नीती भारुड
1.
नीती भारुड
नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक ।
मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥
सांडावरुन जाऊ नये । लांच खाऊ नये ।
चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥
अक्रीत घेऊ नये । इमान सोडु नये ।
बेमान होऊ नये । कोणी एक ॥३॥
सज्जनाशी विंटू नये । नीचासवे बाटू नये ।
तस्कराशी पुसू नये । कोणी एक ॥४॥
भक्तिमार्ग खंडू नये । कुभांडयासी तंडू नये ।
खळासंगे भांडू नये । कोणी एक ॥५॥
सत्पुरुषाशी छळू नये । शिवेचा गुंडा डाळू नये ।
केला नेम टाळू नये । कोणी एक ॥६॥
सद्गुरु सेवा सोडू नये । कुळ धर्मासी मोडू नये ।
पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥७॥
संपत्ति आलिया माजू नये । अभिमाने फुगू नये ।
सभा देखून लाजू नये । कोणी एक ॥८॥
असत्यवाद करु नये । खोटा संग धरु नये ।
मोचकाशी मैत्री करु नये । कोणी एक ॥९॥
भलते भरी पडू नये । अनाचार करु नये ।
कपट मनी धरु नये । कोणी एक ॥१०॥
जन्मा आलिया स्वभावे । काही सार्थक करावे ।
ऐसे मनी विचारवे । कोणी एक ॥११॥
एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे ।
सदा हरिनाम उच्चारावे । कोणी एक ॥१२॥
