स्मरता निवृत्ति पावल
1620.
स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती । संसाराची शांती जाली माझ्या ॥१॥
नमितां ज्ञानदेवा पावलो विसावां । अंतरींचा हेवा विसरलो ॥२॥
सुखाचा निधान तो माझा सोपान । विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई ॥३॥
चांगदेव माझा आनदाचा तारु । सुखाचा सागरु वटेश्वर ॥४॥
सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरी सोनार प्राण माझा ॥५॥
आठवितां नामा पावलों विश्राम । मोक्षमार्गीं आम्हा वाट जालीं ॥६॥
परिसा भागवत जीवा आवडता । गोरा आणि सांवता सखे माझे ॥७॥
जनजसवंत सुरदास संत । नित्य प्राणिपात वैष्णवांसी ॥८॥
वंदूं भानुदास वैष्णवांचे कुळीं । ज्यासी वनमाळी मागे पुढे ॥९॥
बाळपणी जेणे भानु आराधिला । वंश निरविला देवराया ॥१०॥
धन्य त्यांचा वंश धन्य त्यांचे कुळ । परब्रह्मा केवळ त्यांचे वंशीं ॥११॥
एका जनार्दनी संताचे स्तवन । जनी जनार्दन नमीयेला ॥१२॥
