माय मेली बाप मेला ।
58.
माय मेली बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला ॥1॥
मी तुझे गा लेकरु । नको मजशी अव्हेरू ॥2॥
मतिमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशी ॥3॥
तुजविण सखे कोण । माझे करील संरक्षण ॥4॥
अंत किती पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥5॥
सकळ जिवाच्या जीवना । ह्मणे जनी नारायणा ॥6॥
