ऐसी चिंताक्रांत मनी
1321.
ऐसी चिंताक्रांत मनी दुःख धरिले | म्हणे का बाये दिधले ऐशियासी ॥१॥
खाया ना जेवाया लेया ना नेमाया | दैन्य भोगावया आले जन्मा ॥२॥
जयाचि करी भक्ति त्याचेचि करणे | घरोघरी हिंडणे न चुके माझे ॥ | ३ ॥
लाज सांडूनिया निलाजरा जाला | मूड पडसूड मारिला जोग ज्याने ॥४॥
देवासुरी वाहिली तेचि देना आली | उचित राहिली तेहूनि ॥५॥
ऐसी भक्तकांता मनी वाहे चिंता | काय जाला करिता पंढरिराव ॥६॥
वेष वाणियाचा सर्वे बैल द्वयाचा | म्हणे नामा आमुचा केउता गेला ॥७॥
बिदी उभा राहिला घर पुसो लागला | म्हणे नामा राहिला कोणे ठायी ॥८॥
सांगितले बिराड तुळसीवन अपार | तेंचि जाणा घर नामयाचे ॥९॥
बाहेर तरी कोणी बैसलासे द्वारी |बोलविली नारी नामयाची ॥१०॥
अहो ध्याहो बाई हे ठेवावी गोणी | नामा येतो परतोनी येईन मी ॥११॥
येरी म्हणे तुम्ही त्याचे काय जाणा | आपुली नाम खुणा सांगा तुम्ही ॥१२॥
नाम पुसेल तरी केशवशेटी सांगावे लागेल तितुके वेचावे हे द्रव्य ॥१३॥
आणिक मज मागावे कांही न ठेवावे | माझे क्षेम सांगावे सखा म्हणोनि ॥१४॥
इतुके बोलुन देव पाठमोरा जाला | सवेंचि घरा आला विष्णुदास ॥१५॥
म्हणे कैची गोणी टाकुन गेला वाणी | परि आम्ही कोणी ओळखू ना ॥१६॥
त्याने नांव केशवशेटी म्हणितले | तंव येरे जाणिले माझा देव ॥१७॥
का गे धावा केला देव माझा कष्टला | अपराध जाला तुजपाशी ॥१८॥
राजाई म्हणे आम्हा थोर लाभ जाला | बिडवई भेटला केशवशेठी ॥१९॥
