वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

गोकुळी गोमाई गवळणी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085207 · अभंग क्र. ९७

97.
गोकुळी गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणी । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥
कृष्णा पाहता मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागले ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥
सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केले ॥३॥
राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर का येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटे ॥४॥
कृष्ण काय म्हणे तिसी । येणे जाणे नाही आम्हांसी । जे का वदली रमनेसे । तिची प्राप्ती तुजलागीं ॥५॥
देव ब्राह्मणीचा वेष । धरिता जाला जगन्निवासा । हा रस ऐकता सायास । मुढ जन उद्धरती ॥६॥
पांढर्‍या पातलाची कासोटी । जीर्ण चीर वेष्टिलें कंठी । हाता घेउनी धाकुटी । काठी धरुनी चालिली ॥७॥
वार्‍यासारखी चाचरी जाये । तोल सांभाळुनी उभी राहे । अवसान धरुनिया पाहे । गोमाइनें देखिली ॥८॥
गोमाई म्हणे अहो ब्राह्मणि । कोठे जातेस आसीस कोठुनी । आशापाश नाही कोणी । माझी मीच ऐकली ॥९॥
करुनी आले वाराणाशी । पुढे जाणे रामेश्वरासी । आणिक जाणे बहु तीर्थासे । ऐसी गोमाईसी बोलली ॥१०॥
येवढ्या नगरामध्ये कोणी । दयाळु नाही तुजावांचुनी । जागा देई वृंदावनी । रातचे रात करमीन ॥११॥
अस्ता गेला वासरमणी । सुखें राहे वृदावनी । आज्ञा केली इंद्रालागुनी । सत्वर मेघा पाठवी ॥१२॥
वीज लावली मेघमंडळी । ढग निवाला तेच काळी । मेघाने सोडिल्या फळी । जनलोकक पाहतसे ॥१३॥
मेघाने सोडिल्या धारा । थंड गार सुटला वारा । शामाई कांपतसे थरथरां॥गोमाइने देखिली ॥१४॥
गोमाई म्हणे अहो साजणी । आंत येई वो ब्राह्मणी । मरुनी जाशील वृंदावनीं । प्रायश्चित्त मजवरी येईल ॥१५॥
मरूनि जाईल वृंदावनीं । परी मी येईना कोणाचे सदनी । देव राखीव मजलागुनी । ऐशी शामाई बोलली ॥१६॥
इतुका मेघ वर्षला थोर । भिजलें नाही तुझे वस्त्र । शामाई म्हणे आम्हांवर । इश्वराची बहु कृपा ॥१७॥
तुम्ही शुद्ध गे ब्राह्मणी । देव तुम्ही केला ऋणी । आम्ही नरदेहासी येऊनी । प्रपंचसदनीं बुडालों ॥१८॥
दारावाटे बोलावुन । नेत्री पाहे अवलोकुन । चक्रपाणी ओळखुन । चरणी ठाव मज देई ॥१९॥
आता उठावेना करु काई । हाती धरुनि उठवी गोमाई । कवाड उघडोनि लावलाही । बळे सदना लोटलीं ॥२०॥
बळे सदनीं लोटलें मला । मजवर बलात्कार केला । मी सांगेन नंदजीला । म्हणोनी गलबला करितसे ॥२१॥
सदनी जाता तत्क्षाणी । चवघी उद्धरल्या कामिनी । दारापाशी येऊनी । हाकां मारी गोमाई ॥२२॥
गोमाई येऊनी लागे चरणा । पुनीत केल्या आमुच्या सुना । नासिका लावियेला चुना । पाहुन पळे गोविंद॥२३॥
गोमाई उद्धरली कथा । आपण होऊनि श्रोता वक्ता । एका जनार्दनी दाता । सत्य वार्ता ही माझी ॥२४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग