करूनी विनवणी पायी ठे
3947.
करूनी विनवणी पायी ठेवी माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥धृपद॥
असो नसो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे तुझी आम्ही वेडींवांकुडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥३॥
अर्थ :
हे पंढरीनाथा मी तुम्हाला विनवणी करुन तुमच्या पायावर माथा ठेवीत आहे त्यामुळे तुम्ही माझी विनंती ऐका. देवा तुमच्या पायाजवळच अखंडीतपणे मी असावे असे मला वाटते त्यामुळे थोडासा संकोच तुम्ही सहन करुन मला तुमच्या पायाजवळ जागा दयावी. हे पंढरीराया माझ्या ठिकाणी भक्तिभाव असो वा नसो परंतु मी तुमच्या ठिकाणी आलो आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुझी वेडीवाकडी लेकर आहोत त्यामुळे आम्ही तुझे नाम घेत आहोत व तुमच्या नामाच्या आधारानेच आमचा भव पाश तुम्ही तोडून टाका.
