भजन चालिलें उफाराटें
2600.
भजन चालिलें उफाराटें । कवण जाणे खरें खोटे ॥१॥
जवळी असता देव । भक्ता उपजला संदेह ॥२॥
सचेतन तुळशी तोडा । वाहाती अचेतन दगडा ॥३॥
बेला केली ताडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥
आग्निहोत्राचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥
तिन्ही देव पिंपळांत । अग्निहोत्रीं केला घात ॥६॥
मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥
चवदा गांठींचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥
शालिग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥९॥
एका जनार्दनी एक भाव । कुभाविका कैंचा देव ॥१०॥
२६०१ .
प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव 2601
प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगो अंगी ॥१॥
असता सर्वत्र बाहेरी अंतरी । संतुष्टा भीतरी म्हणे देव ॥२॥
तेचि ते द्वारका तेचि हे पंढरी । सर्वत्र न धरी तोचि भाव ॥३॥
तीर्थयात्रा करी देवक असे क्षेत्रीं । येर काय सर्वत्री वोस पडले ॥४॥
पुण्य क्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप । नवल संताप कल्पनेचा ॥५॥
एका जनार्दनी स्वतः सिद्ध असे । नाथिलेंची पिसे मत वाद ॥६॥
