(बाळक्रीडा अभंग)
3830.
(बाळक्रीडा अभंग)
तुका म्हणे सुख घेतले गोपाळी । नाचती कांबळी करुनि ध्वजा ॥१॥
करूनिया टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडांचे ॥२॥
दगडांचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गाता छंद ताल नाही ॥३॥
ताल नाही गाता नाचता गोपाळा । घननीळ सावळा तयामध्ये ॥४॥
मध्ये जया हरी ते सुख आगळे । देहभाव काळे नाही तया ॥५॥
तयांसि आळंगी आपुलिया करी । जाती भूमीवरी लोटांगणी ॥६॥
निजभाव देखे जयांचिये अंगी । तुका म्हणे संगी क्रीडे तया ॥७॥
अर्थ :
तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळांना कृष्णाने आपले फार सुख दिले ते कांबळीला ध्वजा करुन एकदा नाचत होते. आपल्या टि-यांचे मृदुंग आणि दगड्यांचे टाळ करुन ते गोपाळ वाजवत होते. अहो भगवंताचे एक गीत गाताना ते टाळ वाजवत होते त्या टाळांना कोणत्या प्रकारचा नाद होता व कोणत्याही प्रकारचा छंद व तालही नव्हता. भगवंताचे गीत गाताना गोपाळांना कोणत्याही प्रकारचा ताल आणि छंद नव्हता परंतु प्रत्यक्ष घननीळ सावळा श्रीकृष्ण् त्यांच्यामध्ये होता. ज्या गोपाळांच्या मध्ये प्रत्यक्ष हरी आहे मग त्या हरीचे सुख सर्वांपेक्षा वेगळेच आहे त्या सुखापुढे त्यांना देहभाव आणि काळवेळ काहीच कळत नाही. जे गोपाळ भूमीवर लोटांगण घेऊन हरीजवळ जात होते त्यांना हरी आपल्या हाताने उठून आलिंगन देत होता. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंगी आपल्या विषयी खरा भक्तिभाव देवाला दिसत असे त्याच्याबरोबर देव खेळ खेळत असे.
