विष्णुवीण मार्ग घेशी
212.
विष्णुवीण मार्ग घेशील अव्यंग ।
तरी वायांची सोंग करणी तुझी ॥
येऊनि संसारा वायाचि उजिगरा ।
कैसेनि ईश्वरा पावसी हरि ॥
नरदेह कैचे तुज होय साचे ।
नव्हे रे देहींचे सुख तुज ॥
ज्ञानदेव म्हणे शरण रिघणे ।
वैकुंठीचे ऐणे अंती तुज ॥
अर्थ :
एका श्रीहरिला सोडून इतर मार्ग काही व्यंग न देता आचरलेस तरी तो तुझा खटाटोप फुकट सोंग होईल. जन्माला येऊन असे फुकट परिश्रम केलेस तर श्रीहरिला कसा प्राप्त होशिल. हा मनुष्य जन्म कायम टिकणारा आहे काय ? तसेच देहात होणारे विषयाचे सुख कसे हित करेल? म्हणून श्रीहरिला अनन्य भक्तीभावाने शरण जाऊन वैकुंठपद प्राप्त करून घे. असे माऊली सांगतात.
