आइकावी माझी कवतुकउत्
2922.
आइकावी माझी कवतुकउत्तरे । देउनी सादरे चित्त देवा ॥१॥
वोरसे आवडी आलो पायापासी । होय ते मनेसी सुख कीजे ॥धृपद॥
तुमचे न भंगे सर्वोत्तमपण । करिता समाधान लेंकराचे ॥२॥
तुका म्हणे जरी बोलतो बोबडे । तरी लाडे कोडे कवतुके ॥३॥
अर्थ :
देवा माझे कौतुकाचे बोलणे तुम्ही चित्त देऊन सावधानतेने ऐकावे. देवा तुमच्या प्रेमरसाच्या आवडीने मी तुमच्या पायाजवळ आलो आहे आणि ज्या योगाने माझे मन सुखी होईल असेच तुम्ही काहीतरी करा. देवा तुम्ही माझ्यासारख्या लेकराचे जर काही समाधान केले तर तुमचा सर्वोत्तमपणा भंग पावणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्याशी बोबडे, लाडाने बोलत आहे तरी देखील तुम्ही त्याचे कोड कौतुक करा.
