मी धरितों चरण । वेगी सोडोनि निर्वाणबाण ।
छेदी माझे देहबंधन । पापा पुरश्चरण होईल ॥४॥
तू श्रीरामाचा परम आप्त । तरी माझाही सखा निश्चित ।
माझा करावा वचनार्थ । प्रायश्चित्तार्थ देह छेदी ॥५॥
ऐकोनि भरताचे वचन । गुहके घातले लोटांगण ।
मस्तकी धरिले सुदृढ चरण । पडिले आलिंगन आप्तत्वें ॥६॥
दिघांसही प्रेम पूर्ण । नयनी स्वानंदजीवन । गिहकें घातले ।
गुहकें घातले लोटांगण । काय आपण बोलत ॥७॥
श्रीरामी ज्यासी पूर्ण भक्ती । तो मज आप्त त्रिजगती ।
तोचि माझा निजसांगाती । मी चरणार्थीं तयाचा ॥८॥
सुमंत गुहकाला भरताची खरी भूमिका समजावतो :
तंव गुहकासी सांगे सुमंत । राज्य देता न घे भरत ।
राज्यी अभिषेकावा रघुनाथ । वना असे जात आणावया ॥९॥
ऐकोनि सुमंताची गोष्टी । भरताचे प्रेम देखोनि दृष्टी ।
गुहकें चरणी घातली मिठी । म्हणे धन्य सृष्टी भरता तू ॥११०॥
गुहका सांगाते घेवोन । भरतें केले संध्यास्नान ।
करोनिया पितृतर्पण । गुहकासी आपण पूसत ॥११॥
गंगातीरी एक राती । श्रीरामे केली होती वस्ती ।
शयन केले कोणे स्थिती । ते मजप्रती दाखवी ॥१२॥
गुहक भरताला श्रीरामांची निवासाची जागा दाखवितो, त्या दोघांचा संवाद :
गुहक जो निषादपती । तेणे भरता धरोनि हाती ।
जेथे श्रीरामे केली वस्ती । त्या स्थळाप्रती आणिला ॥१३॥
गुहक सांगे भरताजवळी । याचि इंगुदीवृक्षातळीं ।
श्रीराम राहिला महाबळीं । ये गंगाजळीं स्नान केले ॥१४॥
याचि तृण्सेजे रघुनंदन । सीतेसहित केले शयन ।
निद्रा न करिच लक्ष्मण । बहु प्रार्थना म्या केली ॥१५॥
तो म्हणे श्रीरामसेवा समाधान । न करी जडमूढशयन ।
ऐकता भरतासी आले रुदन । मूर्छापन्न तो पडिला ॥१६॥
भरत पडिला मूर्छापन्न । शत्रुघ्न जाला अति उद्विग्न ।
कौसल्या सुमित्रा हडबडोन । आल्या धांवोन राज्यपत्न्या ॥१७॥
वनवासींची ऐकिली वार्ता । तेणे अति दुःख श्त्रुघ्नभरता ।
वनी क्षेम रघुनाथा । लक्ष्मण सीता सुखे असती ॥१८॥
काय वनवासाची कथा । वेगी साम्गावी गुहका तत्त्वता ।
दुःखे रुदन करिती माता । श्रीरघुनाथाचेनि विरहे ॥१९॥
गुहक सांगता करी रुदन । ये वृक्षीं राहिला रघुनंदन ।
श्रीरामे सीतेसहित केले शयन । हे पावन तृणशय्या ॥१२०॥
वृक्ष वंदितो मी ओजा । नित्य पूजितों तृणशेजा ।
पंथींच्या वंदितों पै रजा । श्रीरघुराजपदनिष्ठा ॥२१॥
श्रीरामांना अरण्यजीवन कंठावे लागते म्हणून सर्वजण उद्विग्न :
ऐकोनि गुहकाची वाणी । भरत लागे त्याचे चरणी ।
म्हणे गुहका तू धन्य त्रिभुवनी । श्रीरामभजनी शुद्ध प्रेम ॥२२॥
श्रीरामभावें गा संपूर्ण । तू वंदिसी वृक्ष तॄण ।
याहीपरता लाभ कोण । सूक्ष्मभजननिष्ठा ॥२३॥
धन्य धन्य गुहका तुझा भाव । तुज तुष्टला श्रीरामराव ।
फिटला देहबुद्धिसंदेह । निःसंदेह रामभजनीं ॥२४॥
गुहक निषाद अति अपवित्र । श्रीरामभजने जाला पवित्र ।
दीनदयाळ श्रीरामचंद्र । नामे पवित्र महादोषी ॥२५॥
गुहकाची अनन्य भक्ती । देखोनि भरता अति प्रीती ।
विषाद सांडॊनिया चित्ती । जाले सांगाती जिवलग ॥२६॥
श्रीरामसीतातृणशेजार । कौसल्या देखोनि साचार ।
दुःख दाटले दुर्धर । काय उत्तर बोलली ॥२७॥
सीता सती सुकुमार । राम सुकुमारां अति सुकुमार ।
सुमनशेज खुपे साचार । तृणशेजार त्यांसी देखा ॥२८॥
राजान्नें सेविती पवित्र । त्यांसी लेंघनें त्रिरात्र ।
कैकेयीयें केले हे विचित्र । सखे सावत्र दुःखी केले ॥२९॥
गुहक सर्वांना नौकेतून गंगेच्या परतीराला नेतो :
ऐसी चालता उपपत्ती । निमेषामाजी गेली राती ।
उदया आला पै गभस्ती । निषादांप्रती गुहक बोले ॥१३०॥
भरत उतरेल पैलपार नावा आणा रे अति सत्वर ।
घंटा पताका सालंकार । मृदु अरुवार बैसणिया ॥३१॥
रथवाजिहस्तियुक्त । स्तोम स्तोम जेथींचा तेथ ।
कटक उतरेल समस्त । अति विस्मित तेणे भरत ॥३२॥
गुहक जो का निषादपती । नावा घेवोनिया हाती ।
स्वये आला भरताप्रती । करी विनंती आरुढा जी ॥३३॥
वसिष्ठांचे चणांवरी । गुहक लोटांगण करी ।
तुम्ही तारक भवसागरीं । स्वामी नावेवरी बैसावें ॥३४॥
वसिष्ठे देखोनि गुहकासी । निजात्मप्रीतां अलिंगी त्यासी ।
आजिंचा तारक तू आम्हा होसी । परपारासी न्यावया ॥३५॥
गुहक म्हणे श्रीरघुनाथा । तारक तुझी कृपा तत्वता ।
कृपेने हात ठेविजे माथा । मग मी समस्ता तारीन ॥३६॥
ऐसी गुहक बोलता बोली । वसिष्ठासी निजखूण पावली ।
हरिखें पिटोनियां टाळी । नावेजवळी तो आला ॥३७॥
वसिष्ठदि महंत थोर । त्यासी नाव दिघली स्वतंत्र ।
ते नव्हेती पै परतंत्र । भवसमुद्रतारक ॥३८॥
राजपत्न्या अति सुकुमार । त्यांसी नाव दिधली थोर ।
मृदु आस्तरण परिकर । तेथे समग्र बैसविल्या ॥३९॥
भरत शत्रुघ्न नावेवरी । निषाणें त्राहाटिल्या भेरी ।
नाना वाद्येंसी जयजयकारीं । वेगी परपारीं उतरले ॥१४०॥
भरत पुसे गुहकातें । सैन्य लावावें कोणे पंथे ।
तो म्हणे मी येतो सांगाते । भुयाळातें घेवोनी ॥४१॥
गुहक अति हर्षयुक्तें । चालिला भरताचे सांगाते ।
दृष्टी पहावया श्रीरामाते । बाह्य स्वार्थतें सांडूनी ॥४२॥
मुमुक्षुवा साधनी अति प्रीती । तैसी गुहका श्रीरामभक्ती ।
भुयाळ घेवोनि सांगाती मार्ग शोधिती अतिनिष्ठा ॥४३॥
भरतगुहकांचा विवाद । दोघा अनुतापसंवाद ।
एकाजनार्दनीं निजबोध । परमानंद रामकथा ॥४४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
भरतवनाभिगमनगुहकसंवादो नाम द्वदशोऽध्यायः ॥१२॥
॥ ओंव्या १४४ ॥ श्लोक १३ ॥ एवं १५७ ॥
