आता औटपीठीचा मार्ग ए
433.
आता औटपीठीचा मार्ग एक बाई ।
निशिदिनी पाही शोध करा ॥१॥
औटहाट प्रमाण सत्य की हे जाण ।
त्यांतील जे स्थान ऐके एक ॥२॥
महालिंग स्थान टाळू एके संधी ।
तेथे एक सिद्धि तेजोमय ॥३॥
मार्ग तेथ परतले दोही भागी ।
पश्चिमी महालिंगी मार्ग ऐसा ॥४॥
सत्रावीचे शिखरी मार्ग एक गेला ।
तो म्या देखियेला याच देही ॥५॥
महालिंगी मार्ग अंत नाही ज्याचा ।
शोध करिता वाचा कुंठितची ॥६॥
ज्ञानदेव म्हणे हा विचार पाहा ।
जाणता दाविता विरळा एक ॥७॥
अर्थ :
महाकारण स्थानापैकी औटपीठ हे एक स्थान आहे. त्याच्याकडे जाणाऱ्या मार्गाचा रात्रंदिवस शोध करा. साडेतीन हाताचा हा स्थूल देह आहे. त्यात महालिंग स्थान असून ते मस्तकातील टाळूजवळ आहे. त्यामध्ये तेजोमय एक सिद्धी आहे. या ठिकाणाहून दोन रस्ते फुटतात त्यापैकी पश्चिमेकडचा म्हणजे दैवी संपत्तिचा ब्रह्मरूप महालिंगाकडे म्हणजे सत्रावी नावाचे अमृताचे तळ्याकडे जातो. हा रस्ता योगाभ्यास करून याच देहात मी पाहिला. या महालिंगाचा मार्ग ज्या ठिकाणी जातो. त्या परमात्मस्वरूपाचा अंतपार नाही व तेथे शब्द कुंठित होतो. एखाद्या ज्ञानवान पुरुषाला शरण जावून त्याच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घ्या पण असा ज्ञानवान पुरूष विरळाच असतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
