पारायणकाळात काय खावे
7.
7. पारायणकाळात काय खावे?
पारायणकाळात अर्थातच शुद्ध व सात्त्विक अन्न घ्यावे हे वेगळे सांगायला नकोच. या काळात कांदा, लसूण पूर्ण वर्ज्य आहे. तसेच, 'अधिकस्य अधिक फलं' या न्यायाने या काळात सोवळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम. तसेच, बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य. बाहेर पाणीदेखील न घेणे उत्तम! (हे नियम खर्या साधकाने खरे तर कायमच पाळावेत. तथापि, ते न जमले तर निदान पारायणकाळात तरी अवश्य पाळावेत. ) खरे तर शरीराला एका विशिष्य पद्धतीने राहण्याचे 'वळण लागावे' यासाठी देखील अधूनमधून पारायणे करावयाची असतात!
असो. काहीजण या काळात हविष्यान्न खाऊन राहतात. कारण हे अन्न सर्वांत सात्त्विक समजले आहे.
'धर्मसिंधु' या सर्वमान्य ग्रंथात पुढील पदार्थांचा हविष्यान्न म्हणून उल्लेख आहे- साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे इ. धान्ये. पांढरा मुळा, सुरण इ. कंद, सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे, गाईचे दूध, दही व तूप. तसेच फणस, आंबा, नारळ, केळे, रायआवळे ही फळे, त्याचप्रमाणे जिरे, सुंठ व साखर, काहींच्या मते, दूधभात, साखर गव्हाची पोळी, तूप चालेल. मीठ, तिखट, आंबट नको. गूळही नको.
अर्थात ज्यांना हे पाळणे शक्य आहे अशांसाठीच ही माहिती येथे दिली आहे. ज्यांना एवढे काटेकोर नियम पाळता येणार नाहीत अशांनी पारायणकाळात शुद्ध सात्त्विक अन्न घेण्यास हरकत नाही.
