तोडुनि पुष्पवटिका फळ
1816.
तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥१॥
कोण हित तेणे देखिले आपुले । आणीक पाहिले सुख काई ॥धृपद॥
धान्ये बीजे जेणे जाळोनि सकळे । पेरितो काऱ्हाळे जिरे बीज ॥२॥
मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडराने जाय घेउनि लोका ॥३॥
विषाचे अमृत ठेवूनिया नाम । करितो अधम ब्रम्हहत्या ॥४॥
तुका म्हणे त्यास नाइके सांगता । तया हाल करिता पाप नाही ॥५॥
अर्थ :
जो मूर्ख सुगंधी पुष्पवाटिका व मधुर फळाचे वृक्ष तोडून बाबळीचे रक्षण करतो, त्याने आपले हित कशात पाहिले आणि आपले सुखही त्याने कशात पाहिले आहे ? जो सर्व प्रकारचे धान्याचे बीजे जाळून कार्हाळे आणि जीरे या बीजांची पेरणी करतो, मागे झालेल्या संतांनी जी परमार्थाची चांगली वाट निर्माण केली ती वाट सोडून देऊन जो लोकांना आड रानाने घेऊन जातो. आणि जो विषाचे नाम ‘अमृत " आहे असे म्हणतो व ते घेऊन दुसऱ्याला देतो. तो ब्रम्ह हत्या सारखे पातक करतो असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मनुष्यला कितीही समजावून सांगितले चांगला उपदेश केला तरीही ते ऐकत नाही मग अशाची आपण कितीही फजिती केली कितीही हाल केले तरी त्यापासून पाप लागत नाही.
