(बाळक्रीडा अभंग)
3882.
(बाळक्रीडा अभंग)
गोविंदाचे नाम गोड घेता वाचे । तेथे हे कइंचे वैरभाव ॥१॥
भावे नमस्कार घातला सकळी । लोटांगणे तळी महीवरी ॥२॥
वरी हातबाहे उभारिली देवे । कळलीया भावे सकळांच्या ॥३॥
सकळ ही वरी बहुडविले स्थळा । चलावे गोपाळा म्हणे घरा ॥४॥
राहिली ही नाचो गोविंदाच्या बोले । पडिलीया डोले छंदे हो ती ॥५॥
छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥६॥
त्यासी तुका म्हणे आनंदे सकळ । ठेंगणे गोपाळा समागमे ॥७॥
अर्थ :
गोविंदाचे नाम अतिशय गोड आहे ते वाचेने घेतले असता तेथे वैरभाव राहीलच कसा ? इंद्र देवाने व गोकुळातील लोकांनी भूमीवर साष्टांग लोटांगण घेऊन कृष्णाला दंडवत घातला. सर्वांच्या अंत:करणातील भक्तिभाव जाणून देवाने वर हात केला. देवाने सर्वांना आपआपल्या स्थानी जाण्यास सांगितले व गोपाळांनाही आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. कृष्णाने सर्वांना आपआपल्या स्थळी जाण्याची आज्ञा केली त्यानंतर सर्व गोपाळांचे नाचणे बंद झाले गोपाळ आपआपल्या घरी गेल्यानंतर देखील स्वस्थ पडल्यावरही कृष्णाच्या छंदात आनंदाने नाचत होते. त्या सर्व गोकुळवाशीयांना कृष्णाचा इतका छंद लागला होता की, त्यांना स्वत:लाही स्वत:ला आवरता येत नव्हते इतका कृष्णाचा आनंदाचा छंद त्यांना आला होता. तुकाराम महाराज म्हणतात, लहान गोपाळांच्या संगतीत तर त्यांना जास्त आनंद झाला.
