वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 5. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ › 1. रुक्मिणी स्वयंवर संपूर्ण प्रसंग › 16. प्रसंग सोळावा विवाहसंभ्रम

रुक्मिणी स्वयंवर-प्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088055 · अभंग क्र. १६

16.

रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सोळावा
संत एकनाथ महाराज, रुक्मिणी स्वयंवर
रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सोळावा
श्रीगणेशाय नम: । अंत्रपाट आहे ज्यासी । वेगे सावध करा त्यासी । पळ अक्षर निमिषोन्मिषी । हरिचरणासी चिंतावे ॥१॥
सद्‌गुरु म्हणती सावधान । घटिका हो आली पुर्ण । वचनी नेदावे प्रतिवचन । सावधान परिसावे ॥२॥
सांडा चौघींची कळकळ । महामौन्येंसी रहा निश्चळ । लग्नघटिका भरे चपळ । अतिसबळ वेगेसी ॥३॥
अंगी धरुनि जाणपण । वचना देती प्रतिवचन । तेणेचि वचने त्यासी दूषण । सावधानपण त्या नाही ॥४॥
अतिसमयो वर्ते लग्न । दोन्ही पक्षी सावधान । अच्युतचिंतनी राखा मन । सावधान निजबोधे ॥५॥
ओंपुण्या पडली मिठी । द्वैतभावना सुटली गाठी । सुटला अंत्रपाट दृष्टी । उठाउठी हरीवरी ॥६॥
भीमकीमाथा एकाएक । कृष्ण अक्षता घाली देख । तोचि मस्तकी हस्तक । परम सुख पावली ॥७॥
भीमकी कृष्णाचिया माथा । घालू जाय जव अक्षता । कृष्णचि देखे सभोवता । सबाह्यता हरि देखे ॥८॥
कृष्ण देखे जिकडे तिकडे । अक्षता घाली चहूकडे । पुरोहित म्हणती लागले वेडे । कृष्ण निवाडे नोळखसी ॥९॥
कृष्णालागी परम पिसी । माळ घालूनि रथी होतीसी । शेखी कृष्णासी नोळखसी । केवी नांदसी संसारी ॥१०॥
ऎसे हे झाले पाणिग्रहण । कृष्णे प्रकृति पाहिली जाण । मग बांधावया कंकण । शुद्ध सुते सुतविती ॥११॥
पहिले सूक्ष्म अति अत्यंत । तेचि अष्टधा वाढत । स्थूलमाने दृश्य होत । भग तोडित तडातडां ॥१२॥
पहिले दुखंड केले जाण । त्रिगुणगुणे घाली वळण । अर्ध स्त्रीनाम कंकण । अर्ध जाण कृष्णपुरुषा ॥१३॥
एकचि तंतू द्वैत झाला । स्त्री अंगी बाणला । अर्ध पुरुषत्व पावला । करी बांधला कृष्णाचे ॥१४॥
फेडिले मायेचे वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणे सुंदर शोभली ॥१५॥
मलिन वाम सांडी प्रकृती । सांडिले दोही पक्ष न घेती । सलोभ उपाध्ये ते नेती । मग भांडती परस्परे ॥१६॥
भीमकिया वरिला नारायण । झळकत दृश्याचे करी कंकण । सौभाग्यद्रव्ये देतसे वाण । आहेवपणा श्रीकृष्णे ॥१७॥
दिव्य शोभा शोभे कृष्ण । तेथीची शोभा वर्णी कोण । जाणती अनुभवी सुजाण । सुख संपूर्ण तेथीचे ॥१८॥
जीवी जीवा पडली मिठी । बाह्य पालवा दिधल्या गाठी । भीमकी कृष्ण पाहे दृष्टी । हरिख पोटी न समाये ॥१९॥
विवाह होमलागी श्रीहरी । वेगे चला बोहल्यावरी । कडे घ्यावी जी नोवरी । लहानथोरी वेढिला ॥२०॥
नोवरी धरिताचि हाती । नारी मिनल्या नेण किती । प्रकृती वेढिली श्रीपती । अडकले गोविंदा ॥२१॥
बाइल हाती धरिल्यासाठी । कृष्ण गोविला जगजेठी । येरा जीवांची कायसी गोष्टी । बैसता पाठी गोड लागे ॥२२॥
कृष्ण विचारी निजव्रती । मजचि वरी माजी प्रकृती । माझेनि गमन इसी निश्चिती । लाजो किती लटिकाची ॥२३॥
हे बैसली माझिये कडिये । जीवेभावे मज हे पढिये । प्रपंचाचे आंतुलेकडिये । नामरूप इचेनी ॥२४॥
मजवीण हे नोवरी । पुढे न चले पाऊलभरी । लटकी लाज सांडुनि दूरी । वचन करी वडिलांचे ॥२५॥
आंगा नातळत श्रीहरी । हात न लाविता नोवरी । उचलोनी आणली बोहल्यावरी । नरनारी हासती ॥२६॥
विवाहहोम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणिग्रहण । भीमके दिधली वरदक्षिणा जाण । भूरिदान वांटिले ॥२७॥
कान पिळू मेहुणे भिती । होईल रुक्मियाची गती । परु विटंबील श्रीपती । याची ख्याती तिही लोकी ॥२८॥
त्यांचा जाणोनिया भावो । कृष्णे फेडिला संदेहो । मेहुणे गौरविले पहा हो । दिव्यांबरी भूषणी ॥२९॥
भीमक कृष्णासी विनंती करी । चतुर्थहोम आमुचे घरी । करावा जी कृपेंकरी । सहपरिवारी सुदृदेशी ॥३०॥
पाहावया सुनमुखासी । मूळ पाठवा वरमायेसी । भंवरिया कळस आहे तिजपाशी । निघे वेगेंसी शुद्धमती ॥३१॥
कृष्ण वदे ह्रदयासी । धन्य धन्य तिची कुशी । शुद्धमति लागे पायांसी । देवकीसी प्रार्थिलें ॥३२॥
देवकी बैसविली सुखासनी । लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी । विंजणे वारिती दोघीजणी । पायरावणी पदोपदी ॥३३॥
शुद्धमती देतसे विडिया । पीक धरावया सुवर्णघडिया । श्रीगिरीवरी बोलती गुडिया । पायघडिया पदोपदी ॥३४॥
चांदवे मोतिलग विस्तारे । दोही बाही ढळती चवरे । देवकी समारंभे थोरे । आणिली गजरे मांडवा ॥३५॥
कृष्णरुक्मिणी अतिगोमेटी । साजिरी वोहरे देखिली दृष्टी । ऎसा जोडा नाही सृष्टी । माझी दृष्टी झणी लागे ॥३६॥
देवकी घेऊनि अपण । दोघा उतरी निंबलोण । कृष्णनिंबलोणा हुताशन । मुख पसरोन धाविन्नला ॥३७॥
कृष्णनिंबलोण पडता मुखी । तेणे मुख सरते तिही लोकी । हे जाणोनिया याज्ञिकी । अतिसाक्षेपी सादर ॥३८॥
कृष्णनिंबलोण अतिसाक्षेप । करिता हरले त्रिविधताप । जाऊनि देहसंताप । सुखरूप तो जाला ॥३९॥
सून बैसवूनि मांडिवरी । कृष्णश्रवण जडित भोवरी । कानी घातली निर्धारी । कळस त्यावरी धैर्याचा ॥४०॥
मुक्तमोतिलग गंभीर । श्रवणी बाणल्या साचार । तेणे शोभली सुंदर । मनोहर सकळिंका ॥४१॥
लग्न लागलिया येरे दिवशी । सोहळा मांडिला वोहरांसी । मूळ पाठविले हळदीसी । यादवांसी भीमके ॥४२॥
मूळ पाठविले सकळा । दोही बाही बारा सोंळा । करवली सुभद्रा वेल्हाळा । चाले सुढाळा उन्मनी ॥४३॥
अत्यंत शाहाण्या सुवासिनी । आणीक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ॥४४॥
वडिलपणे अतिश्रेष्ठ । सकळांमाजी वरिष्ठ । शांति चालिली चोखट । अतिलोभिष्ट श्रीकृष्णा ॥४५॥
सभा बैसली निजबोधे । ढवलळे गाती स्वानंदे । हळदी आरंभिली विनोदे । झाली सावधे अधिकारे ॥४६॥
पाहो जाणती कृष्णकौतुक । तेही सावध झाले लोक । अनाधिकारिया लगबग देख । पाहाती मुख वनितांचे ॥४७॥
वोहरे पाहाता निवे मन । दोन्ही पक्षी सावधान । कोणा न बोलवे वचन । पडिले मौन सकळिका ॥४८॥
चौघीजणी अतिचपळा । कुजबुजती वेळोवेळा । कैशा झाल्याती तोंडाळा । शब्द्चाळा न सोडा ॥४९॥
शांति म्हणे परत्या सरा । सांगेन ते तुम्ही करा । कुरवंडी श्रीकृष्णवरा । लोण उतरा सर्वस्वे ॥५०॥
स्नेहे उजळूनिया वाती । भीमकी सन्मुख दाविती । येरी नातळे जी हाती । स्नेहवृत्ती नावडे ॥५१॥
कुरवंडी न धरिता हाती । माय धाय शंकल्या चित्ती । मग बोलली निजशांती । नव्हे श्रीपती हे योग्य ॥५२॥
जया दीपाचिये मेळी । न निघे स्नेहधूम काजळी । तैसा दीप उजळी । मग वोवाळी श्रीकृष्णा ॥५३॥
ऎकोनि भीमकी झाली सुखी । खूण बाणली नेटकी । जीवी जीवाची वोळखी । परम पारखी तो जाणे ॥५४॥
निर्धूम अग्नीच्या निजमेळी । कृष्णदीपे दीप उजळी । आकाश लोपले प्रभेतळी । भावे वोवाळी श्रीकृष्ण ॥५५॥
न कळे भीमकीचे लाघव । सकळही म्हणती धन्य भाव । आता घेऊनिया नांव । पाय मागे कृष्णाचे ॥५६॥
ऎकोनि जनांचिया गोष्टी । भीमकी दचकली पोटी । काय आता बोलो वोठी । न दिसे दृष्टि नामरूप ॥५७॥
याच्या नामरूपभेदा । व्यक्ति नाणवेचि वेदा । पुढारी वाटले नच शब्दा । नेति अनुवादा परतल्या ॥५८॥
पाहाता रूपाचा दुकाळ । घालिता साकारतेचा आळ । लाविती नामाचा विटाळ । तेणे गोपाळ शोभेल ॥५९॥
सवेचि म्हणे कळे चित्ता । गोइंद्रियांचा हा नियंता । यासी गोपाळा म्हणता । दोष सर्वथा मज नाही ॥६०॥
ऎसे विचारूनि वेल्हाळा । लक्ष लाविजे चरणकमळा । वेगी पाय द्या गोपाळा । भीमकबाळा बोलिली ॥६१॥
तव पिटिली टाळिया टाळी । ऎकोनि हांसिजे सकळी । भीमकीये भली केली रांगोळी । खुण वनमाळी जाणत ॥६२॥
ऎकोनि भीमकीच्या बोला । कृष्णदेवो मानवला । वर्तत खुणा आपुल्या । देत पाउला स्वानंदे ॥६३॥
अबला सांगती वडिला । येणे अभिमान सांडिला । कृष्ण बाइलेआधीन झाला । तिच्या बोलामाजी वर्ते ॥६४॥
कृष्ण देखोनि बहु काळा । हळदी लाव वेळोवेळा । उठूनिया घनसावळा । अति सोज्वळा करू पाहे ॥६५॥
जे जे कृष्णाअंगी लावे । ते ते काही केलिया न निघे । भीमकी उटी लागवेगे । मळी न निघे सर्वथा ॥६६॥
अत्यंत निर्मळ वनमाळी । निज निर्मळ न निघे मळी । चाकाटली भीमकबाळी । न देखे तळी मळवटू ॥६७॥
पाहाता कृष्णचरणरेखा । चरणी देखे तिही लोका । भीमकी कृष्णमय देखा । उटणे हरिखा होतसे ॥६८॥
कृष्णचरणी निजस्वरूप । देखता आला स्वेदकंप । कंठी दाटला जी बाष्प । विकळरूप मूर्च्छित ॥६९॥
सद्‌गुरु म्हणती सावधान । कृष्णचरणी दृढ मन । धैर्य बळे राखोनि जाण । विकळपण येवो नेदी ॥७०॥
मोहे धाविन्नलो धाये । म्हणे तुज झाले काये । झणी दिठी लागेल माये । उचलोनि कडिये घेतली ॥७१॥
कृष्णचरणी जे अनुभविले । ते तव न बोलवे बोले । भीमकीया शहाणपण केले । खुणे वारिले धायेते ॥७२॥
पाळी आली कृष्णाकडे । एकेचिं हाते फेडा बिरडे । न फिटे तरी रोकडे । दंडवत घडे भीमकीसी ॥७३॥
महुणेपणाचे परिपाटी । विषयतृष्णेचिये दृष्टी । बिरडा पडिल्या सुबद्ध गाठी । केवी जगजेठी सोडील ॥७४॥
मेहुणे म्हणती हा जगजेठी । जाणे बिरडियाची हातवटी । अभ्यास केला यमुनेतटी । दाटोदाटी गौळणीसी ॥७५॥
वर्मेंकर्मे बोलती खुणा । यादव म्हणती श्रीकृष्णा । बिरडिया पाडु तो केसणा । तू देखणा निजदृष्टी ॥७६॥
महावीरांचे बिरडे पडले । ते तुवा एकलेनि फेडिले । मेहुणे न लाजती बोलता बोले । रुक्मिया दिधले ते यासी दीजे ॥७७॥
सासुसासरियांची आवडी । देवकीवसुदेवांचिये गोडी । म्हणती कृष्ण बिरडे फेडी । वचन न मोडी वडिलांचे ॥७८॥
कृष्ण अवलोकी कृपादृष्टी । बिरड्या सुटल्या जी गाठी । द्वैतकांचोळी समदृष्टी । फेडी जगजेठी तत्काळ ॥७९॥
पहा गे येणे नवल केले । कृष्णदृष्टीच उगवले । न सोडिता पै फेडिले । बिरडे काढिले निजदृष्टी ॥८०॥
पाहता कृष्णदृष्टीकडे । फिटे संसारबिरडे । त्यासी हे दुर्घट केवढे । फेडिता बिरडे नोवरीचे ॥८१॥
नाना व्रते तपे दाने । योगयागादि सधने । करिता शिनले होगिजन । तरी कृष्णचरण न ठाकती ॥८२॥
भीमकी दैवाची पै चांग । परम भाग्ये अतिसभाग्य । पावली कृष्णाचे अर्धांग । भावे श्रीरंग भोगित ॥८३॥
श्रीकृष्णासन्मुख भीमकी । बैसविली जी कौतुकी । लाज जाली अधोमुखी । कृष्णाकडे पाहे ॥८४॥
तव तळवटी एकाएक । देखती जाली कृष्णमुख । पाठमोरी पाहता देख । देखे सन्मुख श्रीकृष्ण ॥८५॥
वाम सव्य दोहीकडे । देखे कृष्णाचे रूपडे । आता मी रिघो कोणीकडे । चहूकडे हरि दिसे ॥८६॥
ऎशापरी अतिसंकटी । लाजता कृष्ण देखे दृष्टी । लाज सांडूनि गोरटी । उघटी दृष्टी हरिरूपी ॥८७॥
भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इसी हळूचि उटी । कठिणहस्त तू जगजेठी । मल्ल मुष्टी मर्दिले ॥८८॥
तुझा लागताचि हात । देह बुद्धीचा करिती घात । याचलागी जीव भीत । तुझी मात न करवे ॥८९॥
रेवती म्हणे जी यादवा । आधी घ्यावे इच्या नांवा । मग इसी हळदी लावा । देवाधिदेवा श्रीकृष्ण ॥९०॥
कृष्ण म्हणे हळदीमिसे । मजसी लावू आल्या पिसे । नांवरूप मज न दिसे । काय म्या कैसे म्हणावे ॥९१॥
नामरूपाची व्यवस्था । रुक्मिणीच जाणे तत्त्वता । माझ्या आंगी नाही सर्वथा । नाम घेता मी नव्हे ॥९२॥
आग्रह न करावा गोपाळा । नामरूपा तूचि जिव्हाळा । व्यर्थ चाळविशी अबळा । सुखसोहळा तुझेनी ॥९३॥
कृष्ण खूण सांगे जीवींची । नामरूपे अतिरूपाची । सगुणगुणे हे गुणाची । प्रिया आमुची निजदृष्टी ॥९४॥
कृष्ण म्हणे रुक्मिणी देवी । नामरूप तूचि अवघी । मजपरीस तूचि बरवी । हांसिजे सर्वी ऎकोनी ॥९५॥
हळदी घेऊनि श्रीरंगे । उतित भिमकीची अष्टांगे । येरी निवतसे सर्वांगे । जाणती आगे अनुभवी ॥९६॥
चरणी उद्धरली शिळा । ते कर भोगी भीमकबाळा । मृदुपणाचा जिव्हाळा । जाणती कळा निजभक्त ॥९७॥
हा तव ब्रह्मादिकाचा ईश । हळदीमिसे ह्रषीकेश । झाला भीमकीचा दास । जगन्निवास जगाचा ॥९८॥
दासांचेही दास्य करणे । हे तव श्रीकृष्णचि जाणे । उच्छिष्ट भक्तांचे काढणे । स्वामिपणे फुगो नेणे ॥९९॥
कृष्ण साचार देवाधिदेवो । फेडी भक्तांचा संदेहो । जैसा जयाचा भक्तिभावो । तैसा देवो तयासी ॥१००॥
भक्तभावाच्या आवडी । धूत रणांगणी घोडी । भक्तभावाची निजगोडी । जाणे धडफुडी श्रीकृष्ण ॥१॥
कृष्णचरणी सत्य समता । सुरंग भावार्थ अक्षता । भीमकीये ठेवी माथा । लाज सर्वथा न धरावी ॥२॥
ऎकोनि हरिखेली वेल्हाळा । धन्य दशा झाली कपाळा । चरण वंदीन गोपाळा । भीमकबाळा उल्हासली ॥३॥
हरिखे नमू पाहे गोरटी । तव पूर्वील सख्या वक्रदृष्टी । देखता लाज आली पोटी । भेद उठी शंकेचा ॥४॥
तेणे चुकविले समचरण । वृथा गेले जी नमन । मायेसकट हासती जन । येरी अभिमान धरियेला ॥५॥
थोर अभिमानली बाळी । धरी अंगुष्ठ करतळी । नमन चुको नेदी ये वेळी । देखोनि वनमाळी हासत ॥६॥
येरी मस्तक जव लोटी । तव समचर्णा पडली तुटी । अभिमाने केली फुटी । पाय ललाटी न लागती ॥७॥
नमस्कारालागी भले । येरी मागुती अंगविले । तव समसाम्य पाउले । काही केल्या नातुडती ॥८॥
जितुके अभिमानाचे बळ । तितुके निजदृष्टिपडळ । तेणे चुकविले चरणकमळ । वेगे वेल्हाळ गजबजली ॥९॥
वियोग न साहवे पोटी । ऊर्ध्वश्वासे स्फुंदे गोरटी । चरण न लागती लल्लाटी । कपाळ पिटी निजकरी ॥११०॥
दु:खे म्हणतसे कटकटा । मर मर दुष्टा अदृष्टा । कृष्ण पावलिया गोष्टी फुकटा । चरण लल्लाटा न लागती ॥११॥
लोक म्हणती सकळ । धन्य भीमकीचे कपाळ । ते हे आजि झाले निर्फळ । श्रीकृष्णचरण नातळती ॥१२॥
मनी होती ऎसी आस । करूनि उटणियांचे मिस । कृष्ण नमीन सावकाश । तेही उदास भाग्य जाले ॥१३॥
चरण न पावेचि कपाळ । जीवी लागली तळमळ । गात्रे जाताती विकळ । परम विव्हळ होतसे ॥१४॥
चंडवाते जैसी कर्दळी । उलथो पाहे जी समूळी । त्याहून अधिक भीमकबाळी । गात्रे सकळी कापती ॥१५॥
नेत्री अश्रूचिया धारा । अंग कांपतसे थरथरा । चरणवियोगे सुंदरा । शरीरभारा उबगला ॥१६॥
गळती अलंकार भूषणे । करमुद्रिका आणि कंकणे । पडली अवशेषित प्राणे । सत्त्वगुणे मूर्च्छित ॥१७॥
जीवनावेगळी मासोळी । तेवी तळमळी भीमकबाळी । उद्धव कळवळिला तये वेळी । आनंदजळी वर्षत ॥१८॥
उद्धव म्हणे कृष्णनाथा । तुझी अवस्था शोधित चित्ता । विनोद करिसी भक्तहिता । चरणी माथा ठेवू दे ॥१९॥
मग धावोनिया लवलाहे । धरूनि भीमकीची बाहे । म्हणे उठी उठी वो माये । वंदी पाय कृष्णाचे ॥१२०॥
सांडी सांडी लज्जाभिमान । निर्विकल्प राखी मन । वृत्ति करूनि सावधान । हरिचरण वंदावे ॥२१॥
मग उद्धवाचे वचनी । देत विश्वास रुक्मिणी । लाज सांडिली उपडोनी । हरिचरणी निर्लज्ज ॥२२॥
समचरणाचिये भेटी । सुटल्या अहंसोहं गाठी । उटू विसरली गोरटी । घातली मिठी हरिचरणी ॥२३॥
वृत्तीसी जाले समाधान । खुंटला शब्द तुटले मौन । भोगिताहे चैतन्यघन । समचरण वंदिता ॥२४॥
उपरमली विषयदृष्टी । निजानंदे कोंदली सृष्टी । तेथे हरपली त्रिपुटी । उठाउठी निजलाभ ॥२५॥
कृष्णचरणी जडली कैसी । देह विदेह नाथवे तिसी । विसरली विवाहसोहळ्यासी । कृष्णसाम्येंसी समरस ॥२६॥
नोवरा नोवरी नाठवे हेतू । आणवाहूनि गेला दृष्टांतू । अर्थ स्वार्थ आणि परमार्थू । झाला अनंतू अनंती ॥२७॥
हरि म्हणे वेल्हाळ । दिसे देहभावी विकळ । माय धाय करिती कोल्हाळ । सोयरे सकळ मिळोनी ॥२८॥
ऎशा करतील पा गोष्टी । पाया लागलियासाठी । जीवभावा पडली तुटी । वर जगजेठी वरू नये ॥२९॥
लौकिक परमार्थासी सळ । दोही पक्षी पडेल विकळ । मजवरी रचिती किडाळ । नानाशब्द जाळ तर्काचे ॥१३०॥
ऎसी उफराटी विकडी । पडली देवांसी सांकडी । सावधान हे धडफुडी । केवी तांतडी होईल ॥३१॥
भीमकी निजसुखा अंतरी । वेगे प्रवेशला श्रीहरी । तोही विसरला सुंदरी । सावधान करावया ॥३२॥
देवो देवी झाली एक । भेद फिटला नि:शंक लागली निजसुखटकमक । चेतवि देख कोण कोणा ॥३३॥
सहजी सहजमेळी । निजबोधे वनमाळी । स्वभावे भीमकबाळी । सावध करी सवेगे ॥३४॥
निजी निजसुखावेगी । न निवडे कवणे काळी । करूनि अहंकाराची होळी । होय वेल्हाळी सावध ॥३५॥
तिसी देहावर जरी येणे । तरी मी देह ऎसे न म्हणे । अवघे आंगेचि आंगवणे । पूर्णपणे रचिलीसे ॥३६॥
चराचर जे जे दिसे । ते ते अवघे मीच असे । जीव शिव झाले मदंशें । रिते न दिसे मजविण ॥३७॥
यापरी कृष्णरुक्मिणी । सावध झाली ऎक्यपणी । माया गेली निंबलोण करूनी । वोंवाळूनि सर्वस्वे ॥३८॥
ऎक्याचिया बहुल्यावरी । दोघे वोहरे साजिरी । बैसली अभिनव प्रीतिकरी । निजनिर्धारी स्वलीला ॥३९॥
सरली नमस्काराची वारी । तव श्रीकृष्णे केली चोरी । लिंगदेहाचे गांठीभीतरी । डाव श्रीहरी चोरिला ॥१४०॥
पालवा पालव बांधल्या साठी । चहू देहांच्या सोडिल्या गाठी । पाया लागता गोरटी । नेदी महाहटी हटवादी ॥४१॥
चैतन्य चोर हा निजदृष्टी । सोडीत अभ्यंतरींच्या गाठी । घेतले देऊ नेणे जगजेठी । व्यर्थ चावटी का करावी ॥४२॥
आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आइती केलीसे गोमटी । कुंकुमे वाटी परिपूर्ण ॥४३॥
ओंकार आळा दृढमूळ । सहज वृक्ष तो सुनीळ । वाढिन्नला सकोमळ । अर्धमात्रापरियंत ॥४४॥
आगमनिगम तेचि पाने । वैराग्यमोहराची सुमने । मोहरला कवणे माने । श्रद्धाजीवे सपोष ॥४५॥
परिमळा लोधले साचार । रुंजी करिती मुमुक्षुभ्रमर । आमोदरस भाव सादर । झणत्कार सांडूनी ॥४६॥
स्वानंदवसंताचे रिघवणे । वृक्ष नित्य नवा तेणे गुणे । संतकोकिळची सुटली मौने । टाहो करिती निजबोधे ॥४७॥
सकळ फळे फळल्यापाठी । आम्रवृक्ष फळे शेवटी । रसास्वादाचिय खोटी । पोटींची आंठी सांडिलिया ॥४८॥
निजसेजे जो मुराला । तोचि सज्जनी सेविला । बहु काय बोलो बोला । आंबा शिंपो आला श्रीकृष्ण ॥४९॥
तेथे केली नवलकुसरी । सन्मुख पाहता नोवरा श्रीहरी । विन्मुख पाहताचि नोवरी । मांडियेवरी बैसविली ॥१५०॥
शेंड्याहूनि समूळी । अखंड एक धार लागली । आंबा शिंपी भीमकबाळी । चौघी वेल्हाळ तेथे गाती ॥५१॥
प्रकृती पुरुष दोघेंजणे । आंबा शिंपिती एकपणे । चूत विस्तारला अच्युतपणे । आंबा म्हणवणे जगाचा ॥५२॥
आंबा शिंपोनी गोरटी । कृष्णसहित वेगे उठी । हातींची रिती नव्हे वाटी । कृष्ण पूर्णदृष्टी पाहातसे ॥५३॥
त्रिगुण गुणातीत जाण । तिसरे दिवशी तेलवण । करूनि नोवरीसी अर्पण । वाणपालटण चतुर्थी ॥५४॥
श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचे वास संपूर्ण । स्थितिकाळासी देऊनि मान । लीला श्रीकृष्ण नेसला ॥५५॥
वाणपालटण नोवरीस । अक्षयाचे सपूर वास । नेसोनिया सावकाश । निजसुखेसी वर्तती ॥५६॥
वोहरे बैसवोनि वाडेकोडे । समसाम्य वाहूनि साडे । ऎरणी विस्तारावया पुढे । शुद्धमती सावध ॥५७॥
व्याही गौरविता कौतुक । कृष्णासमान मानी भीमक । सकळिका देऊनि सुख । एकेंएक गौरविले ॥५८॥
भीमके मांडिले विंदान । भवऎरणी संपादून । कृष्णासी वंशपात्रदान । विधीविधान वेदोक्त ॥५९॥
वंश विस्तारिता सुख । सोळा कळाचे सोळा कर्क । प्रकृतिस्वभाव सुपल्या देख । ज्ञानदीपे सोज्वळ ॥१६०॥
शुद्धमतीने तत्त्वता । एका जनार्दन पाहता । वंश ठेविला कृष्णसमर्था । जुनाट कथा परिसिजे ॥६१॥
पूर्वी पितामहाचा पिता । तयासी प्रसन्न सुभानु होता । तेणे भानुदासे वंश सरता । केला तत्त्वता हरिचरणी ॥६२॥
प्रल्हादाचे कृपेसाठी । बळींचे द्वार राखी जगजेठी । तैसीच हेही आहे गोष्टी । कृपादृष्टी कृष्णाची ॥६३॥
सांगता वंशपात्रदान । लागले निजयशाचे अनुसंधान । आमुचे वंशी वरदान । परम भक्त कृष्णाचे ॥६४॥
मी जन्मलो धन्य वंशी । म्हणोनि हरिभक्ति आम्हासी । संत सोयरे निजमुखासी । वश कृष्णासी निरविला ॥६५॥
जे जे जयासी निरविले । तेणे ते पाहिजे सांभाळिले । आमुचे चाळकपण कृष्णासी आले । कासे लाविले जनार्दन ॥६६॥
कथेसी झाली आडकथा । म्हणोनि न कोपावे श्रोता । धेंडा नाचवील कृष्णनाथा । रसाळ कथा पुढे आहे ॥६७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे विवाहसंभ्रमो नाम षोडश: प्रसंग ॥१६८॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग