भेटीची आवडी उताविळ म
3307.
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेसे ध्यान जीवी जीवा ॥१॥
आता आवडीचा पुरवावा सोहंळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥धृपद॥
नेत्र उन्मळित राहिले ताटस्थी । गंगा अश्रुपाती वहावली ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥
अर्थ :
देवा तुमच्या भेटीविषयी माझ्या मनाला आवड लागली आहे आणि माझे मन तुमची भेट घेण्याविषयी उतावीळ झाले आहे आणि तुमच्या रुपाचेच ध्यान माझ्या जीवाला लागले आहे. हे गोपाळा माझ्या आवडीचा सोहंळा तुम्ही पूर्ण करा आणि मला येऊन तुम्ही आलिंगन दयावे. देवा तुमची भेट व्हावी यासाठी माझे नेत्र तटस्थ झाले आहे आणि तुमची भेट होत नाही म्हणून माझ्या डोळयामधून गंगेसारखे अश्रु वाहात आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या मूळच्या वचनाला तुम्ही खरे करुन दाखवा.
