वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

वर्षाकाळी नदिया पूर्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074458 · अभंग क्र. ५३०

530.
वर्षाकाळी नदिया पूर्ण भरती ।
येऊनी मिळती सिंधुमाजी ॥१॥
ऊष्ण काळी न्यून आटोनिया गेली ।
नाही खंती केली सिंधु त्यांते ॥२॥
सुखदुःखभोग भोगिता प्राचिनी ।
अखंड सज्जनी शांती असे ॥३॥
नाही तया भूती सर्व ब्रह्मएक ।
अनुभऊनी सुख भोगिताती ॥४॥
तत्त्वमसी बोध आत्मानात्म भेदले ।
दृश्य विसरले भास आधी ॥५॥
सज्ञान चेईले अज्ञान निदेले ।
विपरीत केले सुपरीत ॥६॥
द्रव आणि स्थिर मुळी एक नीर ।
झाला ज्ञानेश्वर स्वय ब्रह्म ॥७॥

अर्थ :
पावसाळ्यामध्ये नद्या आपल्या बरोबर पुष्कळ पाणी घेऊन समद्राला मिळतात. उन्हाळयांत त्या आटून गेल्यामुळे पाणी थोडे आणतात म्हणून ज्या प्रमाणे समुद्राने त्याबद्धल कधी खेद केला नाही. त्याप्रमाणे सज्जनही अखंड शांती असल्यामुळे पूर्वकर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भोगाबद्दल सुखदुःख मानीत नाहीत त्याना त्याची खंती वाटत नाही. कारण आपण ब्रह्मरुप आहोत व तेच ब्रह्म सर्व भूतमात्रात भरलेले आहे. असा त्यांचा अनुभव असतो. तू ब्रह्म आहेस या उपदेशाने झालेला बोध त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आत्मानात्मविचाराने अनात्म्याचा नाश होऊन गेलेला असतो. म्हणजे दृश्य पदार्थ सत्यत्वाने भासतच नाहीत. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची झोप जाऊन त्यांना ज्ञानाची जागृती आलेली असते. व बुध्दीचा विपरीतपणा जाऊन ते योग्य काम करु लागते. पाणी पातळ असो किंवा गारेप्रमाणे घट्ट असो. ते पाणीच असते. त्याप्रमाणे ब्रह्म कोणत्याही स्थितीत भासले तरी ते ब्रह्मच आहे. व तेच स्वयंब्रह्म मी झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग