ऐका हे वचन माझे संतज
1471.
ऐका हे वचन माझे संतजन । विनवितो जोडुन कर तुम्हा ॥१॥
तर्क करूनिया आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥धृपद॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझे त्याचे गुंतलेंसे पायी । म्हणऊनि काही नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्ती भंग मना ॥४॥
अर्थ :
हे संत जन हो माझे बोलणे तुम्ही कृपया करून ऐका हे मी तुम्हाला हात जोडून मी विनवीत आहे. काही लोक आपल्याला जे वाटेल ते तर्ककुतर्क करतात, ते काहीही बडबडतात त्यांना कोणी थांबवावे ? आमच्या जिवाच्या अंतर्भाव तो रुक्मिणीचा पती पांडुरंग जाणतो आहे. माझे चित्त पांडुरंगाच्या पायी गुंतलेले आहे त्यामुळेच मला त्याच्यावाचून दुसरे काहीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही भाविक माझ्या मताला मिळतात तर काही तर्किक माझे मत मानत नाही त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो व त्यामुळे माझा मनोभंग होत आहे.
