कैसे एक नवल वर्तले ।
345.
कैसे एक नवल वर्तले ।
सांगता न ये ऐसे वो देखिले ।
मन माझे चकित पै झाले ।
विवेकासी गूढ वो पडिले॥धृ॥
बुद्धीचा पै निश्चयो राहिला ।
चित्ताचा हेतुचि तुटला ।
अहंकार हा समूळी निमाला ।
नवलावो सखिये जहाला ॥१॥
जागृतीच्या जागण्यामाजी वो ।
जागताचि देखिले चोज वो ।
नेणो कैची आली हे दूती वो ।
खुणावुनी खूण हे दावी वो ।
शब्देविण लक्ष ते लागले ।
लक्षी लक्ष लागता भेदले ।
तेणे देह व्याकूळ पडियेले ।
अंतर्बाह्य स्वरूप कोंदले ॥२॥
रूप त्याचे सांगता अपार ।
षड्वर्णारहित सुंदर ।
नखी शोभा कोटी दिनकर ।
वर्णावया भागला फणिवर ।
ऐसे रूप न देखे मी डोळा ।
तिन्ही लोक धुंडिता भूगोळा ।
देखोनिया अंतरी कळवळा ।
बोलता हे कुंठित रसाळा ॥३॥
एकाएकी वो पडियेली गाठी ।
देखोनिया मन हे वो तुटी ।
अखंडता लागली हे दृष्टी ।
परमानंदी पडली वो मिठी ।
निमाल्या वैखणी आदि वाचा ।
जाला न्यास चतुष्टयदेहाचा ।
प्रकाश हा थोर उन्मनीचा ।
काय सांगो महिमा तियेचा ॥४॥
अवस्था हे लागता उन्मनी ।
ब्रह्मरूप दिसे जनी वनी ।
येकायेकी जडली नयनी ।
दुजेपण न दिसे साजणी ।
झाडिता हा न झडेचि कैसा ।
पहाता गे सर्व देही ठसा ।
पृथ्वी आप तेज या आकाशा ।
व्यापक हा दिसे दाही दिशा ॥५॥
आता काय करू गे साजणी ।
कैसी याची जाली झडपाणी ।
भेटे वो ऐसा कोन्ही गुणी ।
दैवत हे काढील क्षणी ।
सहा चारी अठरा भगले ।
काही केल्या सर्वता नुखळे ।
बहेणि म्हणे अधिकचि ते जडले ।
कोण भूत लागले न कळे ॥६॥
