माउलीसी सांगे कोण ।
3116.
माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी तान्हे ॥१॥
अंतरीचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥धृपद॥
मायबापाची उपमा । तुज देऊ पुरुषोत्तमा ॥२॥
ते ही साजेना पाहाता । जीवलगा पंढरिनाथा ॥३॥
माय पाळी संसारी । परलोक राहे दुरी ॥४॥
तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥५॥
तुका म्हणे नारायणा । तुम्हा बहुत करुणा ॥६॥
अर्थ :
तुझ्या तान्या बाळा विषयी तू थोडे प्रेम वाढव असे त्या बाळाच्या आईला कोणी सांगत असते काय? अहो पण त्या आईच्या अंतकरणातील कळवळाच त्या तान्या बाळाचे पालनपोषण करते. हे पुरुषोत्तमा तुला जर माय बापाची उपमा दिली तर, हे जिवलग पंढरीनाथाती उपमा देखील तुला साजेनाशी आहे. कारण मायबाप संसारांमध्ये मुलाचे पालनपोषण तर करतात पण पर लोकांमध्ये ते मुलापासून दूर राहत असतात. परंतु हे अनंता तू तसा नाहीयेस तुझी सत्ता काळावर देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुला तर आई-बाबा पेक्षा हि जास्त करूणा आहे.
