वैभव विलास नेणोनिया
84.
वैभव विलास नेणोनिया सायास । कल्पनेची आस नाही जेथे ॥१॥
ते रूप दुर्लभ कृष्णमूर्तिठसा । वोतल्या दशदिशा नंदघरी ॥२॥
योगीयांचे ध्यान मनाचे उन्मन । भक्तांचे जीवन गाई चारी ॥३॥
निवृत्ति साकार ब्रह्मींचा प्रकार । ऊँतत्सदाकार कृष्णलीला ॥४॥
अर्थ:
जो परमात्मा अरुप आहे त्याच्या ठिकाणी वैभव, विलासांचे सायास नाहीत. कल्पनाचे आस नाही. त्या परमात्म्याला आकारच नाही त्याला दिशा मध्ये कसे बांधणार असा तो नंदाघरी दुर्लभ श्रीकृष्ण रुप घेऊन आला आहे.तोच परमात्मा योग्यांचे निजध्यान जरी असले तरी ते नंदाच्या गाई राखत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा आपल्या लिला ॐ तत्सदाकार आहेत त्याच मंत्रात मी लीन आहे.
