गौळणींची धांदल - अभं
265.
गौळणींची धांदल - अभंग २६५४
कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी ।
एकी त्या कवळ करी । एकी त्या आलिया मार्जन शिरी ॥१॥
अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका भाळल्या तुझिया गुणा ।
जय जय मानस मनमोहना । जीवी जीवे गुंतल्या नंदनंदना ॥२॥
कृष्णदृष्टी पहावया प्राणपिसा । एकी त्या आलिया मुक्तकेशां ।
एकी त्या आलिया विगुंतवासा । देह गेह नाठवे कृष्णमानसा ॥३॥
कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी । अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं ।
एकी त्या आलिया कर्म सांडोनी बाणलीं लेणीं । तत्नुमन वेधला सांगपणी ॥४॥
एकी त्या काजळ सुदल्या मुखी । जावड कुंकम लाविती नाकीं ।
तांबुल विडीया खोविती मस्ताकीं । कृष्णदृष्टी इंद्रिया नाही वोळखी ॥५॥
एकी त्या तानवडे लेइल्या पायी । पायींची पोल्हारे कानी वो बाई ।
वाळे वाक्या बांधिल्या कंठाचे ठायी । लाहे लाहे नेपुरें बांधिली डोई ॥६॥
एकी त्या आलिया चोखणा शिरी । नागवें शरीर नेणे सुंदरीं ।
मोतियाचे हार नेसल्या नारीं । पाटाउ विसरल्या घरच्या घरी ॥७॥
एकी त्या अर्धांगी लेईल्या चोळी । गुढरिया बांधिली मोतिया जाळी ।
नाकींचे मुक्ताफळ खोविती भाळीं । देह गेह नाठवें कृष्ण स्नेहाळी ॥८॥
एकी त्या कडिये घेतिल्या झारी । बाळके विसरल्या घरींच्याघरीं ।
दृष्टी सम दृश्या न दिसे नारी । पुत्र स्नेहें नाठवे देखोनि हरी ॥९॥
रंगी रंगल्या आल्हादे भारी । आपपर नाठवे तया सुंदरी ।
एका जनार्दनी वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥
