उदारा कृपाळा अंगा दे
3946.
उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवे पण आता आमुचा दावा ॥१॥
कैसा जासी सांग आता मजपासुनी । केले वाताहात दिले संसारा पाणी ॥धृपद॥
अवघी आवरूनि तुझे लाविली पाठी । आता विसर त्या सोह कोहंच्या गोष्टी ॥२॥
तुका म्हणे आता चरणी घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आम्हासी तुटी ॥३॥
अर्थ :
हे उदारा कृपाळा देवांच्या देवा आता मी प्रतिज्ञा करुन सांगतो की, आमचा तुझ्यावर दावा म्हणजे हक्क आहे. आता तू माझ्यापासून दूर कसा जाशील ते मला तू सांग कारण तुझ्यासाठी मी माझ्या संसाराची वाताहात करुन संसारावर मी पाणी सोडले आहे. देवा मी माझ्या सर्व इंद्रियांना आवरुन तुझ्या पाठीमागे लावले आहे आता सोहंम, कोहंमच्या गोष्टी म्हणजे तुझ्या नीजस्वरुप आणि देहाच्या अहंकृतीच्या गोष्टी सोडून दयावेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी आणि तू एकच आहे हे मला समजले आहे त्यामुळे मी तुझ्या चरणाला मिठी घातली आहे त्यामुळे आपल्या दोघामध्ये तूट जरी पडली तरी काहीच हरकत नाही.
