एकातांचे सुख देई मज
1560.
एकातांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥
ध्यानी रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडो नेदी ॥धृपद॥
मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥
कीर्ती ऐकोनिया जालो शरणांगत । दासाचे तू हित करितोसी ॥३॥
तुका म्हणे मी तो दीन पापराशी । घालावे पाठीशी मायबापा ॥४॥
अर्थ :
अर्थ : :–हे देवा पांडुरंगा संसारापासून होणारे आघात चुकवून, त्याच्या अपेक्षांचे माझ्यावर होणार आघात चुकवून आता कृपा करून एकाताचे सुख माझ्या पदरात घाल. माझ्या ध्यानात निरंतर तुझे रूप असून माझ्या जिव्हेवर सतत तुझे नाम आहे जे मला तुझा विसर किंचितदेखील पडू देत नाही. ज्याप्रमाणे आई आणि तिच्या सानुल्याची भेट होताच दोघाच्या जीवाला सुख लाभते आणि या सुखाची त्याला आवड निर्माण होते तशीच गोडी तू देखील मला भेट देऊन दे. मी तुझी अपार कीर्ती ऐकून तुला शरण आलो आहे कारण शरणागताला तू पाठीशी घालतोस आणि तुझ्या दासाचे तू हित घडवून आणतोस हे मला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा, हे मायबापा मी दीनवाणा आहे माझ्या हातून खूप पापे घडली आहेत किंबहुना मी पापाची राशीच आहे तेव्हा तू मला तुझ्या पाठीशी घालावेस हीच काय ती तुझ्यापाशी माझी विनंती आहे, माझे मागणे आहे.
